कोल्हापूर जिल्ह्यात मान्सूनपूर्व पावसाची हजेरी, वातावरणात गारवा
By ऑनलाइन लोकमत | Published: June 6, 2024 02:18 PM2024-06-06T14:18:52+5:302024-06-06T14:19:16+5:30
आजपासून रोज हजेरी
कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यात बुधवारी दुपारपासून मान्सूनपूर्व पावसाने हजेरी लावली. रात्रीपर्यंत पावसाची एकसारखी भुरभुर राहिली, मान्सून सुरू झाल्यासारखेच वातावरण राहिल्याने गारवा निर्माण झाला होता. आज, गुरुवार पासून पाऊस रोज हजेरी लावेल, असा अंदाज हवामान विभागाचा आहे.
यंदा मान्सून देव भूमीत लवकर दाखल झाला आहे. त्याचा महाराष्ट्राकडे आगेकूच करण्याचा वेग चांगला असल्याने मागील दोन दिवसांपासून कोल्हापूर जिल्ह्यातील वातावरणात बदल जाणवत आहे. बुधवारी सकाळी ढगाळ वातावरण राहिले. त्यानंतर एकदम तापमानात वाढ झाली आणि अंगातून घामाच्या धारा वाहू लागल्या. दुपारनंतर पुन्हा वातावरणात बदल होऊन ढगाळ वातावरण झाले, दुपारी दीड वाजता कोल्हापूर शहरात पावसाच्या जोरदार सरी कोसळल्या. त्यानंतर थोडा वेळ उसंत घेतली, साडेपाच नंतर पुन्हा पावसाची भुरभुर सुरू झाली. मान्सूनच्या आगमनासारखे वातावरण राहिले. आजपासून आठ दिवस पावसाची रोज हजेरी राहील, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
शेतकऱ्यांची तारांबळ..
दुपारनंतर मान्सून सुरू झाल्या सारखे वातावरण झाले. त्यात काही ठिकाणी जोरदार पाऊस कोसळला तर त्यानंतर भुरभुर सुरू झाल्याने पाऊस सुरुच झाला म्हणून शेतकऱ्यांची तारांबळ उडाली आहे.
तापमान २८ डिग्रीपर्यंत
यंदा कमाल तापमानाने उच्चांक गाठला हाेता. मात्र, गेल्या दोन दिवसांपासून जिल्ह्याच्या कमाल तापमानात घट झाली. बुधवारी २८ डिग्रीपर्यंत राहिले.
कुंभी-कासारी परिसरात दीड तास मुसळधार पाऊस
कोपार्डे : ढगाळ वातावरण असूनही दोन दिवस पावसाने हुलकावणी दिली होती. बुधवारी सकाळपासून ढगाळ वातावरण व हवेत प्रचंड उष्णता होती. कुंभी कासारी परिसरात दुपारी साडेबारा वाजता पावसाला सुरुवात झाली. जवळपास दीड तास मुसळधार पाऊस झाला.
कोल्हापूर जिल्ह्यात सर्व ठिकाणी मान्सूनपूर्व पावसाने हजारी लावली होती. कुंभी-कासारी परिसरात मात्र एक-दोन वेळा हलका पाऊस झाला होता. शेतकऱ्यांना मोठ्या पावसाची प्रतीक्षा होती. गेली दोन दिवस ढगाळ वातावरण व हवेतील उष्णता यामुळे पावसाची शक्यता वर्तवण्यात येत होती. दुपारी साडेबारा वाजता पावसाच्या हलक्या सरींना सुरवात झाली. यानंतर विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाला सुरुवात झाली. जवळपास दीड तास हा पाऊस कोसळत होता. कुणबी कासारी परिसरातील शेतकऱ्यांना पावसाची प्रतीक्षा होती. आजच्या मुसळधार पावसाने भाताची धूळवाफ पेरणी झालेल्या क्षेत्राबरोबर ऊसाच्या पिकालाही त्याचा फायदा झाला आहे. अचानक आलेल्या मुसळधार पावसाने मात्र लोकांची तारांबळ उडाली.
पन्हाळा तालुक्यात मान्सूनपूर्व पावसाची दमदार एंट्री
पोर्ले तर्फ ठाणे : पन्हाळ्यात मान्सूनपूर्व पावसाने दमदार हजेरी लावल्याने शेतकऱ्यांतून समाधान व्यक्त होत आहे. पेरणी केलेल्या भात पिकांची उगवण आणि ऊस पिकांच्या पोषक वाढीसाठी हा पाऊस उपयुक्त ठरणारा आहे. गेल्या दोन दिवसापासून तालुक्यात ढगाळ वातावरण. तर कुठे तुरळक पावसाची पडल्याने भात पेरणीसाठी शेतकऱ्यांची धांदल उडाली होती.
यंदा पाऊस चांगला लागणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला असला तरी मान्सूनपूर्व पावसाने पेरणीच्या पूर्वसंध्येला दिलेली हुलकावणी शेतकरी चिंता वाढविणारी होती. जेथे शक्य असेल तेथील शेतकऱ्यांनी पाटाने पाणी देऊन भाताची उगवण करून घेतली आहे. तालुक्यातील डोंगर माथ्यावरील आणि माळामुरडाच्या शेतातील पेरणीस पावसाची गरज होती. त्याची उणीव बुधवारी पडलेल्या दमदार पावसाने भरून काढल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. पावसाच्या प्रतीक्षेत असणारा शेतकरी उसाला रासायनिक खताचा मिरगी डोस टाकण्यासाठी शेतकऱ्यांची धांदल उडणार आहे.
विजांसह कडकडाटासह पावसाने हलकर्णीकरांची तारांबळ
हलकर्णी : दुपारी तीनच्या सुमारास विजेच्या कडकडाटासह तासभर जोरदार पावसाने हजेरी लावल्याने हलकर्णीकरांची तारांबळ उडाली. बुधवारी हलकर्णीच्या बाजाराच्या दिवशीच पावसाने हजेरी लावल्याने व्यापारी व बाजारासाठी आलेल्या नागरिकांची धावपळ उडाली. अनेकांचा भाजीपालाही वाहून गेला. तासाभरानंतर पावसाचा जोर कमी झाला. मात्र, संध्याकाळी पाचपर्यंत पावसाची रिपरिप सुरूच होती.
हलकर्णीच्या मुख्य ओढ्यावर पाणी आल्याने हलकर्णी बसर्गे रस्ता सुमारे तासभर बंद होता. त्यामुळे दोन्ही बाजूला वाहतुकीची कोंडी झाली. हलकर्णीसह परिसरातील हा पाऊस जोरदार झाल्याने ओढ्यास पाणी आल्याचे सांगण्यात येत होते. मुख्य बाजारपेठेतील पाणी साचून राहिल्याने अनेक व्यापाऱ्यांनी आपापली दुकाने हलविली. गावातील मुख्य रस्ता रस्त्याच्या बाजूच्या अनेक गटारी तुंबल्याने येथील तेरणी रस्त्यावरील ओढ्याप्रमाणेच पाणी वाहत होते.