फुले, शाहू, आंबेडकरांच्या मार्गानेच राष्ट्रीय एकात्मतेची जोपासना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 27, 2021 04:16 AM2021-06-27T04:16:57+5:302021-06-27T04:16:57+5:30
कोल्हापूर : देशाची एकता, अखंडता, बंधुता जोपासायची तर फुले, शाहू, आंबेडकर यांनी आखून दिलेल्या मार्गावरूनच चालावे लागेल, असे प्रतिपादन ...
कोल्हापूर : देशाची एकता, अखंडता, बंधुता जोपासायची तर फुले, शाहू, आंबेडकर यांनी आखून दिलेल्या मार्गावरूनच चालावे लागेल, असे प्रतिपादन ज्येष्ठ विचारवंत व इतिहास संशोधक डॉ. जयसिंगराव पवार यांनी केले. स्वातंत्र्यप्राप्तीला पाऊणशे वर्षे झाली तरी अद्यापही आपल्यातला भेदभाव, अज्ञान, परस्परांमधला कटुताभाव दूर होऊ शकलेला नाही. परस्परद्वेषाच्या पायावर कोणतेही राष्ट्र उभारू शकत नाही. आपल्यातले भेद जितक्या लवकर दूर होतील, तितके एक राष्ट्र म्हणून आपण मजबूत होऊ, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
शाहू जयंतीचे औचित्य साधून शिवाजी विद्यापीठाच्या वतीने ‘राजर्षी शाहू महाराज आणि राष्ट्रीय एकात्मता’ या विषयावर आयोजित विशेष ऑनलाइन व्याख्यानामध्ये ते बोलत होते. अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के होते. प्रकुलगुरू डॉ. पी.एस. पाटील प्रमुख उपस्थित होते.
डॉ. पवार म्हणाले, राजर्षी शाहू महाराजांनी त्यांच्या हयातीमध्ये जे राजकीय, सामाजिक योगदान दिले, त्या कार्याची व्याप्ती पाहता, ते खऱ्या अर्थाने राष्ट्रबांधणीचे, राष्ट्रउभारणीचे कार्य होते. ते पुढे नेण्याचे त्याला घटनेच्या साच्यात आकार देण्याचे काम डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी केले. आज त्या कार्याला आव्हान देण्याचे घातक प्रयत्न होत आहेत. आपले राष्ट्र हे कोण्या एका धर्माचे नसून सर्व धर्मीयांचे आहे, अशी समभावाची भावना जोपासली जाणे, वृद्धिंगत होणे ही फार महत्त्वाची बाब आहे.
अध्यक्षस्थानावरून बोलताना कुलगुरू डॉ. शिर्के म्हणाले, समाजातील सर्व घटकांच्या कल्याणाचा विचार हा राजर्षी शाहूंच्या कार्याचा पाया होता. प्रत्येक घटकासाठी त्यांनी दूरगामी ठरणारे निर्णय घेतले. शिक्षण, कला, संगीत, शेती, सहकार, जलसिंचन, क्रीडा अशा सर्वच क्षेत्रांच्या विकासासाठी त्यांनी दिलेले योगदान राष्ट्रनिर्मितीचेच कार्य आहे. प्रकुलगुरू डॉ. पी.एस. पाटील यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर यांनी आभार मानले. जनसंपर्क अधिकारी डॉ. आलोक जत्राटकर यांनी सूत्रसंचालन केले.
चौकट
सामूहिक शहाणपणा वाढावा
राष्ट्र टिकवायचे असेल, तर आपण सर्व धर्मांचे आहोत, ही भावना दृढमूल होणे आवश्यक आहे. भावना भडकावणाऱ्या प्रवृत्तींपासून दूर राहावयाचे असेल, तर स्वतः शहाणे होणे आवश्यक आहे आणि त्यासाठी शिक्षण हाच एकमेव उपाय आहे. महात्मा फुले यांच्यापासून कर्मवीर भाऊराव पाटील यांच्यापर्यंत बहुजन समाजाच्या हरेक नेतृत्वाने समाजाचा सामूहिक शहाणपणा कसा वाढेल, याकडे लक्ष केंद्रित केलेले होते. या सामूहिक शहाणपणाच्या व्याप्तीवरच देशाचे शहाणपण, देशाचा सर्वधर्मसमभाव या गोष्टी अवलंबून असतात, असेही डॉ. पवार म्हणाले.
फोटो २६०६२०२१-कोल-शिवाजी युनिव्हर्सिटी
फोटो ओळ: मुख्य प्रशासकीय इमारत व राजर्षी शाहू संशोधन केंद्रामध्ये कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के, प्रकुलगुरू डॉ. पी.एस. पाटील यांनी राजर्षी छत्रपती शाहू महाराजांना अभिवादन केले. यावेळी ज्येष्ठ विचारवंत व शाहू संशोधन केंद्राचे मानद संचालक डॉ. जयसिंगराव पवार, कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर उपस्थित होते.