राष्ट्रपतींचा कोल्हापूर दौरा पुढे गेला, यंत्रणेने सुटकेचा श्वास सोडला
By ऑनलाइन लोकमत | Published: July 27, 2024 01:49 PM2024-07-27T13:49:21+5:302024-07-27T13:50:13+5:30
कोल्हापूर : कोल्हापूरसह पुणे व राज्यात सुरू असलेली अतिवृष्टी, महापुराच्या परिस्थितीमुळे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचा महाराष्ट्र दौरा पुढे ढकलण्यात ...
कोल्हापूर : कोल्हापूरसह पुणे व राज्यात सुरू असलेली अतिवृष्टी, महापुराच्या परिस्थितीमुळे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचा महाराष्ट्र दौरा पुढे ढकलण्यात आला आहे. राष्ट्रपतींच्या कार्यालयातून राज्याच्या मुख्य सचिवांना याबाबतचे पत्र शुक्रवारी सायंकाळी पाठविण्यात आले. राष्ट्रपतींचा दौरा सध्या तरी रद्द झाल्याने तयारीत गुंतलेल्या सर्वच शासकीय यंत्रणेने सुटकेचा श्वास सोडला. आता त्यांना कोल्हापुरातील पूरस्थितीवर लक्ष केंद्रित करता येणार आहे.
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू या २८ ते ३० तारखेदरम्यान महाराष्ट्र दौऱ्यावर येणार होत्या. त्यांचा सर्वात पहिला दौरा रविवारी काेल्हापुरात होता. यादिवशी त्या अंबाबाईचे दर्शन घेऊन वारणानगर येथील कार्यक्रमाला जाणार होत्या. त्यांच्या दौऱ्यानिमित्त गेल्या आठ दिवसांपासून जिल्हाधिकारी कार्यालय, महसूल, पोलिस, सार्वजनिक बांधकाम, रस्ते विकास महामंडळ असे तलाठ्यापासून ते उच्चपदस्थ अधिकाऱ्यांपर्यंतची यंत्रणा तयारी गुंतली होती.
त्यात गेल्या सहा दिवसांपासून जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरू आहे. महापुराच्या उंबरठ्यावर असलेल्या जिल्ह्यातील नागरिकांचे स्थलांतर, त्यांचा निवारा, आरोग्याच्या सोयी, चहा, नाष्टा, जेवणासह सर्व सोयी पुरवण्यासाठी यंत्रणेची धावपळ सुरू होती. दुसरीकडे राष्ट्रपतींच्या दौऱ्याच्या नियोजनाच्या बैठका, तयारीमध्ये मोठी यंत्रणा गुंतली होती; पण आता दौरा पुढे गेल्याने यंत्रणेने सुटकेचा श्वास सोडला.