Kolhapur Flood: स्थलांतरित व्हा, आरामात राहा; महासैनिक दरबार येथे 'सेंट्रल किचन'ची तयारी
By ऑनलाइन लोकमत | Published: July 27, 2024 02:04 PM2024-07-27T14:04:10+5:302024-07-27T14:05:30+5:30
कोल्हा पूर : राधानगरी धरणातून ‘भोगावती’त, दुसरीकडे ‘कोयने’तून कृष्णा नदीत पाण्याचा विसर्ग सुरू असल्याने रात्रीत पाणीपातळी वाढणार आहे. त्यामुळे ...
कोल्हापूर : राधानगरी धरणातून ‘भोगावती’त, दुसरीकडे ‘कोयने’तून कृष्णा नदीत पाण्याचा विसर्ग सुरू असल्याने रात्रीत पाणीपातळी वाढणार आहे. त्यामुळे पूरबाधित भागातील नागरिकांनी दारापर्यंत पूर येण्याची वाट बघू नये, स्थलांतरित व्हा, आरामात राहा, घरात राहिल्यासारखे वाटेल, अशी चांगली सोय करू, असे आवाहन पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी शुक्रवारी केले.
मागील महापुराप्रमाणे यंदाही ‘महासैनिक दरबार हॉल’मध्ये सेंट्रल किचन केले जाणार असून ‘केडीएम’सह, कंपन्या, कारखान्यांना व स्वयंसेवी संस्थाच्या मदतीने नागरिकांची काळजी घेतली जाईल, असेही त्यांनी सांगितले.
पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी शुक्रवारी शहर-जिल्ह्यातील पूरग्रस्त भागांची पाहणी केली. त्यानंतर सायंकाळी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेतली. बैठकीनंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, घरांमध्ये रात्रीतून पाणी घुसले तर लोकांना बाहेर काढणे अवघड होईल. त्यामुळे प्रशासन सांगेल ते ऐकून सहकार्य करा, वेळेत स्थलांतरित व्हा. तुम्हाला घरात राहिल्यासारखे वाटेल असे सहकार्य करू. आज शनिवारी दुपारी सर्व स्वयंसेवी संस्था, कारखाने, कंपन्यांच्या प्रतिनिधींची बैठक घेऊन त्यांना मदतीसाठी पुढे येण्याचे आवाहन करणार आहे. मागील दोन महापुरांप्रमाणे महासैनिक दरबार हॉल येथे सेंट्रल किचन सुरू केले जाईल.
दोन दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी राहिल्यास १० हजार देणार
पालकमंत्री मुश्रीफ म्हणाले, २८ जुलै २०२३ च्या अधिसूचनेनुसार घरात दोन दिवसांपेक्षा जास्त काळ पाणी राहिले असेल तर १० हजार रुपये अनुदान दिले जाणार आहे. तसेच दुकानदार, टपऱ्यांसाठीही मदत केली जाईल. एका दिवसात ६५ मिलिमीटरपेक्षा जास्त पाऊस होऊन घरांची पडझड झाली असेल तरी नुकसानभरपाई दिली जाईल.
पांडुरंगाला प्रार्थना
मंत्री मुश्रीफ म्हणाले, जिल्ह्यातील सर्व धरणे भरली आहे. त्यामुळे आज मी पांडुरंग आणि तुळजाभवानीचे दर्शन घेऊन आलो. पाऊस मनासारखा झाला आहे; पण आता महापूर तेवढा येऊ नये, शेतकऱ्यांचे कल्याण होऊ दे, अशी प्रार्थना केली आहे.
‘अलमट्टी’तून विसर्ग योग्य पद्धतीने
‘अलमट्टी’च्या आधी असलेल्या हिप्परगी बंधाऱ्यातून विसर्ग केला जात नाही अशी तक्रार होती; पण कोल्हापुरातून हिप्परगीमध्ये २ लाख आणि तितकाच विसर्ग हिप्परगीतून ‘अलमट्टी’मध्ये होत आहे. अलमट्टीतून ३ लाख क्युसेक विसर्ग सुरू असून तेथे महाराष्ट्रातील एका उपअभियंत्याची नियुक्ती केली आहे. त्यामुळे शंका दूर झाली आहे.