वसंतदादा बँक घोटाळाप्रकरणी माजी संचालकांचे म्हणणे सादर
By admin | Published: June 9, 2015 11:12 PM2015-06-09T23:12:55+5:302015-06-10T00:34:40+5:30
तिघांची हजेरी : पुढील सुनावणी १६ जूनरोजी
सांगली : येथील वसंतदादा शेतकरी सहकारी बॅँकेतील १७० कोटी रुपयांच्या गैरव्यवहारप्रकरणी महाराष्ट्र सहकारी अधिनियम १९६० मधील कलम ८८ नुसार चौकशीस गेल्या दीड महिन्यापासून सुरुवात झाली आहे. या प्रकरणात मंगळवारी माजी उपाध्यक्ष नरसगोंडा पाटील, तत्कालीन कार्यकारी संचालक भगवान तावदर, माधव गोगटे यांनी म्हणणे मांडले. अन्य संचालकांनी वकिलांमार्फत म्हणणे सादर केले. पुढील सुनावणी १६ जून रोजी होणार आहे.
चौकशी अधिकारी आर. डी. रैनाक यांच्यासमोर मंगळवारी दिवसभर सुनावणीचे कामकाज चालू होते. याप्रकरणी बॅँक कर्मचाऱ्यांनी लेखी म्हणणे सादर केले आहे. गत सुनावणीवेळी काही कर्मचाऱ्यांनी कागदपत्रांच्या मागणीसाठी अर्ज दाखल केले होते. त्यांना कागदपत्रे देण्यात आल्यानंतर काहींनी म्हणणे सादर केले. ३४ माजी संचालक आणि ७३ कर्मचाऱ्यांना म्हणणे सादर करण्याचे आदेश यापूर्वीच दिले आहेत.
वसंतदादा बँकेचे ११ जानेवारी २००८ रोजी विशेष लेखापरीक्षण झाले होते. या लेखापरीक्षणात १७० कोटी रुपयांच्या अनेक नियमबाह्य कामांबाबत आक्षेप नोंदविण्यात आले होते. याच लेखापरीक्षणाआधारे ४ जुलै २००८ रोजी कलम ८८ नुसार चौकशीचे आदेश दिले होते. त्यानंतर तत्कालीन सहकारमंत्र्यांनी यास स्थगिती दिली होती. विद्यमान सहकारमंत्र्यांनी याप्रकरणी तत्कालीन माजी संचालकांना म्हणणे मांडण्याची संधी देऊन यावरील स्थगिती उठविली. त्यानुसार चौकशीस सुरुवात झाली आहे. १७० कोटी रुपयांच्या नियमबाह्य कामांमध्ये ३४ माजी संचालक आणि ७३ कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. या सर्वांना नोटिसा बजावण्यात आल्या होत्या. बहुतांश माजी संचालक व कर्मचाऱ्यांनी लेखापरीक्षण अहवाल व संबंधित कागदपत्रांच्या मागणीचे अर्ज पहिल्या सुनावणीवेळी सादर केले होते. दुसऱ्या सुनावणीवेळीही कागदपत्रांचाच विषय सुरू होता. (प्रतिनिधी)
दिग्गजांचा समावेश...
माजी मंत्री मदन पाटील, माजी महापौर सुरेश पाटील, महापालिकेचे नगरसेवक सुरेश आवटी, माजी नगरसेविका बेबीताई पाटील, माजी नगरसेवक किरण जगदाळे, कुंदन बापूसाहेब पाटील, मुजीर जांभळीकर आदी ३४ माजी संचालकांचा या प्रकरणात समावेश आहे.