११८१ थकबाकीदारांना जप्तीपूर्व वसुली नोटीस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 17, 2020 04:49 AM2020-12-17T04:49:36+5:302020-12-17T04:49:36+5:30
कोल्हापूर : महानगरपालिका घरफाळा विभागाने वर्षानुवर्षे घरफाळा न भरणाऱ्या शहरातील थकबाकीदार मिळकतधारकांवर कारवाईचा बडगा उगारला असून त्याचाच एक भाग ...
कोल्हापूर : महानगरपालिका घरफाळा विभागाने वर्षानुवर्षे घरफाळा न भरणाऱ्या शहरातील थकबाकीदार मिळकतधारकांवर कारवाईचा बडगा उगारला असून त्याचाच एक भाग म्हणून बुधवारी ११८१ मिळकतधारकांना थकबाकी वसुलीच्या जप्तीपूर्व नोटिसा बजावल्या. या थकबाकीदारांकडे सुमारे ३५ कोटी २४ लाखांची थकबाकी आहे.
यामध्ये गांधी मैदान विभागीय कार्यालयअंतर्गत १३१ थकबाकीदारांना रक्कम रुपये दोन कोटी ९६ लाख ३५ हजार ४८३ इतक्या थकबाकीपोटी जप्तीच्या नोटिसा बजाविण्यात आल्या आहेत. शिवाजी मार्केट विभागीय कार्यालय अंतर्गत १०० थकबाकीदारांना रक्कम रुपये दोन कोटी ५६ लाख ६९ हजार ४९६ इतक्या थकबाकीपोटी जप्तीच्या नोटिसा बजाविण्यात आल्या आहेत. राजारामपुरी विभागीय कार्यालयअंतर्गत ८०० थकबाकीदारांना १६ कोटी ८३ लाख ४७ हजार ५४२ इतक्या, ताराराणी मार्केट विभागीय कार्यालय अंतर्गत १५० थकबाकीदारांना १३ कोटी १८ लाख ५६ हजार ०३२ इतक्या थकबाकीपोटी जप्तीच्या नोटिसा बजाविण्यात आल्या आहेत.
शहरातील एकूण ११८१ मिळकतधारकांकडून रक्कम रुपये ३५ कोटी २४ लाख ०८ हजार ५५३ रुपयांची वसुली जप्तीद्वारे केली जाणार आहे. या मिळकतीमधील भोगवटदारांनी मिळकतीचा कर विहित मुदतीत न भरल्यास त्या मिळकतीस सील बंदची कार्यवाही करण्यात येईल, असा इशारा साहाय्यक आयुक्त विनायक औंधकर यांनी दिला आहे.