प्रयाग चिखली ग्रामसभेत गोंधळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 17, 2017 01:03 AM2017-08-17T01:03:48+5:302017-08-17T01:03:48+5:30

Prayag Chikhali Gram Sabha | प्रयाग चिखली ग्रामसभेत गोंधळ

प्रयाग चिखली ग्रामसभेत गोंधळ

googlenewsNext



लोकमत न्यूज नेटवर्क
वडणगे : प्रयाग चिखली (ता. करवीर) येथील ग्रामसभेत दोन कोटी ११ लाखांच्या पेयजल योजनेच्या मुद्द्यावरून प्रचंड गोंधळ होऊन दोन्ही गटांत तुंबळ हाणामारी झाली. यामध्ये काहीजण किरकोळ जखमी झाले. दोन्ही गटांच्या समांतर सभा व घोषणाबाजीने गावात दिवसभर तणावपूर्ण वातावरण होते. पोलिसांनी हस्तक्षेप करून दोन्ही गटांच्या लोकांना ग्रामपंचायत आवारातून हटविण्यात आले. घटनास्थळी करवीरचे पोलीस निरीक्षक दिलीप जाधव यांनी भेट देऊन पोलीस गाडीसह मोठा पोलीस बंदोबस्त तैनात केला. त्यामुळे गावाला पोलीस छावणीचे स्वरूप आले होते.
१५ आॅगस्टनिमित्त बोलविण्यात आलेल्या गावसभेच्या अध्यक्षस्थानी सरपंच नूतन भगतसिंग रजपूत होत्या. ग्रामपंचायत सदस्य व पेयजल योजनेचे अध्यक्ष केवलसिंह रजपूत यांनी प्रास्ताविकात केलेल्या कामांचा आढावा घेऊन पेयजल योजनेच्या कामाबाबत माहिती देत असताना विरोधकांनी पेयजलच्या कारभारावर आक्षेप घेतला.
यावेळी नळजोडणीकरिता आदा केलेली रक्कम आणि कामाचे मूल्यांकन याबाबत माजी जि. प. सदस्य एस. आर. पाटील व बळी कळके यांनी प्रश्न उपस्थित केले. या प्रश्नांचा खुलासा करण्यावरून सभेत दोन्ही गटांच्या लोकांकडून गोंधळास सुरुवात झाली. त्यातूनच वादावादी होऊन हातघाई सुरू झाली. बघता-बघता सभागृहात धुमश्चक्री उडाली. यात सभागृहात मिळेल ते साहित्य भिरकावण्यात येऊ लागले. खुर्च्यांचीही फेकाफेकी करण्यात आली. दोन्ही गटांकडील कार्यकर्ते एकमेकांवर अक्षरक्ष: तुटून पडलेले होते. यामध्ये अनेकजण किरकोळ जखमी झाले. बराच वेळ गदारोळ चालू होता.
त्यानंतर दोन्ही गटांचे लोक सभागृहातून बाहेर येऊन देखील अंगावर धावून जाण्याचे प्रकार करीत होते. ग्रामपंचायत प्रांगणात दोन्ही गटांनी तळ ठोकून समांतर सभा घेतल्या. त्या ठिकाणी एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करीत होते. दरम्यानच्या काळात घटनास्थळी करवीर पोलिसांची कुमक आली. त्यांनी दोन्ही गटांना शांततेचे आवाहन केले; परंतु दोन्ही गटांनी घोषणाबाजी सुरूच ठेवल्याने वातावरण तणावाचे बनले. त्यानंतर पोलिसांची जादा कुमक मागवून लोकांना घटनास्थळावरून पांगविले. या पार्श्वभूमीवर गावात दिवसभर पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आलेला होता.

Web Title: Prayag Chikhali Gram Sabha

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.