कोल्हापुरात उद्या नाताळनिमित्त सर्व चर्चमध्ये प्रार्थना, गाण्यांचे, सामाजिक उपक्रमांचेही आय़ोजन
By संदीप आडनाईक | Published: December 24, 2023 07:15 PM2023-12-24T19:15:52+5:302023-12-25T11:34:17+5:30
शहर आणि जिल्ह्यात उद्या, सोमवारी मोठ्या उत्साहात नाताळ साजरा होत आहे.
कोल्हापूर : शहर आणि जिल्ह्यात उद्या, सोमवारी मोठ्या उत्साहात नाताळ साजरा होत आहे. सकाळी आठ वाजल्यापासूनच सर्व चर्चमध्ये देशाच्या शांततेसाठी, आरोग्यासाठी यावेळी विशेष प्रार्थना, भक्ती, उपासना, गाण्यांचे तसेच विविध सामाजिक उपक्रमांचेही आय़ोजन करण्यात आले आहे. प्रभू येशू ख्रिस्तांचा जन्मदिवस (२५ डिसेंबर) सर्वत्र नाताळ सण म्हणून साजरा केला जातो. डिसेंबर महिना सुरू झाला की, सर्वत्र नाताळच्या कार्यक्रमांना सुरुवात होते. येशू ख्रिस्तांच्या जन्मावर आधारित गाणी, नाटिका कार्यक्रमातून सादर केल्या जातात.
नाताळच्या पूर्वसंध्येला सर्वत्र झगमगाट आहे. सर्वात जुन्या आणि इतरही चर्चवर तसेच शहरातील दुकाने, इमारती, मॉल्सवर आकर्षक विद्यूत रोषणाई, सजावट करण्यात आली आहे. कोल्हापूर शहरात आठ ते दहा प्रमुख चर्च आहेत. शहरातील वायल्डर मेमोरियल चर्च,ख्राईस्ट चर्च,सेंव्हथ डे चर्च, ऑल सेंटस चर्च, होली इव्हॅजलिस्ट चर्च, ब्रम्हूपूरी, विक्रमनगर ख्रिस्ती समाज चर्चसह सर्वच लहान मोठ्या चर्चमधून नाताळनिमित्त आज ख्रिस्त जन्माचा सोहळा आणि प्रार्थना केल्या जाणार आहे. कॅडल लाईट सर्विसचेही आय़ोजन केले आहे. याशिवाय इतरत्रही प्रार्थनासभा होत असतात. जिल्ह्यात ख्रिस्ती बांधवांची संख्या मोठी आहे.
गेल्या तीन दिंवसापासून ख्रिस्ती वसाहती व घरांमधून कॅरोल सिंगिगची धूम सुरु आहे. नाताळची गाणी गात तरुण,तरुणीचे ग्रुप घरोघरी भेट देत आहेत.घरोघरी केक, डोनट आणि विविध गोड पदार्थ बनविण्यात आले आहेत. त्यामुळे शहरात वातावरण नाताळमय झाले आहे. बाजारपेठही नाताळच्या स्वागतासाठी सज्ज झाली आहे. विविध बेकरी हॉटेल्स, इमारती, मॉल्स, रेस्टॉरंटमध्येही विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. सांताक्लॉजचे मुखवटे आणि ख्रिसमस ट्री लाऊन त्यावर आकर्षक विद्युत रोषणाई केली आहे. आठवडाभर नाताळचे कार्यक्रम, विविध धार्मिक आणि सामाजिक कार्यक्रम सुरू राहणार आहेत. अनाथ मुलांना, रुग्णांना फळे आणि खाऊवाटप, साड्या वाटप आदी उपक्रमांचे आयोजन केले आहे.