Navratri2023: जोतिबा मंदिरातील नवरात्रोत्सवाची तयारी अंतिम टप्प्यात
By ऑनलाइन लोकमत | Published: October 13, 2023 02:18 PM2023-10-13T14:18:19+5:302023-10-13T14:19:03+5:30
खंडेनवमीदिवशी चार महिन्यांनंतर जोतिबाच्या पालखी सोहळ्याला पुन्हा सुरुवात होणार
अमोल शिंगे
जोतिबा: अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या नवरात्र उत्सवानिमित्त दख्खनचा राजा श्री क्षेत्र जोतिबा डोंगरावरील सर्व मंदिरांमध्ये नवरात्रोत्सवाची प्रशासन, देवस्थान समिती आणि पुजारी वर्गाच्यावतीने संपूर्ण तयारी सूरू असून ती अंतिम टप्प्यात आली आहे. या नऊ दिवसांत जोतिबा मंदिरामध्ये विविध धार्मिक विधी संपन्न होणार आहेत.
महाराष्ट्र कर्नाटक गुजरात आंध्र प्रदेश आणि इतर राज्यातील भाविकांचे श्रद्धास्थान असणाऱ्या श्री क्षेत्र जोतिबा डोंगर येथील शारदीय नवरात्र उत्सव येत्या 15 ऑक्टोंबर पासून 24 ऑक्टोंबर पर्यंत होणार असून त्यानिमित्त जोतिबा मंदिरासह इतर सर्व परिसरात तयारी सुरु आहे. जोतिबा डोंगरावरील सर्वच मंदिरात रविवारी घटस्थापना होणार आहे. यावेळी सर्व ग्रामदैवतांची शोभयात्रेच्या स्वरूपात घटस्थापना होणार आहे.
चार महिन्यांनंतर पालखी सोहळ्याला पुन्हा सुरुवात होणार
घटस्थापना झाल्यानंतर नऊ दिवस श्री जोतिबाची कमळपुष्पाती पुजा बांधण्यात येईल. नवरात्रातील सातव्या दिवशी म्हणजेच शनिवार दिनांक 21 रोजी जागर संपन्न होणार आहे. सोमवार दिनांक 23 रोजी खंडेनवमी होणार असून याच दिवशी चार महिन्यांनंतर जोतिबाच्या पालखी सोहळ्याला पुन्हा सुरुवात होणार आहे. मंगळवार दिनांक 24 रोजी विजयादशमीचा सोहळा संपन्न होईल.
भाविकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून सुविधा
दरम्यान देवस्थान समितीच्या वतीने भाविकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून नवरात्र उत्सव काळात पंधरा लाख भाविक डोंगरावर येतील त्या दृष्टिकोनातून सीसीटीव्ही कॅमेरे, सुरक्षारक्षक, भाविकांना सुलभ दर्शन घेता यावे यासाठी दर्शन रांग, पिण्याच्या पाण्याची सोय, मंदिर परिसरात आकर्षक विद्यूत रोषणाई करण्याचे काम सुरू आहे. पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्या वतीने संपूर्ण तयारी सूरू असून ती अंतिम टप्प्यात आली असल्याचे जोतिबा देवस्थान समितीचे व्यवस्थापक धैर्यशील तिवले यांनी सांगितले.