भाजप सहकारातील शिरकावासाठी सज्ज
By admin | Published: November 2, 2014 10:47 PM2014-11-02T22:47:09+5:302014-11-02T23:29:42+5:30
चंद्रकांतदादांना मंत्रिपद : राज्य बॅँकेसह ‘गोकुळ’, जिल्हा बॅँकांवर लक्ष
कोल्हापूर : चंद्रकांतदादा पाटील यांना सहकार मंत्रिपद मिळाल्याने पश्चिम महाराष्ट्रातील सहकारात भाजपचा शिरकाव होणार असल्याने कार्यकर्त्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. राज्य सहकारी बॅँकेसह जिल्हा बॅँका, ‘गोकुळ’ या संस्थांमध्ये भाजपचे वजन राहणार, हे निश्चित असल्याने पाटील यांच्या मंत्रिपदाने पक्षाच्या कार्यकर्त्यांना आगामी काळात बळ मिळणार आहे.
सहकार व कॉँग्रेस-राष्ट्रवादी कॉँग्रेस हे समीकरण गेली अनेक वर्षे महाराष्ट्राच्या राजकारणात पाहावयास मिळाले. त्याला कारणेही तशीच आहेत. साडेचार वर्षांचा अपवाद वगळता राज्यात कॉँग्रेस-राष्ट्रवादीची सत्ता राहिली आहे. त्यामुळे सहकारी संस्थांवर त्यांचेच प्रभुत्व राहिले आहे. काही अपवाद वगळता एकाही बड्या सहकारी संस्थेत भाजपच्या कार्यकर्त्याला संधी मिळालेली नाही. आता राज्यात भाजपची सत्ता आल्याने कार्यकर्त्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. त्यात चंद्रकांतदादा पाटील यांच्याकडे सहकार, पणन, सार्वजनिक बांधकाम, वस्त्रोद्योग या महत्त्वाच्या खात्यांची जबाबदारी देऊन भाजपने सहकाराचे जाळे असणाऱ्या पश्चिम महाराष्ट्रात आपली पाळेमुळे घट्ट करण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. मंत्री पाटील यांच्या रूपाने कोल्हापूरला तिसऱ्यांदा सहकार मंत्रिपद मिळत आहे. यापूर्वी ज्येष्ठ नेते प्रा. एन. डी. पाटील यांनी १९७८ मध्ये ‘पुलोद’ सरकारमध्ये सहकारमंत्री म्हणून काम केले होते. या काळात त्यांनी खऱ्या अर्थाने या खात्याला न्याय मिळवून दिला. कापूस एकाधिकार योजना, गूळ, सोयाबीनच्या खरेदीत थेट बाजार समित्यांना उतरवून व्यापाऱ्यांना सरळ करण्याचे काम प्रा. पाटील यांनी केले होते. त्यानंतर १९९९ ला कॉँग्रेस-राष्ट्रवादीच्या आघाडी सरकारमध्ये सहकार राज्यमंत्री म्हणून स्वर्गीय बाबासाहेब कुपेकर यांना संधी मिळाली होती. त्यानंतर चंद्रकांतदादा पाटील यांना सहकारमंत्री म्हणून काम करण्याची संधी मिळाली आहे.
कोल्हापूर जिल्ह्याचा विचार केला तर सध्या जिल्ह्यातील सर्वच संस्थांवर कॉँग्रेस-राष्ट्रवादीचे वर्चस्व आहे. ‘गोकुळ,’ जिल्हा बॅँक, बाजार समिती, साखर कारखाने येथे भाजपचा एकही कार्यकर्ता संचालक म्हणून कार्यरत नाही. त्यामुळे येथून पुढे या संस्थांमध्ये भाजप कार्यकर्त्यांचा शिरकाव होणार, हे निश्चित आहे. मंत्री पाटील यांच्या माध्यमातून भाजपच्या कार्यकर्त्यांना बळ मिळाले आहे. (प्रतिनिधी)
कोल्हापूर जिल्ह्याचे आतापर्यंतचे मंत्री (कॅबिनेट)
रत्नाप्पाण्णा कुंभार (काँग्रेस)
प्रा. एन. डी. पाटील (पुलोद)
जयवंतराव आवळे (काँग्रेस)
प्रकाश आवाडे (काँग्रेस)
दिग्विजय खानविलकर (राष्ट्रवादी)
विनय कोरे (जनसुराज्य)
हसन मुश्रीफ (राष्ट्रवादी)
चंद्रकांतदादा पाटील (भाजप)
फडणवीस यांचे सूतोवाच खरे ठरले
आगामी मंत्रिमंडळात राज्याचा सहकारमंत्री हा कोणत्याही साखर कारखाना, दूध संघाशी संबंधित आमदार असणार नाही, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शपथविधीनंतर दिलेल्या मुलाखतीत सांगितले होते. त्याप्रमाणे चंद्रकांतदादा पाटील यांच्यासारख्या कार्यकर्त्याला संधी देऊन फडणवीस यांनी आपले सूतोवाच खरे केले.
सहकारमंत्रीच पुन्हा पालकमंत्री?
गेल्या पाच वर्षांत आघाडी सरकारमध्ये माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील हेच कोल्हापूरचे पालकमंत्री होते. आता हे खाते चंद्रकांतदादा पाटील यांना मिळाले आहे. कोल्हापूरचे पालकमंत्री म्हणून चंद्रकांतदादा पाटील यांचीच वर्णी लागण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे कोल्हापूरला सहकारमंत्रीच पुन्हा पालकमंत्री म्हणून मिळणार आहे.