‘गोकुळ’चे अध्यक्षपद द्या; ‘अमूल’चे आव्हान स्वीकारतो!
By admin | Published: September 10, 2016 01:24 AM2016-09-10T01:24:40+5:302016-09-10T01:24:51+5:30
अरुण नरके यांनी ठोकला शड्डू : ‘करवीर’च्या राजकारणातून निवृत्त; महाडिक-पीएन यांनी संधी द्यावी
कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघा (गोकुळ)ची बुधवारी वार्षिक सभा ज्येष्ठ संचालक अरुण नरके यांच्या भाषणाने गाजली. दुग्धक्रांतीचे जनक डॉ. वर्गीस कुरियन हे त्यांचे दूध व्यवसायातील गुरू. त्यांचा शुक्रवारी स्मृतिदिन होता. त्या पार्श्वभूमीवर ‘गोकुळ’समोरील ‘अमूल’चे आव्हान आणि संघाची वाटचाल या अनुषंगाने ‘लोकमत’च्या संपादकीय सहकाऱ्यांनी श्री. नरके यांच्याशी संवाद साधला. ‘लोकमत’च्या शहर कार्यालयात सुमारे दीड तास झालेली चर्चा येथे देत आहोत.
कोल्हापूर : ‘गोकुळ’समोर सध्या ‘अमूल’चे मोठे आव्हान असून, त्यासह सर्वच आव्हाने सक्षमपणे पेलण्याची आपली तयारी आहे; पण त्यासाठी ‘गोकुळ’चे नेते महादेवराव महाडिक व पी. एन. पाटील यांचे पाठबळ महत्त्वाचे आहे. या दोघांनी संघाच्या अध्यक्षपदाची एकमताने संधी दिल्यास ती स्वीकारण्याची माझी तयारी आहे, असे ज्येष्ठ संचालक अरुण नरके यांनी नि:संदिग्धपणे सांगितले.
करवीर विधानसभा मतदारसंघातील राजकारणामुळे ‘पी. एन.’ व आपल्यात मतभेद आहेत आणि ते स्वाभाविकच आहे; परंतु यापुढील करवीर विधानसभाच नव्हे, तर लोकसभेसह कोणत्याच निवडणुकीच्या पक्षीय राजकारणात मी भाग घेणार नाही. त्यामुळे विधानसभेला ‘पी. एन.’ यांच्याविरोधात काम करण्याचा प्रश्नच येत नाही. आता माझे वय ७३ आहे. ‘गोकुळ’शी माझे नाते चाळीस वर्षांचे आहे. तो संघ वाढला, फुलला पाहिजे यासाठीच उर्वरित आयुष्य खर्ची घालणार असल्याचे अरुण नरके यांनी स्पष्ट केले.
‘अमूल’चे सर्वेसर्वा डॉ. वर्गीस कुरियन हे आपले गुरू आहेत. त्यांनी दिलेल्या सूत्रानुसारच ‘गोकुळ’ची वाटचाल सुरू आहे. संघाच्या वाटचालीचा तो गाभाच आहे; पण सध्या ‘अमूल’चे मोठे आव्हान आपल्यासमोर आहे. सामान्य माणसाच्या घामाच्या थेंबातून ‘गोकुळ’ फुलला आहे. तो वाचविण्यासाठीच आपली धडपड सुरू असून, प्रसंगी ‘अमूल’ला हात जोडू. त्यांनी ऐकले तर ठीक, अन्यथा त्यांच्याविरोधात लढण्याची आपली तयारी आहे. संकटाच्या काळात मला एकलव्यासारखे फक्त ‘गोकुळ’चे हितच डोळ्यांसमोर दिसत आहे. ‘महानंदा’सारख्या बलाढ्य संघाला त्यांनी संपविले. आज मुंबईत त्यांचे १७ लाख लिटर दूध आहे. ‘अमूल’ची आर्थिक ताकद मोठी आहे. त्यांचे प्रतिदिन संकलन एक कोटी २० लाख लिटर आहे. गुजरातमध्ये दूध कमी पडू लागले म्हणून ते महाराष्ट्रात आले आहेत. महाराष्ट्रात बंद पडलेल्या आठ-दहा सहकारी संघांच्या जागाही त्यांनी पाहिल्या आहेत. महाराष्ट्रात विशेषत: पश्चिम महाराष्ट्रात पाय रोवण्यासाठी गेले सहा महिने ते अभ्यास करीत आहेत. त्यांना थोपवायचे असेल तर पूर्ण तयारीनिशी उतरले पाहिजे. ‘अमूल’चे कार्यकारी संचालक सोदी हे आपले चांगले मित्र आहेत. त्यांना गायीच्या दुधाची गरज आहे. आपल्याकडे गायीचे दूध जास्त आहे, ते त्यांच्याकडे देऊया आणि कोल्हापूरकडे येऊ नका, अशी त्यांना विनंती करूया. स्वर्गीय आनंदराव पाटील-चुयेकर यांच्यानंतर संघाच्या भल्यासाठी सर्वाधिक झटलेला मी एक संचालक आहे. संघ अडचणीत असताना आपण गप्प बसणे उचित नाही. नेते व संचालकांनी पाठबळ दिले तर ‘अमूल’चे आव्हानही परतवून लावता येईल; पण यासाठी महाडिक व पी. एन. यांनी एकमताने जबाबदारी द्यावी. मी अध्यक्षपदासाठी इच्छुक आहे, हे आता लपून राहिलेले नाही; त्यामुळे पुन्हा मला ही संधी द्या, म्हणून मी कोणाकडे जाणार नाही. संघाचे हित व माझी लायकी असेल तर त्यांनी मला अध्यक्षपद द्यावे. नेत्यांना अपेक्षित कारभार आपल्या हातून निश्चित होईल. त्यांना विचारल्याशिवाय कोणताही निर्णय माझ्याकडून होणार नाही; पण आता चेंडू नेत्यांच्या कोर्टात आहे.’
करवीर विधानसभा मतदारसंघात आमदार चंद्रदीप नरके यांचा प्रचार केल्याचा राग ‘पी. एन.’ यांच्या मनात आहे. तो स्वाभाविकच आहे. आता आपले वय ७३ वर्षे आहे. अकरा वर्षांपूर्वी बायपास झाल्याने येथून पुढे जिल्हा परिषद, साखर कारखाना, विधानसभा, लोकसभांसह इतर निवडणुकांत कोणाचाही प्रचार करणार नाही. अध्यक्ष करण्यासाठी नरके यांनी अशी भूमिका घेतल्याची काहींना शंका येईल; पण नाही. अध्यक्ष केले नाही तरीही करवीर मतदारसंघात कोणाचाही प्रचार करणार नाही. उर्वरित आयुष्य ‘गोकुळ’ला वाचविणे व त्याच्या उन्नतीसाठी खर्ची घालणार असल्याची घोषणा नरके यांनी केली.
म्हशी वाढवा...
गोकुळ वाढवा...!
‘गोकुळ’च्या माध्यमातून महिन्याला ४० कोटी रुपये शेतकऱ्यांना जातात. आमची बाजारपेठ केवळ म्हशीच्या दुधावर अवलंबून आहे. ‘अमूल’ आले आणि त्यांनी म्हशीच्या दुधाकडे लक्ष दिले तर ‘गोकुळ’ चार महिन्यांत खाली बसेल.
त्यामुळे आजपासूनच आपली जी ताकद आहे तीच कशी वाढवता येईल यावर लक्ष केंद्रित केले पाहिजे. त्यासाठी ‘म्हशी वाढवा... गोकुळ वाढवा’ असा नवा नारा आता देण्याची गरज आहे, असे नरके यांनी सांगितले.
‘मैत्री’ व शब्दाशी घट्ट असणारे ‘पी. एन.’
सर्व सत्तास्थाने ‘मनपा’ (महाडिक-नरके-पाटील) च्या हातात होती. केवळ पी. एन. पाटील व महादेवराव महाडिक यांच्या भक्कम पाठबळामुळेच १९९० ते २००० या कालावधीत आपण ‘गोकुळ’चे अध्यक्ष म्हणून काम करू शकलो. मैत्री व दिलेला शब्दाला पक्का असलेला नेता असाच पी.एन. यांचा आतापर्यंतचा आपल्याला अनुभव आल्याचे नरके यांनी आवर्जून सांगितले. कुंभी-कासारी कारखान्याच्या निवडणुकीत त्यांनी संदीप नरके याला आपल्या पॅनेलमध्ये घेण्याचा शब्द दिला होता. त्यास त्यांच्याच गटातून विरोध झाला. त्यात त्यांचे पॅनेल झाले नाही; परंतु तरीही त्यांनी संदीपच्या उमेदवारीबाबत शेवटपर्यंत आग्रह धरला याचीही नरके यांनी आठवण करून दिली.
सतेज यांचे आरोप चुकीचे
सतेज पाटील यांच्या प्रश्नांंची उत्तरे देण्यास आम्ही बांधील होतो; पण त्यांनी प्रश्न विहीत वेळेत संघाकडे सादर करणे गरजेचे होते. त्यांनी पोस्टाने पाठविलेले नाहीत, तरीही आम्ही त्यांच्या सर्व प्रश्नांची उत्तरे द्यायला हवी होती. ‘मंजूर... मंजूर’ म्हणून सभा उरकायला नको होती, अशी कबुलीही नरके यांनी दिली.
सतेज यांचे आरोप चुकीचे
सतेज पाटील यांच्या प्रश्नांंची उत्तरे देण्यास आम्ही बांधील होतो; पण त्यांनी प्रश्न विहीत वेळेत संघाकडे सादर करणे गरजेचे होते. त्यांनी पोस्टाने पाठविलेले नाहीत, तरीही आम्ही त्यांच्या सर्व प्रश्नांची उत्तरे द्यायला हवी होती. ‘मंजूर... मंजूर’ म्हणून सभा उरकायला नको होती, अशी कबुलीही नरके यांनी दिली.
राखीव निधीचे मजबुतीकरण
‘अमूल’च नव्हे तर कोणत्याही नव्या आव्हानाला सामोरे जायचे असेल तर संघाकडे राखीव निधी असायला हवा. आमचे वडील स्वर्गीय डी. सी. नरके साहेब हे नेहमी साखर कारखान्यात आपलं गठळं मजबूत असले पाहिजे, असा आग्रह धरत. ‘गोकुळ’मध्येही ही ताकद हवी. आता संघाची स्थिती मजबूत आहे. ती अधिक कशी मजबूत होईल असे नियोजन हवे, असे नरके यांनी सांगितले.
संघाची पंचसूत्री..
१ गावोगावच्या उत्पादकाला विश्वासात घ्या
२ म्हैस दूध वाढविण्यावर भर
३ पुढच्या वीस वर्षांचे नियोजन करा
४ किमान ५०० कोटींचा राखीव निधी
५ पारदर्शी व काटकसरीचा कारभार
अध्यक्षांत धमक नाही..
संघाचे अध्यक्ष विश्वास पाटील यांनी ज्या नियोजनबद्धरीत्या वार्षिक सभा हाताळायला हवी होती, ती हाताळता आली नाही, हे सर्वांनी पाहिलेच आहे.
संघाचे तेही ज्येष्ठ संचालक असले तरी ‘अमूल’ने उभे केलेले आव्हान पेलण्याची त्यांच्यात धमक नाही. त्यामुळे ही संधी नेत्यांनी आपल्याला द्यावी, असेही नरके यांनी सांगितले.