गणेश विसर्जनाची तयारी; कोल्हापुरात २५०० कर्मचारी तैनात, मिरवणुकीवर सीसीटीव्हीचा वॉच
By ऑनलाइन लोकमत | Published: September 16, 2024 02:13 PM2024-09-16T14:13:06+5:302024-09-16T14:13:24+5:30
कोल्हापूर : सार्वजनिक गणेशोत्सवाची सांगता उद्या, मंगळवारी होत असून गणेश मूर्ती विसर्जनाकरिता महापालिकेची यंत्रणा सज्ज आहे. इराणी खण या ...
कोल्हापूर : सार्वजनिक गणेशोत्सवाची सांगता उद्या, मंगळवारी होत असून गणेश मूर्ती विसर्जनाकरिता महापालिकेची यंत्रणा सज्ज आहे. इराणी खण या एकाच ठिकाणी गणेश मूर्ती विसर्जन होणार असून महापालिकेचे अडीच हजार कर्मचारी, ३५० हमाल यांच्यासह स्वयंसेवी संस्थांचे कार्यकर्ते गणेश मूर्ती विसर्जनाकरिता मदत करणार आहेत. इराणी खण व विसर्जन मार्गावर आवश्यक त्या ठिकाणी सीसीटीव्ही लावण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
गणेश विसर्जनाच्या तयारीचा महापालिका प्रशासक के. मंजूलक्ष्मी यांनी संबंधित सर्व अधिकाऱ्यांची बैठक घेऊन महापालिकेने केलेल्या तयारीचा आढावा घेतला. यावेळी सर्व अधिकारी उपस्थित होते.
इराणी खण येथे नियंत्रण कक्ष सुरू करण्यात आला असून विसर्जन प्रक्रिया सुलभ आणि जलद व्हावी म्हणून बारा तराफे ठेवण्यात आले आहेत. तराफ्यावर मूर्ती ठेवून त्या पाण्यात विसर्जित केल्या जाणार आहेत. विभागीय कार्यालयांतर्गत गणेश मूर्ती आणण्यासाठी ७० टेम्पो, पाच जे.सी.बी., सात डंपर,चार ट्रॅक्टर, चार पाण्याचे टँकर, दोन बुम, चार क्रेन, सहा ॲम्ब्युलन्स अशी यंत्रणा सज्ज करण्यात आली आहे. इराणी व बाजूच्या खणीभोवती संरक्षणासाठी बॅरिकेडिंग करण्यात येत असून वॉच टॉवर व पोलिसांसाठी पेंडल उभे करण्यात आले आहेत. अग्निशमन विभागामार्फत विसर्जन ठिकाणी अग्निशमन दलाचे दक्षता पथक, सुरक्षा गार्ड आवश्यक त्या साधनसामुग्रीसह तैनात ठेवण्यात येणार आहेत.
विसर्जन मार्गावरील धोकादायक इमारती भोवती बॅरिकेड्स उभारण्याच्या तसेच या इमारती धोकादायक असल्याचे फलक लावण्याच्या सूचना दिल्या आहेत. पावसाने विश्रांती दिल्याने विसर्जन मार्गावरील सर्व खड्ड्यांवर डांबरी पॅचवर्क करण्यात आले आहे. पोलिस प्रशासनाने निश्चित केलेल्या विसर्जन मार्गावर बॅरिकेड्स व वॉच टॉवर उभी करण्यात आली आहेत. मिरवणूक मार्ग व विसर्जन ठिकाणी आवश्यक त्या लाईटची व्यवस्था करण्यात आली आहे.
गंगावेशीतून पंचगंगा नदीकडे जाणारा मार्ग बंद
गत चार वर्षांपासून सार्वजनिक मंडळांनी पंचगंगा नदीत मूर्ती विसर्जित न करता इराणी खणीत विसर्जन करण्याचा संकल्प केला आहे. यावर्षी देखील खणीतच गणेश मूर्ती विसर्जित केल्या जाणार आहेत. त्यामुळे गंगावेश येथून पंचगंगा नदीकडे जाणारा रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात येणार आहे. नदीच्या परिसरातही बॅरिकेड्स लावली जाणार आहेत.
२,१०० पोलिसांची फौज, लेसरवर होणार कारवाई
अनंत चतुर्थीला होणाऱ्या गणेश विसर्जन मिरवणुकीसाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांसह २,१०० पोलिसांची फौज रस्त्यांवर तैनात असेल. मिरवणुकीवर नजर ठेवण्यासाठी गर्दीच्या ठिकाणी सहा टेहळणी मनोरे तयार केले आहेत. तसेच आदल्या रात्री ध्वनियंत्रणांचे स्ट्रक्चर उभारण्याच्या निमित्ताने रस्ते अडवणारी वाहने जप्त करून मंडळांवर गुन्हे दाखल करणार असल्याचा इशारा शहर पोलिस उपअधीक्षक अजित टिके यांनी दिला आहे.
पारंपरिकसह पर्यायी मार्गाचीही तयारी
बाप्पांच्या विसर्जनासाठी महाद्वारमार्गे क्रशर खणीकडे जाणाऱ्या पारंपरिक विसर्जन मार्गासह सुभाषरोड, हॉकी स्टेडियम, संभाजीनगरमार्गे क्रशर खणीकडे जाणाऱ्या पर्यायी मार्गावरूनही मंडळांना विसर्जनासाठी जाता येणार आहे. महापालिका प्रशासन आणि पोलिसांनी दोन्ही मार्ग सज्ज ठेवले आहेत.
२१०० पोलिसांची फौज
विसर्जन मिरवणुकीच्या बंदोबस्तासाठी पोलिसांसह राज्य राखीव दल, शीघ्र कृती दल, दंगल काबू पथक आणि होमगार्ड अशी सर्व दले सज्ज झाली आहेत. विसर्जन मार्गासह क्रशर खण आणि शहरातील प्रमुख मार्गांवर २१८९ पोलिस बंदोबस्तासाठी तैनात असतील.
लेसरबंदीची काटेकोर अंमलबजावणी
डोळ्यांना घातक ठरणाऱ्या लेसरवर विसर्जन मिरवणुकीत जिल्हाधिकाऱ्यांनी बंदी घातली आहे. या बंदी आदेशाचे काटेकोर पालन केले जाणार असल्याचे पोलिसांनी सांगितले. आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या मंडळांची लेसर यंत्रणा जप्त करून गुन्हे दाखल केले जाणार आहेत. त्यामुळे लेसरचा वापर कोणीही करू नये, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.
रस्ते अडविणारे रडारवर
काही मंडळे मिरवणुकीपूर्वी रस्त्यात वाहने लावून स्ट्रक्चर उभारणीचे काम करतात. यामुळे वाहतुकीला अडथळा होतो. अशा मंडळांवर पोलिसांची विशेष नजर राहणार असून, स्ट्रक्चर जप्त करण्याचा इशारा पोलिसांनी दिला आहे.
उलट्या दिशेने प्रवेशाला बंदी
बिनखांबी गणेश मंदिर ते गंगावेश या मार्गावर सायंकाळी सहा ते रात्री बारापर्यंत प्रचंड गर्दी असते. नागरिकांना मिरवणूक व्यवस्थित पाहता यावी, यासाठी उलट्या दिशेने कोणालाही प्रवेश दिला जाणार नाही. जाणाऱ्या आणि येणाऱ्या नागरिकांसाठी दोन स्वतंत्र मार्ग केले जाणार आहेत. गर्दीच्या ठिकाणी बाहेर पडण्यासाठी व्यवस्था केली जाणार आहे. तसेच विसर्जन मार्गापासून १०० मीटर अंतरात वाहनांना प्रवेशबंदी असेल.