सेनापती कापशीत ‘सौभाग्यवतीं’साठी तयारी
By Admin | Published: January 1, 2017 11:27 PM2017-01-01T23:27:59+5:302017-01-01T23:27:59+5:30
युतीनंतरच चित्र स्पष्ट होणार : इच्छुकांकडून जोरदार मोर्चेबांधणी सुरू : कागल तालुक्यातील हाय व्होल्टेज मतदारसंघ
शशिकांत भोसले ल्ल सेनापती कापशी
तत्कालीन मंत्री हसन मुश्रीफ यांचे चिरंजीव नाविद मुश्रीफ व संजय घाटगे-मंडलिक गटाचे परशराम तावरे यांच्यातील लढतीमुळे, तसेच कै. खासदार सदाशिवराव मंडलिक व कै. विक्रमसिंह घाटगे यांच्या राजकीय कारकिर्दीस कलाटणी देणारा मतदारसंघ म्हणून सेनापती कापशी मतदारसंघ प्रसिद्ध आहे. यंदा येथे सर्वसाधारण महिलांसाठी आरक्षण पडल्यामुळे नेत्यांच्या सौभाग्यवतीच रिंगणात असणार हे स्पष्ट असून, तशी बांधणी सुरू आहे.
या मतदारसंघात गतवेळी मंडलिक-घाटगे युतीचे उमेदवार परशराम तावरे यांनी नाविद मुश्रीफ यांचा पराभव करून संपूर्ण महाराष्ट्रात धक्कादायक निकालाची नोंद केली होती. नंतर तावरे यांनी भाजपमध्ये प्रवेश करून विधानसभेची निवडणूकही लढविली. मुश्रीफ यांचे खंदे समर्थक शशिकांत खोत यांनीही गतवेळी पंचायत समिती निवडणुकीत मंडलिक-घाटगे युतीचे दयानंद पाटील यांचा पराभव केला. सध्या शशिकांत खोत हे कागल तालुका संघाचे अध्यक्ष म्हणून काम पाहत आहेत. यंदा सेनापती कापशी पंचायत समिती मतदारसंघात ओबीसी पुरुष असे आरक्षण पडले आहे. सर्वच प्रमुख गटांच्या उमेदवारांची मोर्चेबांधणी सुरू आहे; परंतु कोणाची युती कोणाबरोबर होणार की, सर्वच गट स्वबळावर लढणार, यावरच लढतीचे चित्र स्पष्ट होणार आहे. समरजितसिंह घाटगे यांचा भाजपमध्ये झालेला प्रवेश याचाही परिणाम या मतदारसंघावर होणार आहे.
या जिल्हा परिषद मतदारसंघातून भाजपकडून तालुकाध्यक्ष व विद्यमान जिल्हा परिषद सदस्य परशराम तावरे यांच्या पत्नी अश्विनी तावरे, सामाजिक कार्यकर्ते राजाभाऊ माळी यांच्या पत्नी सुनीता माळी, उद्योजक उमेश देसाई यांच्या पत्नी अंबिका देसाई व मातोश्री सुजाताताई देसाई यांची नावे संभाव्य उमेदवार म्हणून चर्चेत असली तरी तालुकाध्यक्ष परशराम तावरे, राजाभाऊ माळी व उमेश देसाई यांची भूमिका पक्ष जो निर्णय घेईल व जो उमेदवार देईल, त्या उमेदवाराच्या पाठीशी ठामपणे उभे राहण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादी काँग्रेसकडून तालुका संघाचे अध्यक्ष व विद्यमान पंचायत समिती सदस्य शशिकांत खोत यांच्या पत्नी शिल्पा खोत, तालुका संघाचे संचालक व माद्याळचे माजी सरपंच सूर्याजी घोरपडे यांच्या पत्नी रिना घोरपडे, आलाबादचे माजी सरपंच व तालुका संघाचे संचालक जे. डी. मुसळे यांच्या सुनबाई वंदना मुसळे यांची नावे चर्चेत आहेत. माजी मंत्री आमदार हसन मुश्रीफ जो उमेदवार देतील व निर्णय घेतील, तो सर्वांसाठी अंतिम असणार आहे. संजय घाटगे गटाचे नेते व माजी जि. प. उपाध्यक्ष दत्ताजीराव घाटगे यांच्या सुनबाई उज्ज्वला सोनूसिंह घाटगे याही उमेदवारीच्या प्रबळ दावेदार आहेत. तालुका उपप्रमुख दिलीप तिप्पे यांच्या पत्नी मनीषा तिप्पे, उपजिल्हाप्रमुख संभाजी भोकरे यांच्या पत्नी उज्ज्वला यांचीही नावे चर्चेत आहेत. संजय मंडलिक गटाकडून प्रणाली प्रदीप चव्हाण व अपक्ष म्हणून राजश्री दयानंद पाटील याही इच्छुक आहेत.
माद्याळ पंचायत समिती मतदारसंघातून संभाव्य उमेदवार म्हणून सुनील इंगवले, दिनेश मुसळे, गंगाराम परीट, विलास संकपाळ, बंडा परीट, तर सेनापती कापशी पंचायत समिती मतदारसंघातून मंगल शेटके (बाळेघोल), सुजाताताई देसाई (सेनापती कापशी), लक्ष्मी साळोखे (कापशी), मंगल कुंभार (करड्याळ), बाळेघोलचे सरपंच शामराव पाटील यांच्या पत्नी कांचन पाटील, आदी उमेदवारांची नावे त्यांच्या गटातून चर्चेत आहेत. शशिकांत खोत, परशराम तावरे, दत्तात्रय वालावलकर, दत्ताजीराव घाटगे, सूर्याजीराव घोरपडे, परशराम शिंदे, राजाभाऊ माळी, उमेश देसाई, जे. डी. मुसळे, नेताजी मोरे, प्रदीप चव्हाण, ‘शाहू’चे उपाध्यक्ष अमरसिंह घोरपडे, अंकुश पाटील, आदींचा या मतदारसंघात मोठा संपर्क आहे. त्यामुळे या ठिकाणी काटा लढत होणार हे स्पष्ट आहे.
मतदारसंघातील समाविष्ट गावे
सेनापती कापशी, तमनाकवाडा, बाळेघोल, हणबरवाडी, बेरडवाडी, जैन्याळ, मुगळी, मेतके, करड्याळ, सांगलेवाडी, बाळिंद्रे, कोल्हेवाडी, नंद्याळ, अर्जुनवाडा, आलाबाद, माद्याळ, वडगाव, बेलेवाडी काळम्मा, मांगनूर, हसूर खुर्द, हसूर बुद्रुक, कासारी, बोळावी, बोळावीवाडी.
गेल्या २0 वर्षांत झालेल्या जिल्हा परिषद निवडणुकीत या मतदारसंघातून संजय घाटगे गटाच्या निर्मला कुमठेकर, दत्ताजीराव घाटगे, विजयमाला घाटगे व परशराम तावरे यांनी विजय मिळविला आहे.
यंदाही हा बालेकिल्ला संजय घाटगे गटाच्या ताब्यातच ठेवण्यासाठी युतीमध्ये जो उमेदवार असेल, त्याला निवडून आणण्यासाठी दत्ताजीराव घाटगे, दत्तात्रय वालावलकर व तानाजी पाटील यांनी जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली आहे.
तर गेल्यावेळी झालेल्या निसटत्या पराभवाचे रूपांतर यंदा विजयात करण्यासाठी शशिकांत खोत, सूर्याजी घोरपडे, अंकुश पाटील, जे. डी. मुसळे यांनी सावध हालचाली सुरू केल्या आहेत. शेवटी युतीनंतरच कोण कोणाविरुद्ध लढणार, हे स्पष्ट होणार आहे.