हद्दवाढीचा अभिप्राय तयार : जिल्हाधिकारी
By admin | Published: January 1, 2016 12:25 AM2016-01-01T00:25:42+5:302016-01-01T00:27:03+5:30
शहराची हद्दवाढ करण्यासाठी महापालिकेकडून पाठपुरावा सुरू आहे.
कोल्हापूर : हद्दवाढीच्या प्रस्तावावरील अभिप्राय तयार आहे. ग्रामपंचायत, महापालिका व विधान परिषद निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे तो शासनाकडे पाठविण्यात आला नाही. आता शासनाच्या नगरविकास विभागाकडे यासंदर्भात विचारणा केली जाईल. त्यांच्याकडून मार्गदर्शन आल्यावर पुढील कार्यवाही केली जाईल, अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी यांनी गुरुवारी पत्रकारांशी बोलताना दिली.
शहराची हद्दवाढ करण्यासाठी महापालिकेकडून पाठपुरावा सुरू आहे. शहरालगतची अठरा गावे आणि दोन एमआयडीसी यांचा हद्दवाढीच्या प्रस्तावात समावेश आहे. हा प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांच्या अभिप्रायाने शासनाच्या नगरविकास विभागाला पाठवायचा होता.परंतु, गेल्या दोन महिन्यांत ग्रामपंचायत निवडणूक, त्यानंतर महापालिका निवडणूक व आता विधान परिषद निवडणूक यांच्या आचारसंहितेमुळे या प्रस्तावावरील अभिप्राय जिल्हाधिकाऱ्यांना पाठविता आला नाही; परंतु आता आचारसंहिता संपणार आहे.
त्या पार्श्वभूमीवर शासनाला अभिप्राय केव्हा पाठविणार, अशी विचारणा पत्रकारांनी केल्यावर जिल्हाधिकारी सैनी म्हणाले, हद्दवाढीच्या प्रस्तावावर अभिप्राय तयार आहे. निवडणुकांच्या आचारसंहितेमुळे तो पाठविण्यात आलेला नाही. आता तो पाठवायचा का याबाबत नगरविकास विभागाला विचारणा करू. त्यांच्याकडून मार्गदर्शन आल्यावर पुढील कार्यवाही केली जाईल. (प्रतिनिधी)