सध्या देशाचा अन्नदाता भिकारी
By Admin | Published: March 27, 2017 11:50 PM2017-03-27T23:50:27+5:302017-03-27T23:50:27+5:30
एन. डी. पाटील : विश्वजागृती मंडळातर्फे ‘सांगली भूषण’ पुरस्काराने गौरव
सांगली : शेतीला हमीभाव मिळविण्यासाठी प्रथम आम्ही लढा उभारला. त्यानंतर देशभर अन्य संघटनांनी आवाज उठविला. सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे देशाचा अन्नदाता असलेला शेतकरी भिकारी, कर्जबाजारी झाला आहे, अशी खंत ज्येष्ठ विचारवंत प्रा. डॉ. एन. डी. पाटील यांनी व्यक्त केली. शेतकऱ्याला सावरण्यासाठी सरकारने मदत करण्याची गरज असल्याचेही त्यांनी सांगितले.
येथील विश्वजागृती मंडळाच्यावतीने प्रा. डॉ. पाटील यांना सोमवारी ‘सांगली भूषण’ पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी सत्काराला उत्तर देताना ते बोलत होते. आमदार गणपतराव देशमुख प्रमुख पाहुणे होते. महापौर हारुण शिकलगार अध्यक्षस्थानी होते.
पाटील म्हणाले की, शेतकऱ्याने उत्पादित केलेल्या मालाला हमीभाव देण्यास पूर्वीचे आणि सध्याचेही सरकार तयार नाही. सरकारला शेतकऱ्यांपेक्षा भांडवलदारांचीच अधिक चिंता आहे. भांडवलदारांना तासात कोट्यवधीची कर्जमाफी दिली जाते. तोट्यातील उद्योगांना मदत केली जाते. परंतु, वर्षानुवर्षे तोट्यातील शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना हमीभाव दिला जात नाही. त्यामुळे श्रम करणारा, घाम गाळणारा शेतकरी उपाशी आहे. तो कर्जबाजारी होऊन आत्महत्येचा मार्ग स्वीकारत आहे. मात्र त्याला मदतीचा हात देण्याचे सरकारचे धाडस होत नाही. दुसऱ्या बाजूला घाम न गाळणारा वर्ग वर्षाला इमल्यावर इमले चढवत आहे. तथापि पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अनेक अर्थतज्ज्ञ डोळेझाक करून देशाचा विकासदर वृध्दिंगत करण्यासाठी पळत आहेत.
आ. देशमुख म्हणाले की, शेतीमालाला किफायतशीर दर मिळाला पाहिजे, यासाठी शेतकरी कामगार पक्षाने लढा उभारला होता. याचे प्रमुख प्रा. डॉ. एन. डी. पाटील होते. त्यानंतर अन्य पक्ष आणि संघटनांनीही तो मुद्दा सरकारकडे लावून धरला. मात्र तो प्रश्न आजही सुटला नसल्यामुळे शेतकरी कर्जबाजारी झाला आहे. एन. डी. पाटील यांनी शिक्षण क्षेत्र सुधारण्यासाठीही महत्त्वपूर्ण भूमिका बजाविली आहे.
तत्कालीन शिक्षणमंत्री मधुकरराव चौधरी यांनी शिक्षण व्यवस्थेची श्वेतपत्रिका काढून महत्त्वपूर्ण बदल करण्याचे धोरण ठरविले होते. त्याला कडाडून विरोध करून श्वेतपत्रिकेतील दुसरी बाजू मांडून सरकारची झोप उडविली होती. सरकारला ते शैक्षणिक धोरण बदलावे लागले. सहकार, शेती क्षेत्रातही पाटील यांची उल्लेखनीय कामगिरी आहे.
यावेळी जिल्हाधिकारी शेखर गायकवाड, नानासाहेब चितळे, बापूसाहेब पुजारी, अॅड. रवींद्र पवार, शिवाजी ओऊळकर, अर्चना थोरात, अॅड. तेजस्विनी सूर्यवंशी, यशोधन गडकरी आदी उपस्थित होते. प्रा. वैजनाथ महाजन यांनी परिचय करून दिला. अरूण दांडेकर यांनी स्वागत केले. अॅड. अजित सूर्यवंशी यांनी प्रास्ताविक केले. महेश कराडकर यांनी आभार मानले. चालले होते आळंदीला, पोहोचलेत चोराच्या आळंदीला!
विकासदर वाढीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींसह सर्वच अर्थतज्ज्ञ पळत सुटले आहेत. पळता-पळता ते कुठे पोहोचले हेही त्यांना कळले नाही. शेवटी पाहताय तर काय, आळंदीला पोहोचण्याऐवजी ते चोराच्याच आळंदीला पोहोचले आहेत. देशाचे उत्पन्न सामान्य माणूस डोळ्यासमोर ठेवून ठरविले पाहिजे, पण हे बहाद्दर अंबानी आदी मोठे झाले की देशाचे उत्पन्न वाढले, असे सांगत विकासदर वाढल्याचा गवगवा करीत आहेत, हे देशाच्या विकासाला घातक आहे, असे प्रा. डॉ. पाटील म्हणाले. (प्रतिनिधी)
पुरस्काराची रक्कम रयत शिक्षण संस्थेला
एन. डी. पाटील यांना ‘सांगली भूषण’ पुरस्काराच्या रूपाने २५ हजार रुपये रोख व सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. पुरस्काराची रक्कम त्यांनी रयत शिक्षण संस्थेच्या शैक्षणिक कार्यासाठी देत असल्याचे सांगत संस्थेचे दक्षिण विभागाचे अध्यक्ष माधवराव मोहिते यांच्याकडे कार्यक्रमातच सुपूर्द केली.
शिक्षणाचे : बाजारीकरण
कर्मवीर अण्णांनी गरिबांना शिक्षणाची दारे खुली करण्याचे धोरण राबविले होते. त्यांचे ते कार्य रयत शिक्षण संस्थेत चालू आहे; पण, शासनाचे सध्याचे शिक्षणाचे धोरण गरीब कुटुंबातील मुलांना शिक्षणापासून वंचित ठेवण्याचेच दिसत आहे. शिक्षणाच्या बाजारीकरणाचे धोरण बदलण्यासाठी लढा उभा करण्याची गरज आहे, असेही एन. डी. पाटील म्हणाले.