घरात अठरा विश्व दारिद्र्य, तरीही जिद्दीने मिळवली ७७ लाखांची शिष्यवृत्ती; पण...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 7, 2021 05:01 PM2021-12-07T17:01:37+5:302021-12-07T17:52:41+5:30
घरी पाचवीला पुजलेले अठरा विश्व दारिद्र्य, वडील एम.आय.डी.सी. कामगार, अभ्यासाला काही वर्षे विजेअभावी दिव्याच्या प्रकाशाची सोबत पण तरीही प्रतीकने संशोधक होण्याची जिद्द मनी बाळगत मोठ्या परिश्रमाने आपले शिक्षण सुरु ठेवले. अन् प्रतिकच्या या कष्टाचे अखेर चिज झाले.
अनिल पाटील
मुरगूड : घरी पाचवीला पुजलेले अठरा विश्व दारिद्र्य, वडील एम.आय.डी.सी. कामगार, अभ्यासाला काही वर्षे विजेअभावी दिव्याच्या प्रकाशाची सोबत पण तरीही प्रतीकने संशोधक होण्याची जिद्द मनी बाळगत मोठ्या परिश्रमाने आपले शिक्षण सुरु ठेवले. अन् प्रतिकच्या या कष्टाचे अखेर चिज झाले. प्रतिकला परदेशात उच्च शिक्षण घेण्यासाठी महाराष्ट्र शासनाची तब्बल ७७ लाख रुपये शिष्यवृत्ती मंजूर झाली. या शिष्यवृत्तीमुळे प्रतिकच्या पंखांना आणखीन बळ मिळाले.
प्रतीक पुढील शिक्षणासाठी ऑस्ट्रेलियात जाणार आहे. त्यासाठी विमान व अन्य खर्चासाठी त्याला दोन लाख रुपये खर्च येणार आहे. हा पैसा कसा उभा करायचा या विविंचनेत प्रतीक व त्याचे कुटुंबीय आहे. त्यामुळे समाजातील दानशूर संस्था आणि व्यक्तींनी प्रतिकच्या गगनभरारीला दातृत्वाचे बळ देणे गरजेचे आहे.
कागल तालुक्यातील कुरुकली येथील सर्वसामान्य कुटूंबातील प्रतीक दत्तात्रय कांबळे असे परदेशी शिक्षणासाठी शिष्यवृत्ती मिळालेल्या जिद्दी तरुणाचे नाव. प्रचंड ध्यास अभ्यासातील प्रगती याच्या जोरावर त्याची ऑस्ट्रेलिया नॅशनल युनिवर्सिटी मध्ये उच्च शिक्षणासाठी निवड झाली आहे. कुरुकली सारख्या छोट्याश्या गावातील जिल्हा परिषदेच्या शाळेत प्रतीकचे पाचवी पर्यंत शिक्षण घेतले. प्रतीकची हुशारी पाहून शिक्षकांनी त्याला नवोदयसाठी प्रोत्साहित केले. त्याची नवोदय विद्यालयामध्ये निवड झाली पुढे १२ वी पर्यंतचे शिक्षण नवोदय विद्यालयामध्ये घेतले. इचलकरंजी येथे दत्ताजीराव कदम इन्स्टिट्यूट मध्ये मेकॅनिकल इंजिनीअरिंगची पदवी चांगल्या गुणांनी प्राप्त केली. याच गुणांच्या आधारे त्याची ऑस्ट्रेलिया येथे मास्टर ऑफ इंजिनिअरींग इन मेकोक्ट्रॉनिकस या विषयातील पदव्युत्तर शिक्षणाची संधी मिळाली आहे.
विशेष करून रोबोट तंत्रज्ञानामध्ये त्याचे तेथील शिक्षण व संशोधन होणार असल्याचे त्याने सांगितले. अन्य देशातील विद्यापीठांमध्ये देखील त्याला संधी होती. मात्र प्रतीकने ऑस्ट्रेलिया युनिवर्सिटीची निवड केली. आता या महिन्या अखेरीस प्रतिकला उच्च शिक्षणासाठी ऑस्ट्रेलियाला जायचे आहे. यासाठी दीड लाखाचा विमान प्रवास व अन्य खर्चासाठी त्याला सुमारे दोन लाख खर्च अपेक्षित आहे. यासाठी त्याला झुंजावे लागत आहे. समाजातील दातृत्वशील व्यक्तींनी पुढे आल्यास प्रतीकचा हा प्रवास सुकर होऊ शकतो. त्यामुळे एका वंचित उपेक्षित अश्या गुणवंत मुलासाठी आता समाजानेच पुढे येण्याची गरज आहे.
प्रतीकला मदत करण्यासाठी
Bank-State bank of India (SBI)
Account no.-20296083445
CIF no.-88461562267
IFSC-SBIN0000270
फोन पे व गुगलपेही करू शकता मदत
प्रतीक कांबळे
गुगल पे आणि फोन पे साठी नंबर
7709155277