देशाच्या एकतेसाठी ख्रिस्ती बांधवांची प्रार्थना : कोल्हापूर चर्चमध्ये गर्दी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 26, 2018 12:41 AM2018-12-26T00:41:31+5:302018-12-26T00:43:38+5:30
कोल्हापूर : देशाच्या एकतेसाठी प्रार्थना करीत आणि विविध सामाजिक उपक्रम राबवीत नाताळचा सण मंगळवारी धार्मिक वातावरणात आणि उत्साहात ख्रिस्ती ...
कोल्हापूर : देशाच्या एकतेसाठी प्रार्थना करीत आणि विविध सामाजिक उपक्रम राबवीत नाताळचा सण मंगळवारी धार्मिक वातावरणात आणि उत्साहात ख्रिस्ती बांधवांनी साजरा केला. शहरातील विविध चर्चमध्ये विशेष प्रार्थना झाल्या.
गेले आठवडाभर सुरू असलेली कॅरोल सिंगिंगची धूम, विविध कार्यक्रमांची रेलचेल, नवीन कपडे घालून प्रार्थनेसाठी आलेले नागरिक, एकमेकांना देण्यात येणाऱ्या शुभेच्छा, यामुळे चर्च आणि परिसरामध्ये उत्साहाचे वातावरण होते.
शहरातील वायल्डर मेमोरियल चर्च, ख्राईस्ट चर्च, विक्रमनगर चर्च, ब्रह्मपुरी येथील सुवार्तांचे पवित्र मंदिर या चर्चमध्ये विशेष भक्तीचे आयोजन केले होते. गेल्या १५ दिवसांपासून ााताळची लगबग सर्वत्र जाणवत होती. तीन दिवसांपूर्वी कॅरोल सिंगिंगला सुरुवात झाली. क्वायर गु्रप घरोघरी जाऊन नाताळची गाणी गात होते. सोमवारी रात्री १२ वाजता फटाके वाजवून नाताळ सणाचे स्वागत करण्यात आले. मंगळवारी सकाळी आठ वाजल्यापासून नाताळच्या भक्ती उपासनेला सुरुवात झाली.
न्यू शाहूपुरी येथील वायल्डर मेमोरियल चर्चमध्ये इंग्रजी आणि मराठी अशा दोन्ही उपासनेवेळी रेव्ह. जे. ए. हिरवे, रेव्ह. डी. बी. समुद्रे यांनी नाताळचा संदेश दिला. विक्रमनगर चर्चमध्ये रेव्ह. आर. आर. मोहिते, रेव्ह. संजय धनवडे यांनी भक्ती उपासना केली. नागाळा पार्क येथील ख्राईस्ट चर्च, केडीसी बँक येथे रेव्ह. भालचंद्र मोरे यांनी संदेश दिला. आॅल सेंटस् चर्च, तसेच ब्रह्मपुरी येथील सुवार्तिकांचे पवित्र मंदिर येथे रेव्ह. गोगटे संदेश दिला.सर्व चर्चमध्ये सकाळपासूनच ख्रिस्ती बांधवांची गर्दी दिसत होती. नवे कपडे घालून आलेल्या अबालवृद्धांचा उत्साह यावेळी दिसून येत होता. आणखी आठवडाभर शहरासह जिल्ह्णात नाताळचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत.
कळंबा कारागृहात कैद्यांसाठी प्रार्थना
वायल्डर मेमोरियल चर्चच्या वतीने मंगळवारी सकाळी कळंबा मध्यवर्ती कारागृहात कैद्यांच्या सुधारणेसाठीही प्रार्थना करण्यात आली. तसेच समाजातील गरजू महिलांना साड्यांचे वाटप करण्यात आले.
कोडोली चर्च परिसरात विविध कार्यक्रम
कोडोली : कोडोली (ता. पन्हाळा) येथे मंगळवारी नाताळ मोठ्या उत्साहात साजरा झाला. नाताळनिमित्त चर्च विद्युत रोषणाईने सजविण्यात आला होता. चर्चमध्ये धार्मिक कार्यक्रम उत्साहात पार पडले. १९१९ मध्ये चर्चची भव्य अशी इमारत बांधण्यात आली आहे. तेंव्हापासून कोडोलीसह परिसरातील विविध गावांतील ख्रिश्चन बांधव चर्चमध्ये एकत्र येतात. सकाळी केसीसी चर्चच्या वतीने, तर दुपारी केडीसीच्या वतीने भक्ती घेतली. यावेळी इच्छा व आकांक्षा पूर्ण करण्यासाठी प्रार्थना करण्यात आली. सकाळपासून दान अर्पण करण्याकरिता ख्रिश्चन बांधवांबरोबरच विविध समाजातील लोक आले होते. यामध्ये अन्न, धान्य, वेगवेगळ्या वस्तू, कपडे यांचे दान जमा झाले. या दानाचा लिलाव रात्री करण्यात येतो. चर्च परिसरात विविध प्रकारचे पाळणे, मिठाई व खाद्यपदार्थांचे तसेच मनोरंजनाचे स्टॉल उभारण्यात आले होते.