सध्याच्या जागेतच करवीर पं. स.चे कार्यालय
By admin | Published: June 3, 2014 01:03 AM2014-06-03T01:03:52+5:302014-06-03T01:26:13+5:30
दिलीप टिपुगडे : भविष्यातील तरतूद म्हणूनच शेंडा पार्कातील जागेचे आरक्षण
कसबा बावडा : ‘करवीर’ पंचायत समितीचे कार्यालय सध्याच्या आहे त्या जागेतच राहणार असून, केवळ भविष्यकाळातील तरतूद म्हणून जिल्हा परिषदेतच करवीर पंचायत समितीसाठी शासनाकडे जागेची मागणी केली आहे, अशी माहिती करवीर पंचायत समितीचे सभापती दिलीप टिपुगडे यांनी आज (सोमवार) पत्रकार परिषदेत दिली. करवीर पंचायत समितीची सध्याची जागा आणि इमारत ही भाडेतत्त्वावर आहे. विजयसिंह घाटगे व इतर मालकांची ही जागा असून, या जागेबाबत न्यायालयात दावा प्रलंबित आहे. त्यामुळे या इमारतीत कोणत्याही प्रकारच्या सोयी-सुविधा करता येत नाहीत. त्यामुळे पंचायतसाठी जागा मिळावी म्हणून ठराव करून तो जिल्हा परिषदेकडे पाठविला होता. या इमारतीत पूर्वी संस्थानकातील पॉवर हाऊस होते. १९६५ ला जिल्हा परिषदेने ही जागा भाड्याने घेऊन करवीर पंचायत समितीला दिली. या इमारतीमधून समितीचे कार्यालय हलवावे आणि जागा ताब्यात द्यावी म्हणून जागामालकांनी २०११ ला न्यायालयात दावा दाखल केला आहे. हा दावा न्यायप्रविष्ठ असतानाच कोल्हापूर महानगरपालिकेने किरकोळ व्यापारी गाळे व संकुलासाठी ही जागा आरक्षित केली आहे. आज ना उद्या चुकूनही जागा सोडायला लागलीच, तर भविष्यात अडचण नको म्हणून तसेच शहराच्या मध्यवस्तीत पंचायतसाठी भलीमोठी जागा मिळणे अशक्य असल्याने जि. प.ने नुकत्याच झालेल्या सभेत एक ठराव करून शेंडा पार्क येथील दोन हेक्टर ९८ आ. जागेचा ठराव मांडला. पंचायत समितीला जागा कुठे द्यायची हा अधिकार जि. प.ला आहे, पंचायत समितीला नाही, असेही सभापती टिपुगडे यांनी यावेळी स्पष्ट केले. या पत्रकार बैठकीत पंचायत समितीचे सदस्य सचिन पाटील, भुजगोंडा पाटील, जयसिंग काशीद, युवराज गवळी, आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)