महाविद्यालये सुरू करण्याचा अहवाल तयार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 7, 2021 04:22 AM2021-02-07T04:22:41+5:302021-02-07T04:22:41+5:30
कोल्हापूर : विद्यापीठातील अधिविभाग, महाविद्यालये १५ फेब्रुवारीपासून सुरू केली तर ती कशापद्धतीने भरवायची, अभ्यासक्रम व परीक्षांचे वेळापत्रक काय ...
कोल्हापूर : विद्यापीठातील अधिविभाग, महाविद्यालये १५ फेब्रुवारीपासून सुरू केली तर ती कशापद्धतीने भरवायची, अभ्यासक्रम व परीक्षांचे वेळापत्रक काय स्वरूपाचे असेल याबाबतचा सविस्तर अहवाल तयार करण्यात आला आहे. तो मंगळवारी (दि. ९) विद्यापरिषदेकडे मंजुरीसाठी पाठवला जाणार आहे. परिषदेच्या मंजुरीनंतर तो बुधवारी (दि. १०) रोजी होणाऱ्या व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत अंतिम मंजुरीसाठी ठेवला जाणार आहे. त्यानंतर शासन आदेशाच्या अधीन राहून महाविद्यालये सुरू केली जाणार आहेत.
राज्य सरकारने महाविद्यालये १५ फेब्रुवारीपासून ५० टक्के विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत रोटेशननुसार सुरू करण्याचे आदेश काढले आहेत. त्यानुसार शनिवारी दुपारी शिवाजी विद्यापीठात महाविद्यालय प्रतिनिधींसमवेत प्राचार्य डॉ. डी. जी. कणसे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली.
विद्यापीठ कार्यक्षेत्रात सुमारे २७६ महाविद्यालये, विद्यापीठात ४० अधिविभाग आहेत. अडीच लाखांहून अधिक विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. लॉकडाऊनपासून गेले १० महिने महाविद्यालये बंदच आहेत. आता कोरोनाचा कहर कमी झाल्याने महाविद्यालये सुरू करण्याची तयारी सुरू झाली आहे. शिक्षण मंत्र्यांच्या तशा सूचना आल्यानंतर तशी तयारीही सुरू झाली आहे.
या अनुषंगाने महाविद्यालये सुरू करण्याबाबत समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीने शनिवारी विस्तृत आढावा घेतला. महाविद्यालयांमधील प्रात्यक्षिके, ऑनलाइन-ऑफलाइन वर्ग, वसतिगृहामध्ये विद्यार्थ्यांचे राहण्याचे नियोजन याबाबत चर्चा झाली. वसतिगृहांची स्वच्छता, सॅनिटायझेशन, विद्यार्थ्यांची सुरक्षा, इतर जिल्हे व परराज्यातून येणाऱ्या विद्यार्थ्यांचे नियोजन, इलेक्ट्रिक, फायर ऑडिटच्या कार्यवाहीचा आढावा घेतला गेला. बैठकीत उपकुलसचिव एम. पी. कदम, डॉ. पी. व्ही. कडोले, डॉ. एच. एन. मोरे, प्रा. डॉ. अक्षय सरवदे यांच्यासह समिती सदस्य उपस्थित होते.