नृसिंहवाडीत दत्तजयंतीची तयारी पूर्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 29, 2020 04:23 AM2020-12-29T04:23:33+5:302020-12-29T04:23:33+5:30
कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार श्री दत्तजयंती यात्रा रद्द करण्यात आली असून धार्मिक कार्यक्रम मोजक्याच मानकरी मंडळींच्या उपस्थितीत ...
कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार श्री दत्तजयंती यात्रा रद्द करण्यात आली असून धार्मिक कार्यक्रम मोजक्याच मानकरी मंडळींच्या उपस्थितीत येथील परंपरेनुसार होणार आहे. तरी दत्तभक्तांनी यावर्षी घरी राहूनच दत्तजयंती साजरी करावी, असे आवाहन दत्त देवा संस्थानचे अध्यक्ष अशोक पुजारी व सचिव गोपाळ अवधूत पुजारी यांनी सांगितले.
दत्तजयंतीनिमित्त दि. २९ रोजी येथील दत्त मंदिरात पहाटे ४.३० वाजता काकड आरती व शोडषोपचार पूजा, दुपारी १२.३० वाजता श्रींचे चरणकमलावर महापूजा, दुपारी ३ वाजता येथील ब्रम्हवृंदांकडून पवमान पंचसूक्तांचे पठण होईल. दुपारी ४ नंतर श्री नारायणस्वामी महाराजांच्या मंदिरातील श्रींची उत्सवमूर्ती सवाद्य मुख्य मंदिरात आणण्यात येईल त्यानंतर ४.३० वाजता श्री हणमंतबुवा ग्रामोपाध्ये (रा. सांगली) यांचे सुश्राव्य कीर्तन होऊन सायंकाळी ठीक ५ वाजता दत्तजन्मकाळ सोहळा होणार आहे.
जन्मकाळानंतर पारंपरिक आरती, पाळणा होऊन सुंठवडा प्रसाद वाटण्यात येणार आहे. रात्री ८ नंतर धूप-दीप आरती व पालखी सोहळा होऊन रात्री उशिरा शेजारती होणार आहे.
श्रींचा पाळणा जन्मकाळानंतर उत्सवाचे मानकरी बाळकृष्ण राजोपाध्ये यांच्या सुयोग हॉल येथे ठेवण्यात येणार आहे.
श्री दत्तजयंतीनिमित्त मंदिरात कापडी मंडप, शामियाना, आकर्षक विद्युत रोषणाई आदी आवश्यक सोयी व सुविधा दत्त देव संस्थानमार्फत करण्यात आल्या आहेत. आवश्यक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
श्रीक्षेत्र नृसिंहवाडी येथील श्री दत्त मंदिरातील लाईव्ह दर्शनासाठी व जन्मकाळ सोहळा श्री दत्त देवस्थानचे यू ट्यूब चॅनेल https://www.youtube.com/channel/UCNAIhR6PTO2Da2B8Goa7pKA/live वर घरबसल्या पाहण्याचे आवाहन येथील दत्त देव संस्थानच्यावतीने केले आहे.