शाहू समाधी स्मारक स्थळाचा आराखडा सादर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2021 04:27 AM2021-08-28T04:27:22+5:302021-08-28T04:27:22+5:30
कोल्हापूर महानगरपालिका प्रशासनाने लोकप्रतिनिधी आणि जनभावनेचा आदर राखत राजर्षी शाहू महाराज यांचे समाधी स्मारक स्थळ येथील नर्सरी बागेत उभारले ...
कोल्हापूर महानगरपालिका प्रशासनाने लोकप्रतिनिधी आणि जनभावनेचा आदर राखत राजर्षी शाहू महाराज यांचे समाधी स्मारक स्थळ येथील नर्सरी बागेत उभारले आहे. पहिल्या टप्प्यात समाधी स्मारक, मेघडंबरी, लॅन्डस्केपिंग, लाईटिंग, स्मारकाभोवती संरक्षक भिंत अशी कामे करण्यात आली आहेत. सुमारे अडीच कोटींचा निधी या कामांवर स्वत: महापालिका प्रशासनाने स्वत:च्या तिजोरीतून केला.
या शाहू स्मारक समाधिस्थळाचे लोकार्पण ज्येष्ठ नेते खासदार शरद पवार यांच्या हस्ते झाले, तेव्हा या समाधिस्थळाच्या दुसऱ्या टप्प्यातील कामाची मोठी चर्चा झाली. खुद्द पवार यांनीच याबाबत निधी कमी पडून देणार नाही अशी ग्वाही दिल्यामुळे या कामाला गती आली आहे.
पंधरा दिवसांपूर्वी सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंढे यांच्या अध्यक्षतेखाली दुसऱ्या टप्प्यातील कामांचा आढावा घेण्यात आला. त्यावेळी पालकमंत्री सतेज पाटील, ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ, आमदार चंद्रकांत जाधव उपस्थित होते. बैठकीत या कामाच्या पूर्ततेसाठी ८ कोटी २७ लाखांचा निधी मंजूर करण्यात आला, तसेच सुधारित दरसूचीप्रमाणे आराखडे तयार करून तातडीने पाठवावेत, अशा सूचना पालिका प्रशासनास देण्यात आल्या होत्या.
त्याप्रमाणे नवीन दरसुचीप्रमाणे सुधारित आराखडे तयार करून दोन दिवसांपूर्वीच सार्वजनिक बांधकाम विभागाकडे तांत्रिक मंजुरीकरिता पाठविले असल्याचे शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत यांनी सांगितले. या कामास आधीच निधीची मंजुरी झाली असल्यामुळे तांत्रिक मंजुरी मिळताच लागलीच कामांना सुरुवात होऊ शकते.
राजर्षी शाहू छत्रपती महाराज यांचा मृत्यू दि. ६ मे १९२२ रोजी झाला होता, त्याला पुढील वर्षी शंभर वर्षे पूर्ण होणार आहेत. तोपर्यंत दुसऱ्या टप्प्यातील सर्व कामे पूर्ण होणे अपेक्षित आहेत. दुसऱ्या टप्प्यात स्मारकाच्या आवारातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर हॉलचे नूतनीकरण, त्याठिकाणी सुसज्ज आर्ट गॅलरी, लॅन्डस्केपिंग, लाईट व्यवस्था, परिसरातील दादासाहेब शिर्के उद्यानाचे नूतनीकरण अशी कामे केली जाणार आहेत.