प्रयाग चिखली, आंबेवाडी गावांना अद्यापही बेटाचे स्वरूप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2021 04:26 AM2021-07-27T04:26:32+5:302021-07-27T04:26:32+5:30

वडणगे : करवीर तालुक्यातील प्रयाग चिखली, आंबेवाडी गावांना अजूनही बेटाचे स्वरूप आहे. सोमवारी दिवसभरात तीन फूट ...

Prayag Chikhali, Ambewadi villages still look like islands | प्रयाग चिखली, आंबेवाडी गावांना अद्यापही बेटाचे स्वरूप

प्रयाग चिखली, आंबेवाडी गावांना अद्यापही बेटाचे स्वरूप

googlenewsNext

वडणगे : करवीर तालुक्यातील प्रयाग चिखली, आंबेवाडी गावांना अजूनही बेटाचे स्वरूप आहे. सोमवारी दिवसभरात तीन फूट पाणी कमी झाले. मात्र, पाणी अत्यंत संथगतीने ओसरत असल्यामुळे चिखली - आंबेवाडी मुख्य रस्त्यावर चार फुटावर पाणी आहे, त्यामुळे गावाचा संपर्क तुटलेलाच होता.

दोन्ही गावांतील घरे पूर्णपणे पाण्याखाली गेल्यामुळे गावातील गल्ल्यागल्ल्यांमध्ये गाळ साचलेला असून, स्वच्छतेचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. गावामध्ये दुर्गंधी पसरू लागली आहे. गावकरी आपापल्यापरीने आपले घर व परिसर स्वच्छ करण्यात गुंतले आहेत. अवघ्या आठ तासात पुराचे पाणी भरल्यामुळे चिखली येथील अनेक जनावरे गावामध्ये अडकली होती. त्यापैकी काही जनावरांना घरांच्या टेरेसवर ठेवले होते. त्यांना खाली उतरून घेण्याची कसरत दूध उत्पादकांना करावी लागली.

पाऊस थांबल्यामुळे आणि ग्रामस्थांच्या सतर्कतेमुळे जीवितहानी झालेली नसली तरी घरे पूर्णपणे पाण्याखाली गेल्यामुळे लोकांच्या सांसारिक साहित्याचे मोठे नुकसान झाले आहे.

दरम्यान, कोल्हापूर - रत्नागिरी महामार्गावर सोमवारी सायंकाळपर्यंत शिवाजी पूल ते आंबेवाडी दरम्यान दोन फूट पाणी होते तर रेडडोह ते रजपूतवाडी दरम्यान चार फुटांपर्यंत पाणी अद्याप कायम आहे. पाणी ओसरण्याचा वेग पाहता या रस्त्यावरील संपूर्ण पाणी मंगळवारी सायंकाळपर्यंत ओसरेल, अशी शक्यता आहे. दरम्यान, चिखली गावाशी पाण्यामुळे अद्यापही संपर्क होत नसल्यामुळे ग्रामस्थांना सर्वप्रथम अत्यावश्यक सेवा म्हणून केवल भय्या ग्रुपच्यावतीने जीवनावश्यक वस्तू आणि वैद्यकीय सेवा पुरविण्यासाठी सोमवारी दिवसभर कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.

Web Title: Prayag Chikhali, Ambewadi villages still look like islands

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.