जिल्हा परिषद अध्यक्ष भाजपचाच!
By admin | Published: March 10, 2017 11:02 PM2017-03-10T23:02:30+5:302017-03-10T23:02:30+5:30
संजयकाका पाटील : बाबर, रयत आघाडीशी चर्चा
सांगली : जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत जिल्ह्यातील जनतेने भाजपच्या बाजूने कौल दिला आहे. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत जिल्हा परिषदेचा अध्यक्ष भाजपचाच होईल. शिवसेनेचे आमदार अनिल बाबर व रयत विकास आघाडीशी आमची चर्चा सुरू असल्याचे खासदार संजयकाका पाटील यांनी शुक्रवारी सांगितले.
ते म्हणाले की, जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत भाजप हा सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. निवडणुकीचा निकाल लागताच आपण आमदार अनिल बाबर यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा केली होती. त्यांना एकत्रित बसून निर्णय घेऊ, अशी ग्वाही दिली आहे. ते वेगळा विचार करतील, असे वाटत नाही. महसूलमंत्री चंद्रकांतदादा पाटील, जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख यांनीही आ. बाबर यांच्याशी चर्चा केली आहे.
रयत विकास आघाडी आमच्यासोबतच राहील. त्यात कसलीही अडचण दिसून येत नाही. त्यांच्याशीही चर्चेच्या फेऱ्या सुरू आहेत, असे पाटील यांनी सांगितले. (प्रतिनिधी)
पंचायत समित्यांसाठीही जोरदार प्रयत्न
पंचायत समिती सभापती निवडीनंतर अध्यक्ष निवडीविषयी रयत विकास आघाडी व आमदार अनिल बाबर यांच्याशी चर्चा होईल. जत व मिरज पंचायत समितीमध्येही भाजपचाच सभापती होईल. जतमध्ये भाजपचे नऊ सदस्य आहेत. जनसुराज्य शक्ती व वसंतदादा आघाडीशी आमदार विलासराव जगताप चर्चा करीत आहेत. मिरजेत भाजपचे ११ सदस्य आहेत. तिथेही शंभर टक्के भाजपचीच सत्ता येईल. याशिवाय काठावर असलेल्या पंचायत समितीतही भाजपच सत्तेत येईल, असेही पाटील यांनी सांगितले.