पुढील आव्हानांसाठी विद्यार्थ्यांना सज्ज करा : गणेश देशमुख
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 6, 2018 04:20 PM2018-09-06T16:20:16+5:302018-09-06T16:39:41+5:30
मेन राजाराम हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजमध्ये शिक्षक दिनानिमित्त आयोजित पारितोषिक वितरण समारंभ आणि माजी विद्यार्थी मेळाव्यात पनवेल महानगरपालिकेचे आयुक्त गणेश देशमुख बोलत होते.
कोल्हापूर : पुढील आव्हानांसाठी विद्यार्थ्यांना सज्ज करणे आपले कर्तव्य आहे, अशा शब्दांत मेन राजाराम हायस्कूलचे माजी विद्यार्थी आणि पनवेल महानगरपालिकेचे आयुक्त गणेश देशमुख यांनी मार्गदर्शन केले.
मेन राजाराम हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजमध्ये शिक्षक दिनानिमित्त आयोजित पारितोषिक वितरण समारंभ आणि माजी विद्यार्थी मेळाव्यात देशमुख बोलत होते.
यावेळी माजी विद्यार्थ्यांमार्फत उपस्थित आजी-माजी शिक्षकांचा पुस्तक आणि भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी देणगीदारांच्या ठेवनिधीतून इयत्ता दहावी आणि बारावीच्या परीक्षेत उज्ज्वल यश मिळविलेल्या विद्यार्थ्यांना पारितोषिक देण्यात आले; तसेच शिष्यवृत्तीचे वितरण करण्यात आले. अध्यक्षस्थानी माजी प्राचार्य डॉ. व्ही. व्ही. पाटील आणि प्रभारी प्राचार्य अशोकराव देशमुख होते.
यावेळी देशमुुख यांनी आपल्या शालेय जीवनातील आठवणी सांगून शाळेस सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. डॉ. पाटील यांनीही शिक्षक दिनाचे औचित्य साधून शिक्षकांनी केलेल्या कामाचे कौतुक केले.
यावेळी माजी विद्यार्थी बाजीराव माणगावे, संध्या शिंदे यांनी आपल्या शालेय जीवनातील आठवणींना उजाळा दिला. सुप्रिया पोवार आणि शिवानी पाटील या पारितोषिकप्राप्त विद्यार्थ्यांनीही त्यांनी मिळविलेल्या यशाबद्दल सर्वांचे आभार मानले. प्रवीण चव्हाण, सखाराम भोसले, नितीन काकडे आणि संजय खराडे यांनी या कार्यक्रमाचे संयोजन केले.
प्राचार्य अशोकराव देशमुख यांनी प्रास्तविक केले. पाहुण्यांची ओळख व्ही. बी. डोणे यांनी करून दिली, तर ए. एस. देवकर यांनी आभार मानले. बी. पी. माळवे आणि जी. व्ही. खाडे यांनी सूत्रसंचालन केले. या कार्यक्रमासाठी जिल्हा परिषदेच्या शिक्षण समितीचे सदस्य, शाळा व्यवस्थापन व विकास समितीचे सदस्य, किशोरी उत्कर्ष मंच व मेन राजाराम हायस्कूलच्या शिक्षक-पालक संघाचे सदस्य उपस्थित होते.