प्रवीणच्या सुवर्णपदकाने वडिलांच्या कष्टाचे चीज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 11, 2019 08:50 PM2019-01-11T20:50:52+5:302019-01-11T20:52:33+5:30
पुणे येथे सुरू असलेल्या ‘खेलो इंडिया’ स्पर्धेत कुस्तीमध्ये प्रवीण पाटीलने सुवर्णपदक मिळवून शेतमजूर वडिलांच्या कष्टाचे चीज केले. त्याच्या या यशाने कोल्हापूर जिल्ह्याचे नाव देशपातळीवर पोहोचविले.
मधुकर डाफळे ।
कोल्हापूर : पुणे येथे सुरू असलेल्या ‘खेलो इंडिया’ स्पर्धेत कुस्तीमध्ये प्रवीण पाटीलने सुवर्णपदक मिळवून शेतमजूर वडिलांच्या कष्टाचे चीज केले. त्याच्या या यशाने कोल्हापूर जिल्ह्याचे नाव देशपातळीवर पोहोचविले.
कोगे (ता. करवीर) येथील प्रवीणने शाळेबरोबरच कुस्तीचाही श्रीगणेशा एकाचवेळी केला. गावातील हनुमान तालमीत एम. एस. पाटील व विश्वास हरुगले
या वस्तादांच्या मार्गदर्शनाखाली त्याने सरावाला प्रारंभ केला. वडील पांडुरंग पाटील शेतमजूर असूनही त्यांनी प्रवीणच्या खुराक आणि सरावासाठी लागणाऱ्या गोष्टीत कधी खंड पडू दिला नाही.
छोट्या चणीच्या चपळ प्रवीणने वडिलांच्या कष्टाला न्याय दिला. त्याने गावागावांतील अनेक मैदाने गाजविली. कुंभी-कासारी कारखान्याच्या मानधनकारक कुस्ती स्पर्धेत २५ किलो वजनी गटात प्रथम क्रमांक पटकाविला. यानंतर त्याने मागे वळून पाहिले नाही. याच स्पर्धेत प्रवीणने ३०, ३५, ४० या गटांत मानधनधारक होण्याचा मान मिळविला.
यानंतर कुस्तीत आवश्यक चपळाई, डावपेच आणि तंत्र आत्मसात करण्यासाठी प्रवीणला पांडुरंग
पाटील यांनी पुण्यात जाणता राजा तालीम मंडळाच्या संदीप गोंडवे यांच्याकडे पाठविले. तेथे चार वर्षे सराव करताना प्रवीणने शालेय स्तरावर, तसेच राज्य, राष्ट्रीय स्पर्धा गाजविल्या. उत्कृष्ट कामगिरीच्या बळावर प्रवीणला भारतीय सैन्यदलाच्या ‘आर्मी बाईज’मध्ये स्थान मिळाले. सध्या बरेली आर्मी सेंटर येथे शिलशंकर माऊली हे प्रवीणकडून दररोज चार ते पाच तास सराव करून घेतात. प्रवीणने सब ज्युनिअर कुस्तीस्पर्धेत मागील वर्षी सुवर्णपदक, तर यावर्षी रौप्यपदक पटकाविले आहे. त्याच्या या कामगिरीने सर्वत्र कौतुक होत आहे.
पुणे येथे सुरू असलेल्या ‘खेलो इंडिया’ स्पर्धेत ५५ किलो वजनी गटात प्रवीणने महाराष्ट्राला
पहिले सुवर्णपदक पटकावून देत मानाचा तुरा खोवला आहे. प्रवीणला रविदादा शिंदे, विकास पोवार यांनी वेळोवेळी अनेक प्रकारची मदत केली आहे.
आम्ही केलेल्या कष्टाचे प्रवीणने सोने केले. यापुढेही त्याने असे उज्ज्वल यश मिळवावे.
- पांडुरंग पाटील, वडील.
राज्यासाठी सुवर्णपदक जिंकले ही अभिमानाची बाब असून, यापुढेही त्याने आॅलिम्पिक स्पर्धेत पदक मिळवावे व देशाचे नाव उज्ज्वल करावे.
-प्रा. बाजीराव पाटील,
सचिव, कोल्हापूर शहर राष्ट्रीय तालीम संघ.