महापुराच्या नुकसानीचे जागतिक बँकेसमोर सादरीकरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 23, 2019 02:37 PM2019-08-23T14:37:36+5:302019-08-23T14:41:29+5:30
महापुरामुळे कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यांत जे अपरिमित नुकसान झाले आहे, त्याचे सादरीकरण एशियन डेव्हलपमेंट बँक आणि जागतिक बँकेसमोर करण्यात येणार आहे. त्यानंतर या बँकांकडून अर्थसाहाय्याची मागणी करण्यात येणार असल्याने याबाबतचे सादरीकरण अचूक असावे, अशा सूचना मुंबई महापालिकेचे आयुक्त आणि या महापुराच्या काळात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खास नेमणूक केलेले प्रवीण परदेशी यांनी कोल्हापुरात दिल्या.
कोल्हापूर : महापुरामुळे कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यांत जे अपरिमित नुकसान झाले आहे, त्याचे सादरीकरण एशियन डेव्हलपमेंट बँक आणि जागतिक बँकेसमोर करण्यात येणार आहे. त्यानंतर या बँकांकडून अर्थसाहाय्याची मागणी करण्यात येणार असल्याने याबाबतचे सादरीकरण अचूक असावे, अशा सूचना मुंबई महापालिकेचे आयुक्त आणि या महापुराच्या काळात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खास नेमणूक केलेले प्रवीण परदेशी यांनी कोल्हापुरात दिल्या.
जिल्ह्यातील पुरानंतरच्या मदतकार्याचा आढावा घेण्यासाठी सकाळी परदेशी यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात अधिकाऱ्यांची बैठक घेतली. यावेळी प्रामुख्याने त्यांनी याआधीच्या बैठकीत वेगवेगळ्या विभागांना विशिष्ट कामे दिली होती, त्याचा त्यांनी आढावा घेतला. प्रामुख्याने त्यांनी यावेळी पिण्याचे पाणी, स्वच्छताविषयक कामांबाबत चर्चा केली.
सार्वजनिक बांधकाम, महसूल, पाणीपुरवठा, आरोग्य, कृषी या सर्व विभागांचा आढावा त्यांनी यावेळी घेतला. कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यांतील या नुकसानीचे सादरीकरण एशियन डेव्हलपमेंट बँक आणि जागतिक बँकेसमोर करावयाचे असल्याने त्यामध्ये अचूकता असावी, याबाबत त्यांनी सूचना दिल्या. यावेळी जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी याबाबतचे सादरीकरण केले. त्यामध्ये परदेशी यांनी काही बदल सुचविले. बैठकीनंतर त्यांनी ‘सीएम फेलो’ म्हणून कार्यरत असणाऱ्या युवक युवतींशीही चर्चा केली.
यानंतर त्यांनी शिरोळ तालुक्यात मदतकार्याला भेट देऊन नंतर ते सांगलीला गेले. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल, महापालिकेचे आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी, जिल्हा पोलीसप्रमुख डॉ. अभिनव देशमुख यांच्यासह विविध विभागांचे विभागप्रमुख उपस्थित होते.