भ्रष्टाचारामुळे ग्राहकांवर वीज दरवाढीची कुऱ्हाड : प्रताप होगाडे यांची टीका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 13, 2018 11:45 PM2018-07-13T23:45:22+5:302018-07-13T23:47:53+5:30

 Pratap Bhawade's criticism of power tariff for customers due to corruption: | भ्रष्टाचारामुळे ग्राहकांवर वीज दरवाढीची कुऱ्हाड : प्रताप होगाडे यांची टीका

भ्रष्टाचारामुळे ग्राहकांवर वीज दरवाढीची कुऱ्हाड : प्रताप होगाडे यांची टीका

Next
ठळक मुद्देअडीच कोटी ग्राहकांना ३०८४२ कोटींचा फटका

इचलकरंजी : राज्यातील काही बडे वीज ग्राहक व महावितरण कंपनीतील काही कर्मचारी यांच्यातील भ्रष्टाचाराला कुरण मिळावे, यासाठी अडीच कोटी वीज ग्राहकांवर ३०८४२ कोटी रुपयांच्या जादा वीज दरवाढीचा प्रस्ताव महावितरणने वीज नियामक आयोगासमोर ठेवला आहे. दरवर्षी ६००० कोटी रुपयांची तूट दाखवायची आणि ९००० कोटी रुपयांचे कुरण मोकळे ठेवायचे, असा प्रकार असल्याची माहिती वीजतज्ज्ञ प्रताप होगाडे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

महाराष्ट्रातील विविध घटकांमध्ये होणारा विजेचा वापर, वीजनिर्मिती आणि वितरण यातील त्रुटी तसेच राज्यातील विजेची परिस्थिती याचे अवलोकन करून त्याचा अहवाल आणि त्यावरील उपायांच्या शिफारशी यासाठी शासनाने नेमलेल्या सत्यशोधन समितीचे होगाडे सदस्य होते. त्यामुळे वीज गळती आणि कृषी पंपांच्या वीज वापराबाबतची स्थिती महावितरणकडून लपवली जात असून, फसवी आकडेवारी जाहीर केली जात असल्याचा आरोप होगाडे यांनी केला.

महावितरणकडून कृषी पंपासाठी वीज दर ३० टक्के, तर वीज गळती १५ टक्के असल्याचे सांगितले जात आहे. प्रत्यक्षात कृषी पंपांचा वीज वापर १५ टक्केच आहे. तर वीज चोरी आणि वीज गळती ३० टक्के आहे. कृषी पंपांचा वीज वापर अधिक १५ टक्के दाखवून ती वीज काही बड्या ग्राहकांना चोरून दिली जाते. त्यामध्ये कर्मचाऱ्यांचा हात आहे. ही १५ टक्क्यांची वीज चोरी थांबविली तर महावितरणला ९ हजार ३०० कोटी रुपये जादा मिळतील. ज्यामुळे सध्या दाखविलेली ३०८४२ कोटी रुपयांची तूट भरून निघेल आणि नव्याने होणारी वीज दरवाढ थांबेल.

घरगुती वीज ८३ पैशांनी महाग
शंभर युनिटपर्यंत घरगुती वीज वापर असलेल्या ग्राहकांसाठी नवीन प्रस्तावानुसार युनिटला ८३ पैसे आणि १०० युनिटपेक्षा अधिक वापरासाठी ८६ पैसे वीज महाग होणार आहे.
याचा फटका १ कोटी २० लाख वीज ग्राहकांना बसणार आहे. याउलट वीज दरात फक्त ८ पैसे वाढ प्रस्तावित असल्याचे महावितरणचे म्हणणे फसवणूक करणारे आहे, अशी टीका होगाडे यांनी केली.

कृषी पंपासाठी २.७ ते ५ पट दरवाढ
नव्याने होऊ घातलेल्या दरवाढीमध्ये कृषी पंपाच्या विजेचा समावेश आहे.
सध्या तीन अश्वशक्तीपर्यंतच्या कृषी पंपांना ५५ पैसे प्रतियुनिट असलेला वीज दर २ रुपये ६ पैसे आणि त्यावरील कृषी पंपाचा ८५ पैशांचा वीज दर २ रुपये ३६ पैसे होईल.
तसेच उपसा सिंचन योजनांची असलेली ७२ पैसे प्रतियुनिट वीज ३ रुपये ९० पैसे होणार आहे.
ही दरवाढ किमान २.७ पट ते ५ पट आहे.


 

Web Title:  Pratap Bhawade's criticism of power tariff for customers due to corruption:

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.