Navratri -अंबाबाईच्या नवरात्रौत्सवाची तयारी अंतिम टप्प्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 28, 2019 01:54 PM2019-09-28T13:54:16+5:302019-09-28T13:57:11+5:30
शारदीय नवरात्रौत्सवाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील साडेतीन शक्तिपीठांपैकी प्रमुख देवता कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिराची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. उत्सव आता अवघ्या एका दिवसावर आल्याने पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समिती, श्रीपूजक, पोलीस प्रशासन, स्वयंसेवी संस्था अशा सर्व संबंधित यंत्रणांची जणू लगीनघाई सुरू आहे. दुसरीकडे, अंबाबाई मंदिर आकर्षक विद्युत रोषणाईने उजळून निघाले आहे.
कोल्हापूर : शारदीय नवरात्रौत्सवाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील साडेतीन शक्तिपीठांपैकी प्रमुख देवता कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिराची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. उत्सव आता अवघ्या एका दिवसावर आल्याने पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समिती, श्रीपूजक, पोलीस प्रशासन, स्वयंसेवी संस्था अशा सर्व संबंधित यंत्रणांची जणू लगीनघाई सुरू आहे. दुसरीकडे, अंबाबाई मंदिर आकर्षक विद्युत रोषणाईने उजळून निघाले आहे.
शारदीय नवरात्रौत्सवाला उद्या, रविवारपासून प्रारंभ होत आहे. यानिमित्त अंबाबाई मंदिरातील तयारीला आता वेग आला आहे. मुंबईच्या संजय मेंटेनन्सकडून सुरू असलेली स्वच्छता आज, शनिवारी पूर्ण होणार आहे. नवरात्रौत्सवात अंबाबाईची पूजाआद्य शंकराचार्यांनी वर्णन केलेल्या विविध रूपांत बांधण्यात येणार आहे. त्यासाठी लागणाऱ्या साहित्यापासून ते रोजच्या धार्मिक विधींपर्यंतची तयारी श्रीपूजकांकडून सुरू आहे.
दुसरीकडे, कळंबा कारागृहात लाडू बनविण्याची लगबग सुरू असून त्यासाठी कैद्यांची संख्या वाढविण्यात आली आहे. देवस्थान समितीची मागणी येईल त्याप्रमाणे लाडू पुरविण्याची तयारी कारागृह प्रशासनाने केली आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही मंदिराच्या परिसरात भजनी मंडळांचे कार्यक्रम व विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले जाणार आहे.
मंडप तयार
अंबाबाईच्या मुख्य गाभारा रांगेसाठी पूर्व दरवाजा ते शेतकरी बझारपर्यंत सुसज्ज मंडप उभारण्यात आला आहे. मांडवात फॅनपासून एलईडी स्क्रीन तसेच लोखंडी अडथळे उभारण्यात आले आहेत. भाविकांची संख्या वाढली तरी त्यांना उन्हाचा किंवा पावसाचा त्रास होऊ नये यासाठी मांडवाची लांबी वाढविण्यात आली आहे. विद्यापीठ हायस्कूल दरवाजा येथील मुखदर्शनाच्या रांगेसाठी तसेच मंदिरातील देवस्थान समितीच्या कार्यालयाशेजारी सांस्कृतिक कार्यक्रमांच्या सादरीकरणासाठी सुरेख मंडप सजला आहे.
प्रथमोपचार केंद्र
भाविकांच्या सोईसाठी अंबाबाई मंदिराच्या परिसरातील उद्यान व मंदिराबाहेर पोलीस नियंत्रण कक्षाशेजारी अशा दोन ठिकाणी प्रथमोपचार केंद्रे उभारण्यात आली आहेत. ‘व्हाईट आर्मी’तर्फे या केंद्रांचे समन्वयन केले जाणार आहे. १०८, अॅस्टर आधार, अॅपल सरस्वती ही हॉस्पिटल्स, महापालिका, अंबाबाई श्रीपूजक मंडळ अशा विविध संस्थांतर्फे नऊ दिवस ही केंदे्र चालविली जाणार असून ही सेवा २४ तास उपलब्ध आहे. परिसरात तीन रुग्णवाहिका असणार आहेत.
विद्युत रोषणाई
हेरिटेज समितीच्या मार्गदर्शक सूचनांनुसार गतवर्षी अंबाबाई मंदिराला विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. स्वच्छतेच्या कामानंतर या रोषणाईसाठीचे वीजदिवे पुन्हा बसविण्यात आले आहेत. त्यांची तपासणी करून शुक्रवारी सायंकाळी ही विद्युत रोषणाई सुरू करण्यात आली. विविध रंगांच्या दिव्यांमुळे मंदिराचे शिल्पसौंदर्य अधिक उजळून निघाले आहे.