मान्सूनपूर्व पावसाने कोल्हापूर शहराला झोडपले--टाकाळा, नागाळा पार्क येथे झाडे पडली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 1, 2020 11:13 AM2020-06-01T11:13:54+5:302020-06-01T11:14:19+5:30

शहरात तर सर्वत्र पाणीच पाणी झाले. टाकाळ्याजवळ घरावरच झाड पडले. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आणि नागाळा पार्कातील नागोबा मंदिराच्या परिसरात झाडे रस्त्यावर पडल्याने वाहतूक काहीशी विस्कळीत झाली होती.

 Pre-monsoon rains lashed the city | मान्सूनपूर्व पावसाने कोल्हापूर शहराला झोडपले--टाकाळा, नागाळा पार्क येथे झाडे पडली

मान्सूनपूर्व पावसाने कोल्हापूर शहराला झोडपले--टाकाळा, नागाळा पार्क येथे झाडे पडली

Next
ठळक मुद्देजनजीवन विस्कळीत

कोल्हापूर : हवामान खात्याचा अंदाज तंतोतंत खरा ठरवत रविवारी दुपारपासून मान्सूनपूर्व पावसाने जिल्ह्याला झोडपून काढले. सोसाट्याचा वारा आणि विजांच्या कडकडाटासह आलेल्या या मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत केले. शहरात तर सर्वत्र पाणीचपाणी झाले. टाकाळ्याजवळ घरावरच झाड पडले. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आणि नागाळा पार्कातील नागोबा मंदिराच्या परिसरात झाडे रस्त्यावर पडल्याने वाहतूक काहीशी विस्कळीत झाली होती.

दरम्यान, या पावसामुळे गेल्या आठ दिवसांपासून उष्म्याने हैराण झालेल्या कोल्हापूरकरांनी गारवा अनुभवला. जोरदार बरसलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला असून, पेरणीच्या हंगामाला गती येणार आहे.

मान्सून येण्यास अजून आठवड्याचा कालावधी असला तरी रविवारपासून राज्यभर मान्सूनपूर्व वादळी पाऊस बरसेल, असा अंदाज भारतीय हवामान खात्यासह स्कायमेट या खासगी हवामान संस्थेनेही वर्तविला होता.

त्यानुसार सकाळपासूनच पावसाचे वातावरण होते. सकाळी दहानंतर मात्र वातावरण निवळले. दुपारी दीडनंतर पुन्हा ढग जमू लागले आणि दोनच्या सुमारास जोरदार पावसाला सुरुवात झाली.

संध्याकाळपर्यंत थांबून-थांबून सरी बरसत राहिल्या. संपूर्ण जिल्हाभर असेच चित्र राहिले.


पावसाने बाजार विस्कटला
लॉकडाऊनमुळे सकाळी नऊ ते दुपारी तीन या वेळेतच बाजार भरतो. दुपारी दोनलाच पावसाने जोरदार आगमन करीत सर्व बाजारच विस्कटून टाकला. जोरदार पाऊस आणि येणाऱ्या पाण्याच्या लोंढ्यातून भाजीपाला वाचवताना विक्रेत्यांची तारांबळ उडाल्याचे चित्र लक्ष्मीपुरीत होते.

पिकांना जीवदान
गेल्या १५ दिवसांपासून वळवाच्या पावसाने जिल्ह्याकडे पाठ फिरवल्याने माळरानासह बागायती क्षेत्रातील पिकांचीही होरपळ होत होती. रविवारी बरसलेल्या पावसामुळे या होरपळणाºया पिकांना जीवदान मिळाल्याने शेतकरी सुखावला आहे.

धूळवाफ पेरा साधणार
पाण्याची उपलब्धता नसलेल्या ठिकाणी मान्सूनपूर्व पावसाच्या भरवशावर भाताच्या धूळवाफ पेरण्या होतात. सध्या धूळवाफ पेरण्या झाल्या आहेत. दमदार पावसामुळे हा पेरा आता साधणार असल्याने शेतकऱ्यांत आनंदाचे वातावरण आहे.

Web Title:  Pre-monsoon rains lashed the city

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.