अल्पसंख्यांवर पूर्वनियोजित हल्ले
By admin | Published: June 19, 2014 01:07 AM2014-06-19T01:07:13+5:302014-06-19T01:14:10+5:30
सरकारला अहवाल देणार : मुनाफ हकीम यांचा आरोप
कोल्हापूर : पंधरा दिवसांपूर्वी राज्यात ठिकठिकाणी विशिष्ट समाजावर झालेले हल्ले हे विशिष्ट हेतूने आणि पूर्वनियोजित होते, या निष्कर्षापर्यंत राज्य अल्पसंख्याक आयोग पोहोचला असून, या हल्ल्याचा वस्तुनिष्ठ अहवाल राज्य सरकारला लवकरच देण्यात येईल, अशी माहिती आयोगाचे अध्यक्ष मुनाफ हकीम यांनी आज, बुधवारी पत्रकार परिषदेत दिली.
राज्यात ज्या जिल्ह्यात विशिष्ट समाजावर हल्ले झाले त्या त्या जिल्ह्यात जाऊन आयोगाने माहिती घेतली. आज मुनाफ हकीम यांच्यासह आयोगाचे सचिव हुसेन मुजावर, डॉ. दत्तात्रय गायकवाड (पुणे), डॉ. मुमताज सय्यद (मुंबई), सुरजितसिंग खुंगर (औरंगाबाद) या सदस्यांनी कोल्हापुरातील दुर्घटनाग्रस्त भागात पाहणी केली.
त्यांनतर आयोगाच्या सदस्यांनी श्रीमंत शाहू महाराज, प्रा. डॉ. एन.डी. पाटील यांची भेट घेतली व त्यांच्याकडून माहिती घेतली. पोलीस अधीक्षक मनोजकुमार शर्मा, निवासी उपजिल्हाधिकारी संजय पवार यांच्याशी चर्चा करून घटनेची माहिती घेतली.
पत्रकारांशी बोलताना हकीम म्हणाले की, ‘छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमांच्या विटंबनेनंतर राज्यात अनेक ठिकाणी दगडफेक, लुटमार, जाळपोळ अशा अनुचित घटना घडल्या आहेत. राज्यात जेथे अशा घटना घडल्या, त्या पाहिल्या असता या घटना पूर्वनियोजित होत्या. कारण या घटनांमध्ये विशिष्ट समाजालाच टार्गेट करण्यात आले आहे. सर्वत्र एकाच पद्धतीने हल्ले झाले आहेत.
राज्यात यापूर्वी प्रार्थनास्थळांवर कधीही हल्ले झाले नव्हते; परंतु १६ ते २१ वयोगटांतील तरुणांना संघटित करून त्यांना विघातक मार्गाकडे वळविण्यात आले. जर अशा वयोगटांतील तरुणांची नावे पोलीस दफ्तरी नोंद झाली, तर त्यांच्या रोजगाराचा, नोकरीचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. एक पिढी उद्ध्वस्त करण्याचा हा डाव आहे की काय, अशी शंका येते.
राज्यात जरी शांतता असली, तरी अल्पसंख्याक समाज आजही दहशतीखाली आहे. विशेषत: ग्रामीण भागात ही परिस्थिती प्रकर्षाने जाणवते. म्हणून प्रतिमा विटंबना करणाऱ्यांचा शोध लावून पुन्हा समाजात अशांतता निर्माण होणार नाही, याची पोलिसांनी खबरदारी घेतली पाहिजे, अशी सूचनाही हकीम यांनी यावेळी दिली. (प्रतिनिधी)