जिल्हा परिषदेत सध्या अभिनंदन आणि शुभेच्छांचे वातावरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 16, 2021 04:18 AM2021-07-16T04:18:25+5:302021-07-16T04:18:25+5:30
कोल्हापूर जिल्हा परिषदेत सध्या फुलांच्या माळा, पुष्पगुच्छ, पेढ्यांचे पुडे, गोड दूध आणि अभिनंदन, शुभेच्छा असे ...
कोल्हापूर जिल्हा परिषदेत सध्या फुलांच्या माळा, पुष्पगुच्छ, पेढ्यांचे पुडे, गोड दूध आणि अभिनंदन, शुभेच्छा असे वातावरण पाहावयास मिळत आहे. नव्या पदाधिकाऱ्यांच्या निवडीनंतर पुष्पगुच्छांचा खच पडला असून, आता सोमवारपासूनच कामकाजाला गती येणार आहे.
अध्यक्षपदी राहुल पाटील यांची निवड झाल्यानंतर बुधवारी आणि गुरुवारी पाटील सकाळी ११ पासून संध्याकाळपर्यंत जिल्हा परिषदेतच थांबले. त्यांना शुभेच्छा देण्यासाठी ज्येष्ठ कार्यकर्त्यांबरोबरच मोठ्या संख्येने तरुण येत असल्याचे दिसून येते. ज्येष्ठ नेते आमदार पी. एन. पाटील यांचे चिरंजीव असल्याने ज्येष्ठ कार्यकर्तेही शुभेच्छा देण्यासाठी येत आहेत, तर तरुण ‘राहुलभैय्यां’ना शुभेच्छा देण्यासाठी गर्दी करत आहेत.
उपाध्यक्ष जयवंतराव शिंपी दोन दिवस आलेले नाहीत. शुक्रवारी खासदार संजय मंडलिक, आमदार राजेश पाटील, ए. वाय. पाटील आणि अर्जुन आबिटकर यांच्या उपस्थितीत त्यांचा कार्यालय प्रवेश आहे. त्यांचे आजरा तालुक्यातील समर्थकही यावेळी येणार आहेत. बांधकाम समिती सभापती वंदना जाधव गेले दोन दिवस आल्या नाहीत. भागात कार्यकर्ते येत असल्याने त्या थांबल्या आहेत. महिला बालकल्याण समिती सभापती शिवानी भोसले आणि समाजकल्याण समिती सभापती कोमल मिसाळ यांचे कार्यालय प्रवेश झाले आहेत.
त्यामुळे सर्वत्र अभिनंदन आणि शुभेच्छा असेच वातावरण आहे. शुक्रवारचा दिवस सरला की दोन दिवस सुट्टी असल्याने आता सोमवारनंतरच पदाधिकारी कार्यरत होणार आहेत.