जोतिबा विकास आराखडा ३ फेब्रुवारीपर्यंत तयार करा, आमदार विनय कोरेंनी देवस्थानला केली सूचना

By ऑनलाइन लोकमत | Published: January 24, 2023 02:11 PM2023-01-24T14:11:29+5:302023-01-24T14:12:25+5:30

प्रारूप विकास आराखडा करण्यासाठी राष्ट्रीय पातळीवरील आर्किटेक्टची नियुक्ती करण्यात येणार

Prepare the Jotiba Development Plan by February 3, MLA Vinay Kore instructed the Devasthan samiti | जोतिबा विकास आराखडा ३ फेब्रुवारीपर्यंत तयार करा, आमदार विनय कोरेंनी देवस्थानला केली सूचना

जोतिबा विकास आराखडा ३ फेब्रुवारीपर्यंत तयार करा, आमदार विनय कोरेंनी देवस्थानला केली सूचना

Next

कोल्हापूर : जोतिबा संवर्धन प्राधिकरणअंतर्गत जोतिबा मंदिराचा विकास करण्यात येणार असून, त्यासाठी राज्य व देशपातळीवरील देवस्थानांचा अभ्यास करून ३ फेब्रुवारीपर्यंत आराखडा तयार करा, अशी सूचना आमदार विनय कोरे यांनी सोमवारी देवस्थान समितीला केली. मंदिराचा प्रारूप आराखडा तयार करण्यासाठी आर्किटेक्टची नियुक्ती करून निविदा प्रक्रिया राबवण्यासाठी अर्थ व नियोजन विभागाला पत्र पाठवण्यात येणार आहे.

जोतिबा मंदिर विकास आराखड्यासंदर्भात सोमवारी आमदार विनय कोरे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेतली. यावेळी जिल्हाधिकारी राहुल रेखावार, पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे सचिव शिवराज नाईकवाडे, अप्पर जिल्हाधिकारी संजय शिंदे, पालकमंत्र्यांचे स्वीय सहाय्यक अमित कामत उपस्थित होते.

प्राधिकरणाअंतर्गत जोतिबा मंदिराचा विकास करण्यासाठी अशा पद्धतीने विकास झालेल्या तिरुपती, श्रीशैल, पंढरपूर, अयोध्या, शेगाव अशा देश व राज्यातील मंदिरांचा अभ्यास करण्यात येणार आहे. ही जबाबदारी देवस्थान समितीचे सचिव शिवराज नाईकवाडे यांना दिली असून, त्यांनी या सर्व देवस्थानांच्या चांगल्या बाबींचा समावेश करून जोतिबा मंदिर विकासाचा आराखडा ३ फेब्रुवारी तयार करून तो प्रशासनाला सादर करायचा आहे. त्यात आवश्यक असल्यास बदल करून किंवा त्याला अंतिम स्वरुप दिले जाईल व हा आराखडा प्राधिकरण विभागाला पाठवण्यात येणार आहे.

प्रारूप विकास आराखडा करण्यासाठी राष्ट्रीय पातळीवरील आर्किटेक्टची नियुक्ती करण्यात येणार असून, त्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने शासनाची मंजुरी घ्यावी, असे ठरले. ही सर्व प्रक्रिया सुरू असतानाच आराखाड्यातील एक एक कामांची निविदा प्रक्रिया सुरू करण्यात यावी, असे पत्र अर्थ व नियोजन विभागाला पाठवण्यात येणार आहे.

Web Title: Prepare the Jotiba Development Plan by February 3, MLA Vinay Kore instructed the Devasthan samiti

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.