जोतिबा चैत्र यात्रेची युद्धपातळीवर तयारी सुरू, यात्रेचा मुख्य दिवस कधी...जाणून घ्या
By ऑनलाइन लोकमत | Published: March 16, 2023 04:33 PM2023-03-16T16:33:05+5:302023-03-16T16:33:31+5:30
यात्रेसाठी येतात ७ ते ८ लाखापर्यंत भाविक
जोतिबा : डोंगरावर चैत्र यात्रेच्या तयारीची लगबग सुरू झाली असून, वाहन पार्किंगसाठी सपाटीकरणाचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. जोतिबा देवाची पाच एप्रिलला चैत्र यात्रा होणार आहे.
यात्रेसाठी ७ ते ८ लाखापर्यंत भाविक येतात. अशावेेळी डोंगरावर पार्किंगसाठी जागा अपुरी पडते. यासाठी गेली चार-पाच वर्षे डोंगरावर व परिसरातील जागेचे सपाटीकरण करून वाहनतळ बनविण्यात येते. दोनचाकी, चारचाकी वाहनाची स्वतंत्र व्यवस्था केली जाते. यामुळे यात्रेच्या वेळी होणारी वाहतुकीची कोंडी दूर होते. सध्या जोतिबा येथे शहर वाहतूक शाखेकडून आतापर्यंत १० ठिकाणी पार्किंग सपाटीकरण करण्यात आले असून, यापुढे अंदाजे २२ ते २३ ठिकाणी सपाटीकरण करण्यात येणार आहे. जिथे पार्किंगच्या ठिकाणी रस्ता खराब असेल तेथेदेखील मुरूम टाकून प्रशस्त जागा बनवण्यात येत आहे. सध्या यमाई मंदिर पाठीमागे व नवीन आंब्याचे झाड या ठिकाणी युद्धपातळीवर काम सुरू आहे. यासाठी दोन जेसीबी, दोन ट्रॅक्टर व आवश्यकतेनुसार रोड रोलरचा वापर करण्यात येत आहे.
कोल्हापूर शहर वाहतूक शाखेने सपाटीकरणाच्या नियोजनासाठी एक सहायक पोलिस उपनिरीक्षक व एक पोलिस हवालदार नेमण्यात आले आहेत. अंदाजे दोनचाकी वाहन १० ते १२ हजार व चारचाकी अंदाजे १०ते ११ हजार वाहने बसतील असे नियोजन असल्याचे पोलिस हवालदार संदीप निळपणकर यांनी सांगितले. २० मार्चला उपविभागीय अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली दुपारी २ वाजता यात्रा नियोजन आढावा बैठक होणार आहे. याच दिवशी दुपारी ४ वाजता सासणकाठीधारक, व्यापारी, गावकरी यांच्यासमवेतही बैठक होणार आहे.