भरल्या पोटाने वृद्धाश्रमात दरवळला प्रेमाचा सुंगध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 15, 2018 12:16 AM2018-02-15T00:16:04+5:302018-02-15T00:16:17+5:30
कोल्हापूर : व्हॅलेंटाईन डे! आपले प्रेम व्यक्त करण्याचा दिवस. तरुणाईने व्हॅलेंटाईन डे पाश्चात्त्य संस्कृतीचे अनुकरण न करता व प्रेमी युगुलांपुरताच मर्यादित न ठेवता सामाजिक बांधीलकी जोपासत हा ‘प्रेम दिवस’ साजरा केला आहे. भारतीय जनता पार्टी क्रीडा आघाडी व पैलवान प्रतिष्ठानतर्फे ‘व्हॅलेंटाईन डे’ आर. के. नगर येथील मातोश्री वृद्धाश्रमातील वृद्धांना गुलाबाची फुले देत व त्यांना पंगतीच्या जेवणाची मेजवानी देत हा दिवस साजरा केला.
आजकाल प्रत्येकजण पैशामागे धावत आहे. स्वत:च्या मुलांनी आपल्या आई-वडिलांना वृद्धाश्रमाचा रस्ता दाखविला असताना, या वृद्धाश्रमातील वृद्धांशी त्यांचे कोणतेही ऋणानुबंध नसताना, भाजपा क्रीडा जिल्हाध्यक्ष व पैलवान प्रतिष्ठानचे संस्थापक महेश मोरे यांनी सामाजिक बांधीलकी जपत या वृद्धांसोबत वृद्धाश्रमात व्हॅलेंटाईन डे साजरा केला. प्रेम ही कधीच न बदलणारी संकल्पना असून, ती नेहमीच एका नव्या रूपात आपल्यासमोर येत असते. प्रेमाच्या बेधुंद लहरीत रंगणाºया प्रेमी युगुलांसाठी तर प्रत्येक दिवस नव्याने प्रेमात पाडणारा असतो. मात्र, पोटच्या पोरांचेच आपल्या आई-वडिलांवरील प्रेम आटत चालल्याने त्यांनी या वृद्धांना वृद्धाश्रमाचा रस्ता दाखविला. आमच्या नशिबात कुठले आलेय प्रेम अशी सल येथील वृद्धांच्या मनात असते. हेच दु:ख कमी करण्यासाठी व सामाजिक बांधीलकी जपत भाजपाचे कार्यकर्ते व पैलवान प्रतिष्ठानचे पदाधिकारी यांनी आर. के. नगर येथील मातोश्री वृद्धाश्रमातील वृद्धांसोबत व्हॅलेंटाईन डे साजरा केला.
येथील वृद्धांना गुलाबाची फुले वाटत, त्यांना पंगतीच्या जेवणाची मेजवानी देत, पदाधिकाºयांनी त्यांच्यासोबत मनसोक्त गप्पाही मारल्या. त्यांच्या या अनोख्या उपक्रमामुळे येथील वृद्ध भारावून गेले. त्यांच्या या सामाजिक बांधीलकीमुळे काही काळ येथील वृद्धांचे दु:ख हलके झाले. या उपक्रमात सचिन भोगम, रमेश हंकारे, संग्राम जाधव, राहुल वाले, सौरभ पाटील, सोन्या मोरे, मुरली पोळ, अक्षय कांबळे, चिनू वाले, आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते.