कोल्हापूरच्या रंगकर्मींची आंतरराष्ट्रीय नाट्यमहोत्सवात झेप, 'आलोरगान' नाटक पोहोचले देशभर 

By संदीप आडनाईक | Published: January 30, 2023 02:17 PM2023-01-30T14:17:59+5:302023-01-30T14:18:22+5:30

या नाटकाला लागत नाही स्टेज, लाईट्स, मोठी जागा

Presentation of the play Alorgaan by young artists of Kolhapur in the International Drama Festival | कोल्हापूरच्या रंगकर्मींची आंतरराष्ट्रीय नाट्यमहोत्सवात झेप, 'आलोरगान' नाटक पोहोचले देशभर 

कोल्हापूरच्या रंगकर्मींची आंतरराष्ट्रीय नाट्यमहोत्सवात झेप, 'आलोरगान' नाटक पोहोचले देशभर 

googlenewsNext

संदीप आडनाईक

कोल्हापूर : दिल्ली, आसाम, बंगाल आणि महाराष्ट्र अशा चार राज्यांतील तब्बल पाच आंतरराष्ट्रीय नाट्यमहोत्सवात कोल्हापुरातील तरुण रंगकर्मींनी 'आलोरगान' या नाटकाचे सादरीकरण करून कोल्हापूरच्या शिरपेचात नवा तुरा खोवला आहे. या नाटकाने घेतलेली ही झेप प्रशंसनीय आहे. कोल्हापूरची तरुण अभिनेत्री प्रतीक्षा खासनीस आणि दिग्दर्शक कल्पेश समेळ यांनी हे नाटक देशभर पोहोचविले आहे.

टायनी टेल्स थिएटर कंपनी निर्मित, कोल्हापुरातील नामांकित सर्जनशाळा, भालजी पेंढारकर सांस्कृतिक केंद्र प्रस्तुत 'आलोरगान' हे कोल्हापूरचं नाटक आसाममध्ये पार पडलेल्या 'अंडर द साल ट्री' या प्रतिष्ठित नाट्यमहोत्सवात भारतभरातून आणि बाहेरच्या देशातून निवडल्या गेलेल्या सात नाटकांमध्ये सादर झालं. 

आसाममधल्या गोलपारा या जिल्ह्यात भरणारा हा नाट्यमहोत्सव 'शुक्राचार्य राभा' यांनी सुरू केला. आपलं जंगल, जमीन, आपल्या इथली झाडं, संस्कृती टिकून राहावी म्हणून चळवळ म्हणून हा नाट्यमहोत्सव सुरू झाला. सालच्या झाडांमधोमध भरणारा हा नाट्यमहोत्सव पाहण्यासाठी जगभरातून लोकं येतात. 

गेली १३ वर्षे सातत्याने शुक्राचार्य राभा आणि त्यानंतर मदन राभा हा महोत्सव भरवतात. या नाट्यमहोत्सवात लाईट्स, माईक अशा कोणत्याच गोष्टी वापरल्या जात नाहीत. सगळ्या भोवतालच्या झाडांमध्ये आवाज आदळला जातो आणि पुन्हा ऐकू येतो. सगळ्यांपर्यंत आवाज पोहोचतो. त्या जागेत आपलं नाटक सादर होणं ही प्रत्येक कलाकारासाठी खूप अविस्मरणीय गोष्ट असते.

देशभरातील विविध नाट्यमहोत्सवात सादर होणाऱ्या 'आलोरगान' नाटकासाठी दहाजणांचा चमू सगळ्यात तरुण मानला गेला आहे. याव्यतिरिक्त बंगालच्या रंगयात्रा आणि दिलीप मुखोपाध्याय स्मृती नाट्यमहोत्सव, दिल्लीतील दिल्ली इंटरनॅशनल आणि महाराष्ट्रातील पुण्यातील नाट्यसत्ताक या आंतरराष्ट्रीय नाट्यमहोत्सवात हे नाटक सादर करण्यात आले. आता साताऱ्यातील फोक थिएटरच्या आर्ट कल्चर या नाट्यमहोत्सवात हे नाटक सादर होणार आहे.

फिरतं नाटक ही संकल्पना प्रत्यक्षात आणत टायनी टेल्स थिएटरने चार वर्षांत शंभरहून अधिक गावांतील लोकांपर्यंत, त्यांच्या जागेत नाटक पोहोचवले आहे. या नाटकाला स्टेज, लाईट्स, मोठी जागा लागत नाही. हॉलमध्ये, घरात, अंगणात, छोट्या जागेत कुठेही हे नाटक सादर केलं गेलं. 'आलोरगान' शिवाय ‘कडेकोट कडेलोट’, ‘राजा आणि चोर’, ‘मंडी’ या नाटकांचेही प्रयोग या रंगकर्मींनी केले आहेत. -कल्पेश समेळ, दिग्दर्शक, आलोरगान.
 

Web Title: Presentation of the play Alorgaan by young artists of Kolhapur in the International Drama Festival

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.