जोतिबा चैत्र यात्रेची तयारी युद्धपातळीवर
By admin | Published: April 6, 2017 04:16 PM2017-04-06T16:16:56+5:302017-04-06T16:20:04+5:30
रस्ते रुंदीकरणासह मंदीर रंगरंगोटीचे काम अंतिम टप्प्यात
आॅनलाईन लोकमत
कोल्हापूर, दि. ६ : दख्खनचा राजा श्री जोतिबाची चैत्र यात्रा अवघ्या तीन दिवसांवर येऊन ठेपली आहे. या पार्श्वभूमीवर गुरुवारी प्रशासन, पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती, स्थानिक समिती व ग्रामपंचायत यांनी जय्यत तयारी सुरु केली आहे. यात मुख्य मार्गावरील रस्ता रुंदीकरण, डांबरीकरण, लोखंडी रेलिग, रंगरंगोटी आदीची कामे अंतिम टप्प्यात आहेत.
यंदाचा यात्रेचा मुख्य दिवस (दि. १०) सोमवारी आहे. यासाठी संपुर्ण महाराष्ट्रासह कर्नाटक, आंध्र आणि गोवा आदी ठिकाणाहून ७ लाखाहून अधिक भाविक जोतिबा डोंगर येथे येण्याची शक्यता गृहीत धरुन प्रशासनाने विशेषत: शहर वाहतुक शाखेने जोतिबा डोंगर परिसरात ६० हजाराहून अधिक वाहनांसाठी वाहनतळ निर्माण केला आहे. या तळाचे सपाटीकरण व रुंदीकरणही अंतिम टप्प्यात आले आहे.
याशिवाय गिरोली फाटा, दाणेवाडी, गायमुख तलावाजवळील पडीक, शेतातील जागा, जोतिबा डोंगरावरील पिराचा कडा, यात्री निवास, जुने शासकीय विश्रामगृह, व्यापारी संकुल, यमाई बाग, आदी परिसरात वाहनतळाची जागा सपाटीकरण व रुंदीकरण काम सुरु आहे. यातील बहुतांशी काम पुर्णत्वाकडे आले आहे.
जोतिबा डोंगर परिसरातील मंदीराकडे जाणारे रस्ते रुंदीकरण व डांबरीकरण ही अंतिम टप्प्यात आले आहे. सेंट्रल प्लाझा येथील दोन्ही बाजूचे मुख्य गेटजवळील डांबरीकरण व बॅरेकेटींगचे कामही पुर्णत्वाकडे आले आहे. मंदीराजवळील नगारखाना दक्षिण दरवाजाकडील काही दुकानांचे अतिक्रमण काढण्यात आले आहे. त्यामुळे हा परिसरही मोकळा श्वास घेऊ लागला आहे.
मंदीर परिसरातील दर्शन रांग तीन पदरी ऐवजी दुपदरी करण्यात आली आहे. त्यामुळे सासनकाठ्या नाचवण्यासाठी भाविकांना आणखी जागा उपलब्ध झाली आहे. यात्रा काळात लाखो भाविकांची गर्दी लक्षात घेता मंदीर प्रशासनाने १६ सी. सी. टिव्ही कॅमेरे बसविले आहेत. याशिवाय भक्तांना जोर्तीलिंगाचे दर्शन बाहेरुनच मिळावे याकरीता ६ मोठे स्क्रीन लावण्यात येणार आहेत.
या संस्था भाविकांच्या सेवेसाठी सज्ज
सहजसेवा ट्रस्ट, व्हाईट आर्मी, यशवंत आयुर्वेदिक महाविद्यालय डॉक्टरांचे पथक, डॉ. डी. वाय. पाटील मेडिकल कॉलेज पथक, अनिरुद्ध उपासना संस्थेचे स्वंयसेवक तसेच दुचाकी बंद पडल्यास ती त्वरीत दुरुस्त करुन देण्यासाठी कोल्हापूर जिल्हा टू व्हिलर मेकॅनिक असोसिएशन आदी भाविकांच्या सेवेत असणार आहेत.
मोफत अन्नछत्राची सोय
सहजसेवा ट्रस्ट, आर.के.मेहता चॅरिटेबल ट्रस्ट, सावकार प्रेमी गु्रप यांच्यावतीने ८ ते १२ मार्च दरम्यान भाविकांना मोफत अन्नछत्राची सोय करण्यात आली आहे. सहजसेवा ट्रस्टच्यावतीने गायमुख येथे ५ पाण्याच्या मोठ्या टाक्या व मंडप उभारणीचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. तर जोतिबा बसस्थानकाशेजारी आर. के.मेहता ट्रस्टतर्फे अन्नछत्रासाठीचा मंडप घालण्याचे कामही युद्धपातळीवर सुरु आहे.
गुलाल खोबऱ्याची उधळण
जोतिबाला प्रिय असे गुलाल खोबऱ्याची उधळण केली जाते. यासाठी विशेष राजापुरी खोबरे लागते. तर गुलालासाठी खास सरपंच गुलालालाही विशेष मागणी आहे. याकरीता १७५ टन राजापुरी सुके खोबरे, तर १८ लाखाहून अधिक नारळांची आवक या काळात अपेक्षित आहे. तर गुलालाचीही तीनशे टनाहून अधिक उधळण केली जाते. याशिवाय जोतिबा ला प्रिय असा ‘दवणा ’ ही वाहिला जातो. हाही लाखो रुपयांचा दवण्याची शेतीही केवळ पन्हाळा तालुक्यातील केखले गावातच केली जाते. गुलाल खोबरे व नारळ आणि दवणा यांचीची मोठी उलाढाल अपेक्षित आहे. प्रसाद, पुजेचे साहित्य, खेळणी आदींची दुकानेही यात्रेसाठी सज्ज झाली आहेत.
वजन मापांचीही तपासणी
यात्राकाळात भाविकांची पुजेचे साहित्य विक्रेत्यांकडून फसवणुक होऊ नये म्हणून वजनमाप नियंत्रण विभागाकडून तपासणी केली जात आहे. यासाठी विशेष म्हणून वजनांचे योग्य मुल्यमापन मोहिम हाती घेण्यात आली आहे. शुल्क भरुन योग्य ते वजन कॅलिब्रेशन करुन दिले जात आहे.
जोतिबाला वाहण्यासाठी केवळ राजापुरी खोबरे वाटी लागते. यासाठी किमान १७५ टनाहून अधिक खोबरे विक्री केले जाते. तर गुलालही तीनशे टनाहून अधिक उधळला जातो. याशिवाय १८ लाखाहून अधिक नारळाची आवक या काळात होते.
-गजानन डवरी,
पुजेचे साहित्य विक्रेते