डिजिटल आर्थिक साक्षरतेविषयी बसर्गेत पथनाट्याचे सादरीकरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 28, 2017 05:25 PM2017-09-28T17:25:51+5:302017-09-28T17:26:05+5:30
डिजिटल इंडिया आणि उज्वला अभियान या केंद्रसरकारच्या योजनेची माहिती देण्यासाठी गडहिंग्लज तालुक्यातील बसर्गे ग्रामपंचायतीच्या सहकार्याने पथनाट्याचे सादरीकरण करण्यात आले.
गडहिंग्लज , 28 : डिजिटल इंडिया आणि उज्वला अभियान या केंद्रसरकारच्या योजनेची माहिती देण्यासाठी गडहिंग्लज तालुक्यातील बसर्गे ग्रामपंचायतीच्या सहकार्याने पथनाट्याचे सादरीकरण करण्यात आले.
बसर्गे ग्रामपंचायतीच्या सभागृहामध्ये झालेल्या या कार्यक्रमामध्ये महागाव येथील संत गजानन महाराज रुरल पॉलिटेकनिकच्या राष्ट्रीय सेवा योजनेचे विद्यार्थ्यांनी कॉलेजचे प्राध्यापक तसेच एस.एम. हायस्कूलच्या विद्यार्थ्यांसमोर ग्रामस्थांच्या उपस्थितीत तांत्रिक शिक्षण आणि भीम अॅपबद्दल पॉवरपॉइंटचे सादरीकरण केले.
याशिवाय ग्रामपंचायतीच्या समोरील चौकामध्ये पॉलिटेकनिकच्या विद्यार्थ्यांनी डिजिटल आर्थिक साक्षरता याविषयीचे पथनाट्य सादर केले. या अभियानाच्या माध्यमातून भीम अॅपची माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचवण्यासाठी विद्यार्थ्यांनी गावठाण भागातील ८० घरामध्ये जाऊन जनजागृतीसाठी प्रयत्न केले.
सेवावर्धिनी व ग्रामपंचायत बसर्गे ग्रामपंचयातीने आयोजित केलेल्या या डिजिटल इंडिया जागृती अभियानामध्ये पॉलिटेकनिकच्या ६५ विद्यार्थ्यांसोबत प्रा. मुजावर व प्रा. युगंधरा चव्हाण सहभागी झाले. प्रा. मोहन तराळ यांनी कार्यक्रमाच्या प्रास्ताविकामध्ये डिजिटल इंडिया अभियानाचा उद्देश, व्याप्ती व महत्व स्पष्ट केले. एस. एम. हायस्कूलचे शिक्षक तात्याराव चव्हाण यांनी बसर्गे ग्रामपंचायत आणि ग्रामस्थांच्या वतीने आभार मानले.
या कार्यक्रमात पंतप्रधान उज्वला अभियान अंतर्गत पात्र ३५ लाभार्थींना मोफत स्वयंपाकाच्या गॅस जोडणी संचाचे वाटप बसर्गे ग्रामपंचायत आणि हलकर्णी येथील मारुती ग्रामीण एल. पी. जी. वितरक यांच्यामार्फत करण्यात आले.
या दोन्ही कार्यक्रमप्रसंगी बसगेर्चे उपसरपंच सुरेश मणिकेरी, ग्रामविकास अधिकारी शशिकांत कुंभार तसेच सर्व ग्रामपंचायत सदस्य, एस. एम. हायस्कूलचे ९ वी व १० वीचे विद्यार्थी-विद्यार्थिनी आणि शिक्षक, बसर्गे गावातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.