युद्धामुळे भारतीयत्वाच्या भावनेची प्रचिती

By admin | Published: September 30, 2015 12:33 AM2015-09-30T00:33:38+5:302015-09-30T00:34:30+5:30

विश्वास दांडेकर : शिवाजी विद्यापीठामध्ये राज्यशास्त्र विभागाचे चर्चासत्र

Predictability of Bharatiya Bhavya by war | युद्धामुळे भारतीयत्वाच्या भावनेची प्रचिती

युद्धामुळे भारतीयत्वाच्या भावनेची प्रचिती

Next

कोल्हापूर : देशाच्या विविधतेतील एकता आणि त्यातून निर्माण होणाऱ्या भारतीयत्वाच्या भावनेमधील ताकदीची प्रचिती १९६५ व १९७१ च्या युद्धांमुळे जगाला आली, असे प्रतिपादन ज्येष्ठ विश्लेषक विश्वास दांडेकर यांनी मंगळवारी येथे केले.
शिवाजी विद्यापीठाचा राज्यशास्त्र व इतिहास अधिविभाग आणि यशवंतराव चव्हाण स्कूल आॅफ रुरल डेव्हलपमेंट यांच्या संयुक्त विद्यमाने १९६५च्या भारत-पाक युद्धाच्या सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त आयोजित चर्चासत्रात ते बोलत होते. ‘१९६५चे युद्ध व आजची संरक्षण सिद्धता’ असा चर्चासत्राचा विषय होता. यावेळी ज्येष्ठ राजकीय विश्लेषक डॉ. अशोक चौसाळकर, कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे प्रमुख उपस्थित होते.
दांडेकर म्हणाले, १९६२ च्या चीनबरोबरील युद्धामध्ये पराभव झाल्यानंतर पाकिस्तानने युद्धासाठी तयारी सुरू केली होती. १९६५ चे भारत-पाकिस्तान युद्ध हे अनिर्णीत युद्ध होते. भारताकडे निर्विवाद विजयाच्या संधी आल्या होत्या. मात्र, काही कारणांमुळे आपण त्या गमावल्या. तथापि भारताच्या विविधतेतील ताकद १९६५ च्या युद्धाने जगाला समजली. विविधतेतून एकतेचे प्रतिबिंब भारतीय सेनेमध्ये आढळते. सेना व नागरी नेतृत्वांमध्ये सामंजस्य निर्माण करण्याचे बहुमोल श्रेय तत्कालीन पंतप्रधान लालबहादूर शास्त्री व संरक्षणमंत्री यशवंतराव चव्हाण यांना द्यावे लागेल. हुकूमशाहीचे आकर्षण हा निव्वळ मूर्खपणा आहे. हुकूमशाही कधीही, कोणत्याही प्रश्नाचे उत्तर असू शकत नाही. त्यापेक्षा हुकूमशाहीच्या समर्थकांनी लोकशाही अधिक परिपक्व व प्रगल्भ करण्यासाठी कोणते योगदान देता येईल, याचा साकल्याने विचार करावा.
डॉ. चौसाळकर म्हणाले, संरक्षण सिद्धतेच्या बाबतीत भारतीय सेनादलांकडे अत्याधुनिक तंत्रज्ञानाधारित शस्त्रसामग्रीची उपलब्धता होणे अत्यावश्यक आहे. युद्धाचा प्रसंग उद्भवल्यास दोन लक्ष कोटी रुपयांची शस्त्रास्त्रे परदेशांकडून विकत घ्यावी लागतील, असे नुकतेच संरक्षणमंत्री मनोहर पर्र्रीकर यांनी म्हटले आहे. संरक्षण उत्पादनाच्या क्षेत्रात दुर्दैवाने आपण फार पुढे जाऊ शकलेलो नाही.
कुलगुरू डॉ. शिंदे म्हणाले, आपल्या आजच्या स्वास्थ्यामागे फौजी बंधूंचे मोलाचे योगदान विसरता कामा नये. आता शक्ती-युक्तीच्या पलीकडे जाऊन तंत्रज्ञानाच्या बळावर युद्ध लढण्याचा आणि जिंकण्याचा काळ आला आहे. कार्यक्रमास यशवंतराव चव्हाण स्कूल आॅफ रुरल डेव्हलपमेंटचे प्रभारी संचालक डॉ. प्रकाश पवार, इतिहास अधिविभाग प्रमुख डॉ. पद्मजा पाटील, आदी उपस्थित होते. राज्यशास्त्र विभाग प्रमुख डॉ. भारती पाटील यांनी प्रास्ताविक केले.

Web Title: Predictability of Bharatiya Bhavya by war

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.