‘गडहिंग्लज’मधून परिवर्तनाची नांदी
By admin | Published: September 12, 2016 01:10 AM2016-09-12T01:10:02+5:302016-09-12T01:10:02+5:30
चंद्रकांतदादा पाटील : शहापूरकर-चव्हाणांचा समर्थकांसह भाजपमध्ये प्रवेश
गडहिंग्लज : चंदगड, आजरा, पेठवडगाव व कुरुंदवाडनंतर अनेकजण प्रवेशाच्या रांगेत आहेत. प्रकाश शहापूरकर व प्रकाश चव्हाणांचा आनंददायी प्रवेश जिल्ह्याच्या राजकारणाला नवे वळण देणारा आहे. किंबहुना, जिल्ह्यातील आगामी परिवर्तनाची नांदी गडहिंग्लजमधून झाली आहे, असे प्रतिपादन पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी केले.
गडहिंग्लज कारखान्याचे माजी अध्यक्ष शहापूरकर व माजी उपाध्यक्ष चव्हाण यांनी आपल्या समर्थकांसह भाजपमध्ये प्रवेश केला. यानिमित्त आयोजित कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात ते बोलत होते. भाजपचे स्कार्प व कमळपुष्प देऊन त्यांचा शहापूरकर व चव्हाणांसह त्यांच्या समर्थकांचे स्वागत करण्यात आले.
चंद्रकांतदादा म्हणाले, महानगरपालिका व जिल्हा परिषदेत आपली सत्ता नसल्यामुळे विकासकामे करताना अडचणी येत आहेत. ग्रामपंचायतीपासून जिल्हा परिषदेपर्यंत सत्ता आणि जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी कामाला लागा.
आमदार सुरेश हाळवणकर म्हणाले, भुदरगड व गडहिंग्लज भागातील जनतेचे दारिद्र्य व दु:ख संपवायला आम्ही भूमिपुत्र वचनबद्ध आहोत. उद्योजकांची परिषद घेऊन गडहिंग्लज व चंदगडच्या एमआयडीसीला चालना देण्याबरोबर रखडलेले सिंचन प्रकल्प पूर्ण केले जातील.
शहापूरकर म्हणाले, राष्ट्रवादीमुळे गडहिंग्लजची ससेहोलपट झाली असून, भ्रष्टाचारामुळे तालुका रसातळाला गेला आहे. राष्ट्रीय पेयजल योजनांच्या तालुक्यातील कामांची चौकशी करण्याबरोबरच उचंगी व आंबेओहोळ प्रकल्प, आजरा-आंबोली रस्ता, तालुका क्रीडासंकुल व गडहिंग्लज शहरातील नाट्यगृहाचा प्रश्न पालकमंत्र्यांनी मार्गी लावावा.
चव्हाण म्हणाले, पाच वर्षांत गडहिंग्लज कारखान्याची सत्ता पुन्हा ताब्यात घेऊ आणि आगामी निवडणुकीत विश्वासघातकी मंडळींना जागा दाखवू. विकासासाठी गडहिंग्लज विभाग पालकमंत्र्यांनी दत्तक घ्यावा. जिल्हाध्यक्ष हिंदुराव शेळके, गोपाळराव पाटील, अनिता पेडणेकर यांनीही मनोगत व्यक्त केले. बेळगावचे आमदार संजय पाटील, बाबूराव कुंभार, अॅड. विकास पाटील, रमेश रिंगणे, उदय चव्हाण, मारुती राक्षे, अनिल खोत, मार्तंड जरळी, विजय मगदूम, प्रेमा विटेकरी, आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते. एल. टी. नवलाज यांनी स्वागत केले. हेमंत कोलेकर यांनी प्रास्ताविक केले. सुभाष कोरी यांनी सूत्रसंचालन केले. चंद्रकांत सावंत यांनी आभार मानले.
यांचाही भाजपमध्ये प्रवेश
गडहिंग्लज साखर कारखान्याचे विद्यमान संचालक किरण पाटील, सुभाष शिंदे व अनंत कुलकर्णी. माजी संचालक सुभाष शिरकोळे, बचाराम मोहिते, चंद्रकांत जांगनुरे, आण्णाप्पा मणीकेरी, चंद्रकांत कांबळे, बाबूराव मदकरी, आबासाहेब देसाई, रमेश आरबोळे व अॅड. सुभाष शिंदे, माजी सभापती आप्पासाहेब पाटील, नागाप्पा हत्ती, गडहिंग्लज बाजार समितीचे उपसभापती रवींद्र शेंडुरे, जि. प. माजी सदस्य गणपतराव डोंगरे, मल्लिकार्जुन बेल्लद, युवराज बरगे, विद्या गोसावी, संतोष
चिक्कोडे, सतीश हळदकर यांच्यासह गडहिंग्लज शहर राष्ट्रवादीचे अध्यक्ष वसंत यमगेकर यांचे सुपुत्र तुषार यमगेकर यांनीही भाजपमध्ये प्रवेश केला. (प्रतिनिधी)