स्रावचाचणीसाठी नववी ते बारावीच्या शिक्षकांना प्राधान्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 21, 2020 05:49 PM2020-11-21T17:49:35+5:302020-11-21T17:51:15+5:30
Teacher, Education Sector, collector, kolhapur, School स्रावचाचणी करून घेण्यासाठी सर्वच शिक्षकांनी कोविड चाचणी केंद्रांवर झुंबड उडविल्याने अखेर यामध्ये सुसूत्रीकरण आणण्यासाठी सरसकट शिक्षकांनी स्रावचाचणीसाठी जाऊ नये, असे आवाहन जिल्हाधिकारी दौलत देसाई यांना करावे लागले. आता स्रावचाचणीसाठी नववी ते बारावीचे अध्यापन करणाऱ्या शिक्षकांना प्राधान्य द्यावे, अशा सूचना करण्यात आल्या आहेत.
कोल्हापूर - स्रावचाचणी करून घेण्यासाठी सर्वच शिक्षकांनी कोविड चाचणी केंद्रांवर झुंबड उडविल्याने अखेर यामध्ये सुसूत्रीकरण आणण्यासाठी सरसकट शिक्षकांनी स्रावचाचणीसाठी जाऊ नये, असे आवाहन जिल्हाधिकारी दौलत देसाई यांना करावे लागले. आता स्रावचाचणीसाठी नववी ते बारावीचे अध्यापन करणाऱ्या शिक्षकांना प्राधान्य द्यावे, अशा सूचना करण्यात आल्या आहेत.
उद्यापासून नववी ते बारावीपर्यंतचे वर्ग सुरू करायचे असल्याने त्याआधी माध्यमिक शिक्षकांनी स्रावचाचणी करून घ्यावी आणि या महिनाअखेरपर्यंत प्राथमिक शिक्षकांनीही स्रावचाचणी करून घ्यावी, अशा सूचना जिल्हा परिषदेकडून करण्यात आल्या होत्या. परिणामी, कोल्हापूर शहरासह बाराही तालुक्यांतील शिक्षकांनी चाचणीसाठी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली.
काही ठिकाणी पोलीस बंदोबस्तही मागवावा लागला. आता अनेक कोविड उपचार केंद्रे बंद केल्यामुळे तालुक्यातील प्रत्येकी एका केंद्रावर मोठा ताण आला. हाच ताण शेंडा पार्क येथील प्रयोगशाळेवरही पडला. त्यामुळे अहवाल विलंबाने मिळू लागले. जिल्हाधिकारी देसाई यांनी शुक्रवारी संध्याकाळी या परिस्थितीची माहिती घेतली आणि अन्य शिक्षकांनी चाचणीसाठी जाऊ नये असे आवाहन केले.
तसेच सर्वच माध्यमिक शिक्षकांनी चाचणीसाठी न जाता नववी ते बारावीच्या वर्गांना शिकवणाऱ्या शिक्षकांनी चाचणीसाठी जावे. एका शाळेतील दोन-दोन शिक्षकांनी चाचणीसाठी जावे अशा सूचना देण्यात आल्या आहेत. या चाचणीच्या अहवालास विलंब झाला तर अहवाल आल्यानंतर शाळा सुरू कराव्यात, अशाही सूचना देण्यात आल्या आहेत.