Kolhapur Politics: इचलकरंजीत विधानसभेसाठी इच्छुकांची जुळवाजुळव; आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी
By ऑनलाइन लोकमत | Published: August 26, 2024 01:21 PM2024-08-26T13:21:12+5:302024-08-26T13:21:22+5:30
उमेदवारांना थांबवताना अडचण
अतुल आंबी
इचलकरंजी : विधानसभेसाठी उमेदवार निश्चित झाले नसले तरी आरोप-प्रत्यारोप मात्र सुरू झाले आहे. इचलकरंजी शहरातील विकासकामांसह पाणी योजनेभोवती राजकारण फिरत आहे; परंतु ऐन निवडणुकीवेळी कोणता मुद्दा चर्चेला येतो आणि त्यावेळी जो जोर लावतो, तोच बाजी मारतो, असे काहीसे समीकरण या मतदारसंघात दिसत आहे. त्यामुळे राजकीय व्यक्ती एकमेकांना घेरण्यासाठी सरसावले आहेत.
गत निवडणुकीत आमदार प्रकाश आवाडे यांनी ऐनवेळी काँग्रेस पक्षाचा राजीनामा देत अपक्ष निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला. त्यावेळी दहा वर्षे आमदार असलेल्या सुरेश हाळवणकर यांना वस्त्रोद्योग आणि पाणी या मुद्द्यांवर घेरले तसेच निवडून आल्यानंतर भाजपला पाठिंबा देणार असल्याची वातावरणनिर्मिती केली. त्याचे फलित म्हणून आवाडे विजयी झाले.
गत लोकसभा निवडणुकीतही असाच प्रकार घडला. बघता बघता धैर्यशील माने यांना उमेदवारी मिळाली आणि शहराचा पाणीप्रश्न आणि वस्त्रोद्योग याच मुद्द्यांवर घेरून माजी खासदार राजू शेट्टी यांना पराभूत करण्यात आले. तोच धागा पकडत या लोकसभा निवडणुकीत पुन्हा पाणीप्रश्न गाजविण्याचा प्रयत्न झाला. परंतु तिरंगी लढत आणि हिंदुत्ववादी मतांचा प्रभाव यातून पुन्हा माने यांनी बाजी मारली.
यावेळी आमदार आवाडे यांनी पुत्र राहुल यांना उमेदवार घोषित केले आहे. त्यादृष्टीने त्यांची महायुतीच्या वरिष्ठ स्तरावर उमेदवारी मिळविण्यासाठी फिल्डिंग सुरू आहे. उमेदवारी मिळाली नाही तरी अपक्ष लढण्याची तयारी आहे. त्यासाठी आवश्यक रान उठविण्याचा कार्यक्रम आमदार आवाडे यांनी सुरू केला आहे. कोणत्याही विषयाचा कार्यक्रम असो, आमदार आवाडे यांचे भाषण राजकीय विषयाला धरून चर्चेत राहील, असेच असते. पालकमंत्री हसन मुश्रीफ तसेच काँग्रेसकडून उमेदवारी मागितलेले संजय कांबळे यांच्यानंतर त्यांनी नाव न घेता हाळवणकरांवरही आगपाखड केली आहे.
त्यांच्या या वक्तव्यानंतर विरोधकांनीही त्यांना घेरण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. विठ्ठल चोपडे यांनी, आवाडे यांच्याकडून स्वत:चे अपयश झाकण्यासाठी दुसऱ्यायावर आरोप करण्याचा प्रकार सुरू असल्याचे पत्रक काढले तसेच सागर चाळके यांनी, शहरातील पाच वर्षांत केलेले ठळक विकासकाम सांगा अथवा चौकात एका मंचावर सभा लावा, असे आव्हान दिले. तर कांबळे यांनी आवाडे खोटे बोलतात व दिशाभूल करतात, असा आरोप केला. त्यानंतरही आवाडे यांनी एका वार्षिक सभेत हाळवणकर यांना घेरत गावाशी देणं-घेणं नसलेल्या, नियोजन नसलेले व्यक्ती गावचे लोकप्रतिनिधी झाले. त्यामुळे विकास खुंटला, असा आरोप नाव न घेता केला.
उमेदवारांना थांबवताना अडचण
महाविकास आघाडी एकसंध असल्याचे सांगत असले तरी सर्व घटक पक्षांतील इच्छुक उमेदवार मात्र जोरदार तयारीला लागले आहेत. सर्व तयारी पूर्ण झाल्यानंतर एका उमेदवाराचे नाव निश्चित झाल्यास तयारी पूर्ण झालेल्या अन्य उमेदवारांना थांबविताना अडचण होणार आहे. त्यामुळे वेळीच निर्णय होणे आवश्यक आहे.
बारा आमदारांची नियुक्ती पुढे गेली
विधानपरिषदेवर नियुक्त केल्या जाणाऱ्या बारा आमदारांमध्ये सुरेश हाळवणकर यांचे नाव घेतले जाईल आणि इचलकरंजीत महायुतीकडून आवाडे यांना उमेदवारी मिळेल, अशी चर्चा सुरू होती. परंतु बाराजणांच्या नियुक्तीचा कार्यक्रम ऑक्टोबरपर्यंत पुढे गेल्याने पुन्हा पेच निर्माण होताना दिसत आहे. त्यामुळे उमेदवारीसाठी कस लागणार आहे.