अकाली मृत्यू वाढले, मृत्युपत्राची संख्या घटली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 2, 2021 04:20 AM2021-06-02T04:20:12+5:302021-06-02T04:20:12+5:30
कोल्हापूर : कोरोना आजाराच्या फैलावामुळे अचानक मृत्यू होणाऱ्यांची संख्या वाढली आहे. परिणामी, दीड वर्षापासून मुद्रांक प्रशासनाकडे नोंदणीकृत मृत्युपत्र करणाऱ्यांची ...
कोल्हापूर : कोरोना आजाराच्या फैलावामुळे अचानक मृत्यू होणाऱ्यांची संख्या वाढली आहे. परिणामी, दीड वर्षापासून मुद्रांक प्रशासनाकडे नोंदणीकृत मृत्युपत्र करणाऱ्यांची संख्या घटली आहे. जिल्हा मुद्रांक प्रशासनाकडून मिळालेल्या आकडेवारीवरून हे स्पष्ट झाले आहे. लॉकडाऊन असल्यानेही तालुक्याच्या ठिकाणी जाऊन अनेकांना मृत्युपत्र करण्यात अडचणी येत आहेत. यापूर्वी वर्षाला सरासरी ८२५ मृत्युपत्रे होत होती. आता ही संख्या ७०० पर्यंत आली आहे.
मृत्यूनंतर आपली स्थावर आणि जंगम मालमत्ता कायदेशीररीत्या कुणाला मिळावी, यासाठी मृत्युपत्र केले जाते. मृत्युपत्र केल्याने संबंधिताच्या वारसांमध्ये मृत्यूनंतर न्यायालयीन वाद फारसे होत नाहीत. यामुळे साध्या मुद्रांक पत्रकावर किंवा नोंदणीकृत मृत्युपत्र केले जाते. गेल्या दहा वर्षांत मृत्युपत्र करणाऱ्यांची संख्या वाढत असल्याचे जिल्हा मुद्रांक प्रशासनाचे म्हणणे आहे. पन्हाळा, राधानगरी, गगनबावडा, आजरा, चंदगड हे दुर्गम तालुके वगळता जिल्ह्याच्या इतर तालुक्यांत रोज सरासरी एक ते दोन मृत्युपत्र २०१९ पर्यंत होत होती. सन २०२० मध्ये कोरोनाचा फैलाव जिल्ह्यात सुरू झाला. त्यानंतर मृत्युपत्र करणाऱ्यांची संख्या घटली. प्रवासावर निर्बंध आणल्याने इच्छा असतानाही अनेकांना मृत्युपत्र करता आले नाही. अकाली निधन झाल्याच्याही घटना घडत आहेत. कोरोनाचा प्रभाव अजूनही कायम असल्याने गेल्या महिनाअखेरपर्यंतही त्याची संख्या कमीच आहे.
कोट
कोरोनाचा फैलाव झाल्याने इच्छा असूनही अनेकांना मृत्युपत्र करता आलेले नाही. मृत्युपत्र करून देणाऱ्याची शारीरिक, मानसिक स्थिती चांगली असावी. त्याने दोन साक्षीदारांसमोर मृत्युपत्र केल्यास त्याला कायदेशीर मान्यता आहे. यासाठी मुद्रांक कार्यालयात जाऊनच ही प्रक्रिया करावी, असे नाही, घरातही मुद्रांंकपत्रावर मृत्युपत्र करता येते.
ॲड. धैर्यशील सुतार
कोट
कोरोनामुळे मृत्युपत्र करण्यात अनेक अडचणी येत आहेत. यामुळे अलीकडे मृत्युपत्राची संख्या कमी झाली आहे. ज्येष्ठामध्ये मृत्युपत्र करण्याची मानसिकता जास्त असते. असुरक्षित वाटत असल्याने तेही कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करतात. गंभीर आजारी असल्यास काही तरुण मृत्युपत्र करतात; पण अशांचे प्रमाण कमी आहे.
ॲड. अजित मोहिते
चौकट
दहा टक्के घट
जिल्ह्यात सन २०१८ साली ८११, सन २०१९ मध्ये ७०७, सन २०२० मध्ये ७७१ आणि या वर्षी मे २०२१ पर्यंत २४५ जणांनी मृत्युपत्र केले आहे. तीन वर्षांच्या आकडेवारीनुसार सर्वाधिक मृत्युपत्र २०१८ मध्ये झाले आहेत. त्यानंतर २०१९ मध्ये वर्षभरात १०४ नी मृत्युपत्रांची संख्या घटली. २०२० मध्ये पुन्हा थोडी म्हणजे ७८ नी वाढ झाली. कोरोनाआधी दुर्गम तालुके वगळता इतर ठिकाणी रोज १ ते २ मृत्युपत्र होत होते. आता आठवड्यातील अनेक दिवस एकही मृत्युपत्र होत नाही. सन २०१८ च्या तुलनेत आता मृत्युपत्रांची संख्या सरासरी दहा टक्क्यांनी घटली आहे.
कमी वयात मृत्युपत्र केलेल्यांची प्रतिक्रिया
१ गंभीर आजाराने त्रस्त असल्याने मृत्युपत्र केले. मृत्यूनंतर मालमत्तेसंबंधी भांडणे होऊ नयेत, यासाठी हा निर्णय घेतला. कोरोनामुळे काही प्रमाणात अडचणी आल्या.
२ घरगुती वाद आणि कोरोनाच्या आजारामुळे मृत्यू कधीही येईल, या भीतीपोटी मृत्युपत्र केले. मृत्युपत्रात स्वकमाईच्या मालमत्तेची नोंद केली. वडिलाेपार्जित मालमत्तेची नोंद केली नाही.
३ कोरोना महामारीमुळे मनात भीती निर्माण झाली. यातूनच मृत्युपत्र करण्याचा निर्णय घेतला. कुटुंबातील सर्व सदस्यांशी चर्चा करून हा निर्णय घेतला. मृत्युपत्र करताना कोरोनामुळे अनेक अडचणी आल्या. तरीही आजारामुळे घाईने मृत्युपत्र केले.