कोल्हापुरात वाघांचं दर्शन झाल _ उद्धव ठाकरे यांचे प्रतिपादन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 25, 2017 01:40 AM2017-11-25T01:40:39+5:302017-11-25T01:43:39+5:30
कोल्हापूर : सकाळपासून कोल्हापूर जिल्ह्यात फिरतोय. लोकांशी बोलतोय.
कोल्हापूर : सकाळपासून कोल्हापूर जिल्ह्यात फिरतोय. लोकांशी बोलतोय. शिवसैनिकांशी भेटतोय. तोच जिवंतपणा, तोच रसरशीतपणा आणि तेच ज्वलंत हिंदुत्व ठासून भरल्याचं आजही पाहायला मिळाले. इथे मला साक्षात वाघांचं दर्शन झालं, अशा कृतार्थ भावना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी रात्री कोल्हापुरात व्यक्त केल्या.
आमदार राजेश क्षीरसागर यांच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक जाणिवेतून गरीब महिला, अपंग व्यक्ती यांना ई-रिक्षा वाटपाचा कार्यक्रम ठाकरे यांच्या हस्ते शुक्रवारी रात्री दहा वाजता पार पडला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी १०० पैकी २७ जणांना प्रत्यक्ष कागदपत्रे देण्यात आली.
सोन्यामारुती चौकापासून आमदार क्षीरसागर यांच्या निवास्थानापर्यंत ठाकरे यांच्या स्वागतार्थ झालेली फुलांची उधळण, फटाक्यांची आतषबाजी, पक्षप्रमुखांचा जयघोष, घोषणाबाजी आणि शिवसैनिकांचा उत्साह पाहून उद्धव ठाकरे अक्षरश: भारावून गेले. व्यासपीठावर येऊन ठाकरे यांनी कोणतीही औपचारिकता न बाळगता थेट बोलायलाच सुरुवात केली आणि कोल्हापूरकरांबद्दलच्या मनातील भावना शब्दांत व्यक्त केल्या.
सकाळपासून अनेक ठिकाणी सभा झाल्या. लोकांशी भेटतोय, संवाद साधतोय. मला या ठिकाणी जिवंतपणा, रसरशीतपणा आणि ज्वलंत हिंदुुत्वाचे अभूतपूर्व दर्शन घडतंय.वाघांचं दर्शन झालं, असे सांगत ठाकरे म्हणाले की, राजेशचा वाढदिवस आज आहे, हे मला माहीत नव्हते. माझा दौरा आणि वाढदिवस हा योगायोग आहे. वाढदिवस प्रत्येकाचे होत असतात; परंतु सामाजिक जाणिवेतून जनतेच्या उपयोगाची कामे करण्याचे भान राजेश यांनी ठेवले.
गरिबांना त्यांनी ई-रिक्षांचे वाटप केले. ई-रिक्षा म्हणजे काय भानगड आहे, असा मला प्रश्न पडला; कारण या सरकारची शेतीसुद्धा आता आॅनलाईन आहे; पण येथे आल्यावर कळले, दिल्लीसारख्या शहरात प्रदूषणाचा प्रश्न गंभीर बनला आहे; पण कोल्हापुरात पर्यावरणाचा प्रश्नच निर्माण होऊ नये म्हणून ई-रिक्षा वाटल्या जात आहेत. आमचा शिवसैनिक सरकारच्याही दोनच नाही तर कितीतरी पावले पुढे आहे, हे आज स्पष्ट झाले.
राजेश, तुम्ही अशीच जनतेची कामे करीत राहा. तुमच्या कारकिर्दीला माझ्या शुभेच्छा आहेतच. शिवसेना आपल्या पाठीशी आहे, अशा शब्दांत आमदार क्षीरसागर यांचे ठाकरे यांनी अभिनंदन केले.यावेळी महापौर हसिना फरास, जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे, खासदार विनायक राऊत, खासदार गजानन कीर्तिकर संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर, मुंबईच्या माजी महापौर श्रद्धा जाधव, सहसंपर्कप्रमुख प्रा. संजय मंडलिक, आमदार प्रकाश आबिटकर, नगरसेवक नियाज खान, राहुल चव्हाण, अभिजित चव्हाण, प्रतिज्ञा उत्तुरे-निल्ले उपस्थित होत्या.
कोल्हापुरातील शिवसेना आमदार राजेश क्षीरसागर याच्या वाढदिवसानिमित्त गरीब महिला, अपंग व्यक्तींना ई-रिक्षांचे वाटप शुक्रवारी रात्री शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते पार पडले.यावेळी मुंबईच्या माजी महापौर श्रद्धा जाधव, अरुण दुधवडकर, आमदार राजेश क्षीरसागर, महापौर हसिना फरास, खासदार विनायक राऊत उपस्थित होते.