गणेशोत्सवासाठी पोलीस यंत्रणा सज्ज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 13, 2017 12:21 AM2017-08-13T00:21:36+5:302017-08-13T00:21:36+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : यंदाचा गणेशोत्सव उत्साही वातावरणात पार पाडण्यासाठी गणरायाच्या आगमनापासून ते विसर्जन मिरवणुकीपर्यंतच्या बंदोबस्ताची आखणी शनिवारी करण्यात आली. शनिवारी दुपारी शहर पोलीस उपअधीक्षक कार्यालयात शहरातील चारही पोलीस ठाण्यांच्या निरीक्षकांची बैठक झाली. गणराया अवॉर्ड, विसर्जन मिरवणूक मार्ग, बंदोबस्त, मंडळांच्या बैठका घेऊन जनजागृती व प्रबोधन करण्यासंबंधी चर्चा झाली.
यंदाचा गणेशोत्सव निर्विघ्नपणे पार पडावा यासाठी पोलिसांची दोन महिन्यांपासून जय्यत तयारी सुरू आहे. बंदोबस्ताच्या पार्श्वभूमीवर शनिवारी शहर पोलीस उपअधीक्षक कार्यालयात शहरातील लक्ष्मीपुरी, जुना राजवाडा, शाहूपुरी, राजारामपुरी पोलीस ठाण्यांच्या निरीक्षकांची बैठक झाली. यावेळी पोलीस उपअधीक्षक डॉ. प्रशांत अमृतकर यांनी गणरायाच्या आगमनापासून ते विसर्जनापर्यंतच्या कालावधीच्या बंदोबस्तासंबंधी चर्चा करून त्याप्रमाणे आखणी करण्याचे नियोजन केले. जमाव नियंत्रण, कायदा आणि सुव्यवस्था, मिरवणुकीचे संरक्षण, रस्त्यांवरील वाहतूक कोंडी तसेच कोणताही अप्प्रकार टाळण्यासाठी अनेक उपाय योजले जात आहेत, तसेच काही निर्बंधही लादले जाणार आहेत. शून्य पार्किंग, फेरीवालामुक्त मार्ग याबाबत चर्चा करण्यात आली आहे. रस्त्यावरील गुन्हे रोखणे आणि वाहतूक व्यवस्था सुरळीत राखणे, यानुसार पोलीस बंदोबस्ताची व्यूहरचना आखली जात आहे. या संपूर्ण बंदोबस्ताची पाहणी विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील व पोलीस अधीक्षक संजय मोहिते करणार आहेत. नियोजन बैठकीस पोलीस निरीक्षक तानाजी सावंत, संजय मोरे, संजय साळुंखे, निशिकांत भुजबळ, आदी उपस्थित होते.
मिरवणूक मार्गाची आखणी
मिरवणुकीदरम्यान यावेळी अनेक मार्ग बंद केले जाणार आहेत, तसेच अनेक मार्ग एकदिशा केले जाणार आहेत. मिरजकर तिकटी, बिनखांबी गणेश मंदिर, महाद्वार रोड, पापाची तिकटी, गंगावेश मार्ग, पंचगंगा घाट व इराणी खण तसेच राजारामपुरी मेनरोड ते राजाराम तलाव या विसर्जन मिरवणूक मार्गावर अगदी सायकललासुद्धा पार्किंग करायला परवानगी नाकारली आहे. त्याबाबत नागरिकांना सतत ध्वनिक्षेपकावरून सूचना दिल्या जाणार आहेत. हा संपूर्ण मार्ग सीसीटीव्हीच्या निगराणीखाली असणार आहे.
विशेष पथकांची नियुक्ती
महिला आणि बालकांच्या संरक्षणाला सर्वोच्च प्राधान्य देण्यात आले असून, छेडछाडविरोधी पथक, मोबाईल चोरीविरोधी पथक, सोनसाखळी चोरीविरोधी पथक, आदी विशेष पथकेही तैनात केली जाणार आहेत.