अंबाबाई मंदिराच्या आराखड्याचे आज मुंबईत सादरीकरण
By Admin | Published: June 9, 2017 12:13 AM2017-06-09T00:13:20+5:302017-06-09T00:13:20+5:30
अंबाबाई मंदिराच्या आराखड्याचे आज मुंबईत सादरीकरण
लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : गेल्या आठ वर्षांपासून रखडलेला अंबाबाई मंदिराचा तीर्थक्षेत्र विकास आराखडा आज, शुक्रवारी मुंबईत मुख्य सचिवांसमोर सादर होणार आहे. आराखड्याला प्रशासकीय मंजुरी मिळाली की त्यावर मुख्यमंत्र्यांच्या पुढील बैठकीत शिक्कामोर्तब होईल. त्यामुळे आराखड्याची ही अंतिम परीक्षा असणार आहे.
शुक्रवारी सकाळी साडेनऊ वाजता प्रधान सचिवांना आराखड्याची माहिती देण्यात येणार आहे. त्यानंतर दुपारी साडेतीन वाजता मुख्य सचिवांसमोर सादरीकरण करण्यात येणार आहे.
अंबाबाई मंदिराचा विकास आराखडा नगरसेवकांना कळावा यासाठी दोन दिवसांपूर्वी त्याचे सादरीकरण करण्यात आले होते. सुमारे ७० कोटींच्या या आराखड्याला मुख्य सचिवांची प्रशासकीय पातळीवरील मंजुरी मिळाली. पुढे त्यावर मुख्यमंत्री शिक्कामोर्तब करतात. त्यामुळे या सादरीकरणाकडे सगळ्यांचे डोळे लागले आहेत. महापालिका अधिकाऱ्यांच्या भाषेत सांगायचे म्हणजे आज, शुक्रवारी आराखड्याची अंतिम परीक्षा आहे.
बदलांचा अंतर्भाव होणार : या आराखड्यासंदर्भात यापूर्वी कोल्हापूरच्या जनतेने आणि दोन दिवसांपूर्वी स्थानिक नगरसेवकांनीही सूचना मांडल्या आहेत. भाविकांना कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये किंवा मंदिराच्या सौंदर्याला बाधा ठरू नये, या दृष्टीने विचार करून या सूचनांचा आराखड्यात अंतर्भाव करण्यात येणार आहे. यात दर्शन मंडपासाठी फरासखान्याच्या विचारासह अन्य बाबींचा समावेश आहे. दरम्यान, जर मंदिर राज्य संरक्षित स्मारक घोषित झाले तर त्या नियमांनुसारही आराखड्यात बदल करावे लागणार आहेत, अशी माहिती प्रकल्प अधिकारी सुरेश पाटील यांनी दिली.