सौरपंप बसविण्यासाठी प्राधान्य द्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 7, 2020 04:18 AM2020-12-07T04:18:08+5:302020-12-07T04:18:08+5:30
कोल्हापूर : पाणी आवक क्षमता असलेल्या कोल्हापूर जिल्ह्यातील हातपंपांना सौरपंप बसविण्याबरोबरच ज्या हातपंपांची पाणी आवक क्षमता कमी आहे, त्याठिकाणी ...
कोल्हापूर : पाणी आवक क्षमता असलेल्या कोल्हापूर जिल्ह्यातील हातपंपांना सौरपंप बसविण्याबरोबरच ज्या हातपंपांची पाणी आवक क्षमता कमी आहे, त्याठिकाणी पुनर्भरण योजना राबविण्याची सूचना राज्याचे भूजल सर्व्हेक्षण व विकास यंत्रणेचे संचालक डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांनी केली.
कलशेट्टी यांनी शनिवारी येथील भूजल सर्व्हेक्षण व विकास यंत्रणेच्या जिल्हा कार्यालयातील कामकाजाचा आढावा घेतला, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी राज्याचे भूजल सर्व्हेक्षण व विकास यंत्रणेचे सहसंचालक मिलिंद देशपांडे, भूवैज्ञानिक ऋषीराज गोसकी, कनिष्ठ भूवैज्ञानिक शिवलिंग चव्हाण, सांगलीचे भूवैज्ञानिक जयंत मिसाळ, भूवैज्ञानिक दिलावर मुल्ला, संतोष गोंधळी, श्री. नदाफ यांच्यासह अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
डॉ. कलशेट्टी म्हणाले, संभाव्य काळातील टंचाई परिस्थितीत जिल्ह्यातील जनतेला पिण्याचे पुरेसे आणि स्वच्छ पाणी मिळावे, यासाठी आतापासूनच नियोजन करावे. भूजल अधिनियमाचेही जिल्ह्यात तंतोतंत पालन करण्यावरही भर द्या, अशी सूचनाही त्यांनी केली.
जिल्ह्यातील पाणीपुरवठा योजनांच्या उद्भवस्रोतांचे १०० टक्के नमुने तपासावेत, सर्व स्रोतांचे आयएमआयएस संकेतस्थळावर अद्ययावत करण्याचे कामही जिल्हा परिषदेच्या सहकार्यातून करावे. प्रयोगशाळा पूर्ण क्षमतेने कार्यरत करावी.
यावेळी त्यांनी अटल भूजल योजनेच्या अनुषंगाने सांगली जिल्ह्यातील कामाचाही आढावा घेतला. जलस्वराज्य टप्पा क्र. २ अंतर्गत जिल्ह्यात स्थापन करण्यात आलेल्या ९६४ निरीक्षण विहिरींची माहिती घेऊन त्यांचे वाचन घेण्याबाबत चर्चा करण्यात आली. तसेच जलजीवन मिशन अंतर्गत प्रस्तावित करण्यात आलेल्या उपाययोजनांचाही आढावा घेतला.