पूरग्रस्त भागात उड्डाणपुलांची तयारी: जिल्हा प्रशासनाच्या हालचाली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 4, 2019 03:31 PM2019-09-04T15:31:10+5:302019-09-04T15:35:59+5:30
महापुराने शिरोळ, हातकणंगले, करवीर तालुके जलमय झाले होते. रस्ते पाण्याखाली गेल्याने जनजीवन विस्कळीत झाले होते.भविष्यातही पुराचे संकट नाकारता येत नाही. पूरग्रस्त भागातील नागरिकांचे जीवन सुरक्षित राहण्यासाठी येथे उड्डाणपूलांचे जाळे तयार करण्याच्या हालचाली जिल्हा प्रशासनाकडून सुरू झाल्या आहेत.
प्रवीण देसाई
कोल्हापूर : महापुराने शिरोळ, हातकणंगले, करवीर तालुके जलमय झाले होते. रस्ते पाण्याखाली गेल्याने जनजीवन विस्कळीत झाले होते.भविष्यातही पुराचे संकट नाकारता येत नाही. पूरग्रस्त भागातील नागरिकांचे जीवन सुरक्षित राहण्यासाठी येथे उड्डाणपूलांचे जाळे तयार करण्याच्या हालचाली जिल्हा प्रशासनाकडून सुरू झाल्या आहेत. १२ व १३ सप्टेंबरला जिल्ह्यात जागतिक बॅँकेचे प्रतिनिधी येत आहेत. त्यांच्यासमोर अर्थसाहाय्याकरिता याचे सादरीकरण केले जाणार आहे.
सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात आलेल्या महापुराने जिल्ह्यात हाहाकार माजला होता. ३५० हून अधिक गावे पूरबाधित झाली होती. त्यांमध्ये शिरोळ तालुक्यातील १८, हातकणंगलेतील पाच, करवीरमधील चार गावे व कोल्हापूर शहरातील बापट कॅम्प, सुतारवाडा, शाहूपुरी कुंभार गल्ली, शाहूपुरी गवत मंडई, व्हीनस कॉर्नर, न्यू पॅलेस परिसर, रमणमळा, नागाळा पार्क असा परिसर पूर्णपणे पाण्याखाली गेला होता.
या ठिकाणांची परिस्थिती भीषण होती. गावातील रस्त्यांबरोबरच गावातून इतर गावांसह शहरी भागाला जोडले जाणारे पर्यायी रस्तेही पाण्याखाली गेले होते. या ठिकाणी उड्डाणपूल असते तर नागरिकांना सुरक्षितपणे बाहेर जाता आले असते. या विचारातून जिल्हा प्रशासनाने या २७ गावांसह कोल्हापूर शहरातील पूरबाधित भागात उड्डाणपुलांचे जाळे तयार करण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत.
यासाठी हजारो कोटी रुपये खर्च येणार आहेत. त्याकरिता थेट जागतिक बॅँकेकडून अर्थसाहाय्य मागण्याची तयारी सुरू आहे. आपत्कालीन परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर याकरिता अर्थसाहाय्याची मागणी केली जाणार आहे.
गेल्या आठवड्यात दिल्ली येथे जागतिक बॅँकेच्या प्रतिनिधींसोबत झालेल्या बैठकीत मुंबई महापालिकेचे आयुक्त प्रवीणसिंह परदेशी यांनी कोल्हापूर, सांगलीच्या पूरग्रस्त भागांतील नुकसानीची माहिती दिली होती. त्या पार्श्वभूमीवर १२ व १३ सप्टेंबरला कोल्हापुरात जागतिक बॅँकेच्या प्रतिनिधींचे शिष्टमंडळ कोल्हापुरात दाखल होणार आहे.
यावेळी जिल्हा प्रशासनातर्फे त्यांच्यासमोर पूरबाधित भागाचे सादरीकरण केले जाणार आहे. यामध्ये उड्डाणपुलांकरीता अर्थसाहाय्याची मागणी केली जाणार आहे, अशी माहिती सूत्रांकडून देण्यात आली.
पूरबाधित २७ गावांसह कोल्हापूर शहराचा विचार
उड्डाणपुलासाठी शिरोळ तालुक्यातील १८ गावांसह हातकणंगले तालुक्यातील पाच, करवीर तालुक्यातील चार व कोल्हापूर शहरातील बापट कॅम्प, सुतारवाडा, शाहुपुरी कुंभार गल्ली, शाहूपुरी गवत मंडई, व्हीनस कॉर्नर, न्यू पॅलेस परिसर, रमणमळा, नागाळा पार्क, आदी परिसरांचा विचार सुरू आहे.
जनावरांसाठी सुरक्षित तळ
उड्डाणपुलांमुळे नागरिकांच्या सुरक्षिततेबरोबरच गावांमधील गाई, म्हशी अशा पाळीव जनावरांच्या सुरक्षिततेचा विचार केला जात आहे. त्यांच्यासाठी उड्डाणपुलांना जोडले जातील अशा पद्धतीने जनावरांचे सुरक्षित तळही उभे करण्याचा विचार आहे.