Kolhapur: नृसिंहवाडीत दत्तजयंती सोहळ्याची तयारी पूर्ण, उद्या सायंकाळी होणार दत्तजन्मकाळ सोहळा
By ऑनलाइन लोकमत | Published: December 25, 2023 06:10 PM2023-12-25T18:10:34+5:302023-12-25T18:21:38+5:30
प्रशांत कोडणीकर नृसिंहवाडी: श्री क्षेत्र नृसिंहवाडी येथील दत्तजयंती सोहळ्याची तयारी पूर्ण झाली असून उद्या, मंगळवारी (दि.२६) सायंकाळी ५ वाजता ...
प्रशांत कोडणीकर
नृसिंहवाडी: श्री क्षेत्र नृसिंहवाडी येथील दत्तजयंती सोहळ्याची तयारी पूर्ण झाली असून उद्या, मंगळवारी (दि.२६) सायंकाळी ५ वाजता मुख्य मंदिरात दत्तजन्मकाळ सोहळा संपन्न होणार आहे. महाराष्ट्रासह कर्नाटक, गोवा, गुजरात, आदी राज्यातून अनेक भाविक दर्शनासाठी हजेरी लावतात. भाविकांना दर्शनाची सोय व्हावी यासाठी येथील श्री नृसिंहसरस्वती स्वामी दत्त देव संस्थान व ग्रामपंचायतमार्फत अनेक सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.
दत्त मंदिरात उद्या, मंगळवारी पहाटे ४ वाजता काकड आरती व शोडषोपचार पूजा, सकाळी ७ ते १२ यावेळेत पंचामृत अभिषेक, दुपारी १२.३० वाजता श्रींचे चरणकमलावर महापूजा व भाविकांसाठी महाप्रसाद, दुपारी ३ वाजता ब्रह्मवृंदांकडून पवमान पंचसुक्तांचे पठण होईल.
दुपारी ४ नंतर श्री नारायणस्वामी महाराजांचे मंदिरातील श्रींची उत्सवमूर्ती सवाद्य मुख्य मंदिरात आणण्यात येईल. त्यानंतर ४.३० वाजता ह.भ.प.कौस्तुभबुवा सरदेसाई रा. रत्नागिरी यांचे सुश्राव्य कीर्तन होऊन सायंकाळी ठिक ५ वाजता दत्त जन्मकाळ सोहळा संपन्न होणार आहे. जन्मकाळानंतर पारंपारिक आरती, पाळणा होऊन सुंठवडा प्रसाद वाटप होईल. रात्री ९ नंतर धूप दीप आरती व पालखी सोहळा होवून रात्री उशिरा शेजारती होणार आहे.
यासोहळ्यानिमित्त नृसिंहवाडीसाठी जादा एसटी बसेस सोडणेसाठी राज्य परिवहन मंडळ व आवश्यक पोलीस बंदोबस्तासाठी संबधित प्रशासनाशी संपर्क साधण्यात आल्याचे देवस्थानचे अध्यक्ष संतोष खोंबारे, उपसरपंच अमोल विभूते यांनी सांगितले.