जोतिबा चैत्र यात्रेची तयारी युद्धपातळीवर
By admin | Published: April 7, 2017 12:30 AM2017-04-07T00:30:05+5:302017-04-07T00:30:05+5:30
जोतिबा चैत्र यात्रेची तयारी युद्धपातळीवर
रस्त्यांचे रुंदीकरण : मंदिर रंगरंगोटीचे काम अंतिम टप्प्यात
कोल्हापूर : ‘दख्खनचा राजा’ श्री जोतिबाची चैत्र यात्रा अवघ्या तीन दिवसांवर येऊन ठेपली आहे. या पार्श्वभूमीवर गुरुवारी प्रशासन, पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती, स्थानिक समिती व ग्रामपंचायतीने जय्यत तयारी सुरू केली आहे. त्यात मुख्य मार्गांवरील रस्ता रुंदीकरण, डांबरीकरण, लोखंडी रेलिंग, रंगरंगोटी आदींची कामे अंतिम टप्प्यात आहेत.
यंदाचा यात्रेचा मुख्य दिवस सोमवारी (दि. १०) आहे. यासाठी संपूर्ण महाराष्ट्रासह कर्नाटक, आंध्र आणि गोवा आदी ठिकाणांहून सात लाखांहून अधिक भाविक जोतिबा डोंगरावर येण्याची शक्यता गृहीत धरून प्रशासनाने विशेषत: शहर वाहतूक शाखेने जोतिबा डोंगर परिसरात ६० हजारांहून अधिक वाहनांसाठी वाहनतळ बनविला आहे. या वाहनतळाचे सपाटीकरण व रुंदीकरणही अंतिम टप्प्यात आले आहे. याशिवाय गिरोली फाटा, दाणेवाडी, गायमुख तलावाजवळील पडीक, शेतातील जागा, जोतिबा डोंगरावरील पिराचा कडा, यात्री निवास, जुने शासकीय विश्रामगृह, व्यापारी संकुल, यमाई बाग, आदी परिसरात वाहनतळाची जागा सपाटीकरण व रुंदीकरण काम सुरू आहे. त्यातील बहुतांशी काम पूर्णत्वाकडे आले आहे.
जोतिबा डोंगर परिसरातील मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्यांचे रुंदीकरण व डांबरीकरणही अंतिम टप्प्यात आले आहे. सेंट्रल प्लाझा येथील दोन्ही बाजूंचे मुख्य गेटजवळील डांबरीकरण व बॅरेकेटिंगचे कामही पूर्णत्वाकडे आले आहे. मंदिराजवळील नगारखाना दक्षिण दरवाजाकडील काही दुकानांचे अतिक्रमण काढले असून हा परिसरही मोकळा श्वास घेऊ लागला आहे.
मंदिर परिसरातील दर्शनरांग तीन पदरीऐवजी दुपदरी करण्यात आली आहे. त्यामुळे सासनकाठ्या नाचविण्यासाठी भाविकांना आणखी जागा उपलब्ध झाली आहे. यात्राकाळात लाखो भाविकांची गर्दी लक्षात घेता मंदिर प्रशासनाने १६ सीसी टीव्ही कॅमेरे बसविले आहेत. याशिवाय भक्तांना दर्शन बाहेरूनच मिळावे, याकरिता सहा मोठे स्क्रीन लावण्यात येणार आहेत. (प्रतिनिधी)
गुलालाची उधळण
जोतिबाला प्रिय अशा गुलाल-खोबऱ्याची उधळण केली जाते. यासाठी विशेष राजापुरी खोबरे लागते, तर गुलालासाठी खास सरपंच गुलालालाही विशेष मागणी आहे. याकरिता १७५ टन राजापुरी सुके खोबरे, तर १८ लाखाहून अधिक नारळांची आवक या काळात अपेक्षित आहे. तर गुलालाचीही तीनशे टनांहून अधिक उधळण केली जाते. याशिवाय जोतिबाला प्रिय असा ‘दवणा’ही वाहिला जातो. लाखो रुपयांच्या दवण्याची शेती ही केवळ पन्हाळा तालुक्यातील केखले गावातच केली जाते. गुलाल-खोबरे व
नारळ आणि दवणा यांची मोठी उलाढाल अपेक्षित आहे. प्रसाद, पूजेचे साहित्य, खेळणी आदींची दुकानेही यात्रेसाठी सज्ज झाली आहेत.
या संस्था भाविकांच्या सेवेसाठी सज्ज
सहज सेवा ट्रस्ट, व्हाईट आर्मी, यशवंत आयुर्वेदिक महाविद्यालय डॉक्टरांचे पथक, डॉ. डी. वाय. पाटील मेडिकल कॉलेज पथक, अनिरुद्ध उपासना संस्थेचे स्वयंसेवक व दुचाकी बंद पडल्यास ती त्वरित दुरुस्त करून देण्यासाठी कोल्हापूर जिल्हा टू व्हीलर मेकॅनिक असोसिएशन, आदी भाविकांच्या सेवेत असणार आहेत.
दोन लाख भाविक घेणार लाभ
आर. के. मेहता चॅरिटेबल ट्रस्टच्यावतीने जोतिबा चैत्र यात्रेनिमित्त आयोजित मोफत अन्नछत्राचे यंदा २५ वे वर्ष आहे. या अन्नछत्राचे उद्घाटन श्री अदृश्य काडसिद्धेश्वर महाराज यांच्या हस्ते व विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्या प्रमुख उपस्थितीत रविवारी (दि. ९) होणार आहे. दोन दिवस चालणाऱ्या या अन्नछत्राचा सुमारे दोन लाख भाविक लाभ घेतील, अशी माहिती आर. के. मेहता यांनी पत्रकार परिषदेत दिली. मेहता म्हणाले, यावर्षी ९ ते ११ एप्रिल या कालावधीत अन्नछत्राचे आयोजन केले आहे. हे अन्नछत्र जोतिबा डोंगरावरील एस. टी. स्टँडशेजारी भरविण्यात येणार आहे. येथे कळंबा येथील सिद्धकला महिला बचत गटाच्या ६० महिला योगदान देणार आहेत. पिण्याच्या पाण्यासाठी वारणा दूध संघाच्यावतीने सोय करण्यात येणार आहे. यावेळी अनिल घाटगे, महादेव पाटील, व्ही. बी. शेटे, आण्णा राणे, सुभाष देशमाने, बाळासाहेब कांदळकर, मोहन हजारे, जगदीश हिरेमठ, सरोजिनी पाटील, रवी कांबळे, आदी उपस्थित होते.