दोन गटांत पूर्ववैमनस्यातून जोरदार हाणामारी

By admin | Published: September 20, 2015 01:56 AM2015-09-20T01:56:16+5:302015-09-20T01:56:16+5:30

दोघे गंभीर : पोलिसांचा लाठीमार; पूर्ववैमनस्यातून घटना

Prehistoric violence in two groups | दोन गटांत पूर्ववैमनस्यातून जोरदार हाणामारी

दोन गटांत पूर्ववैमनस्यातून जोरदार हाणामारी

Next

मुरगूड : शहरातील मध्यभागी असणाऱ्या साळोखे गल्लीमध्ये दोन गटांत पूर्ववैमनस्यातून जोरदार हाणामारी झाली. यामध्ये दोघेजण गंभीर जखमी झाले आहेत. मुरगूड पोलिसांनी सौम्य लाठीमार करून जमावाला पांगविल्याने अनर्थ टळला. रात्री साडेदहा वाजता ही हाणामारी झाली. रात्री उशिरापर्यंत तुकाराम चौक, जमादार चौक व साळोखे गल्लीमध्ये प्रचंड बंदोबस्त तैनात करण्यात आला. परिसरातील वातावरण प्रचंड तणावाखाली आहे.
घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, साळोखे गल्लीमध्ये पाटील गट व जमादार गट असे गट आहेत. दोन महिन्यांपूर्वी येथील एका युवकाने मुरगूडमधील काही फोटो सोशल मीडियावर अपलोड केले होते. त्यावेळी किरकोळ वाद झाला होता. त्यावेळेपासून आजपर्यंत जमादार गटाच्या काही तरुण कार्यकर्त्यांनी पाटील गटाच्या कार्यकर्त्यांना डिवचण्याचा प्रयत्न केला होता. शनिवारी त्यातील एका कार्यकर्त्याने चप्पल दाखवल्याच्या कारणावरून या दोन गटांतील कार्यकर्ते एकमेकांना भिडले. यावेळी दोनशे ते अडीचशे लोकांचा जमाव बघता बघता जमल्याने वातावरण कमालीचे तणावपूर्ण बनले. या हाणामारीत दोन्ही गटांच्या काही कार्यकर्त्यांना गंभीर जखमा झाल्या. ही घटना पेट्रोलिंगला असणाऱ्या कॉन्स्टेबलने पोलीस ठाण्यास कळविल्यानंतर सहायक पोलीस निरीक्षक चंद्रकांत मस्के तत्काळ प्रचंड फौजफाटा घेऊन घटनास्थळी आले. सुरुवातीला त्यांनी दोन्ही गटांच्या प्रमुख कार्यकर्त्यांना समजावून सांगितले, पण कोणीच ऐकण्याच्या स्थितीत
नसल्याने शेवटी पोलिसांनी बळाचा वापर क रीत सौम्य लाठीमार केला. त्यानंतर जमाव पांगला. या मारामारीत कोण व किती जखमी झाले याची माहिती अद्याप समजू शकली नाही.
प्रतिबंधात्मक उपाय म्हणून पोलिसांनी जादा कुमक मागवून साळोखे गल्लीमध्ये मोठा बंदोबस्त ठेवला आहे.
दरम्यान, रात्री उशिरापर्यंत शहरामध्ये गटागटाने तरुण जमून या घटनेची माहिती घेत होते. दोन्ही गटांच्या कार्यकर्त्यांना सक्त ताकीद देऊन जमाव जमवल्यास कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा पोलिसांनी दिला आहे. ऐन गणेश चतुर्थीच्या दरम्यान हा वाद उफाळल्याने पोलिसांची मोठी तारांबळ उडाली.
रात्री उशिरापर्यंत पोलीस स्टेशनमध्ये या घटनेची नोंद झाली नव्हती. (प्रतिनिधी)

Web Title: Prehistoric violence in two groups

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.